आद्य मराठी नाटककाराचे स्मरण!
डॉ. सुधाकर फडके
‘मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार’ शाहराजराजे भोसले (1670-1712) यांच्या नाट्य वाङ्मयाला वंदन करून व नटराज पूजन करून, तंजावर येथे होणार्या 100 व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ बुधवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजता, नाट्य संमेलनाचे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, मावळते अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
1675 ते 1855 म्हणजे 180 वर्षे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे सावत्रबंधू व्यंकोजीराजे भोसले या घराण्याने तामिळनाडूतील तंजावरमध्ये राज्य केले. या काळातील राजांनी मराठी नाटक निर्माण होण्यासाठी जाणतेपणाने प्रयत्न केले; परंतु त्या नाट्यलेखनाची परंपरा विद्यमान मराठी रंगभूमीशी जोडली गेली नाही, याला कारण संशोधनाचा अभाव व भाषिक, राजकीय, सांस्कृतिक अंतर हे होय.
तामिळनाडू राज्यात असलेल्या तंजावर याठिकाणी प्राचीन काळापासून चौल राजे राज्य करत असत. ते कलेचे आणि ज्ञानाचे भोक्ते होते. तीच परंपरा पुढे व्यंकोजी अथवा एकोजीराजे (छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे बंधू) यांनी आणि त्यांच्या वंशजांनी दीर्घकाळ चालविली. व्यंकोजीराव जेव्हा तंजावरला कायमचे रहावयास गेले, तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर विविध विषयांतील पारंगत अशी माणसे नेली. त्यामुळेच तेथे खरे तर रंगभूमीविषयक महत्त्वाचे कार्य पार पडले. या राजांना नाटकांची आवड होती, हे त्यांनी लिहिलेल्या नाटकांवरून लक्षात येते. व्यंकोजीराजांचे ज्येष्ठ पुत्र शाहराज यांनी मराठीत 19, तेलुगूत 25, संस्कृतमध्ये 4, तर हिंदीत 2 नाटके लिहिली. त्यातील ही काही नाटकांची नावे – ‘सरस्वती’, ‘पार्वती’, ‘सीता-कल्याण’, ‘पट्टाभिषेक.’ तंजावर येथील सरस्वती महालाच्या ग्रंथसंग्रहालयात या नाटकांच्या संहिता उपलब्ध आहेत. शाहराजांप्रमाणेच त्यांचे पुतणे प्रतापसिंह यांनीही 20 नाटके लिहिल्याचा उल्लेख ‘प्रबोधचंद्रोदय’ या नाटकाच्या पुस्तकात आहे. राजे प्रतापसिंह यांचे नातू दुसरे सरफोजीराव यांनीही नाटकांची परंपरा पुढे नेली. या सर्व नाटकांवर संस्कृत नाटकांचा व कर्नाटकातील ‘यक्षगान’ या कलांचा प्रभाव होता.
आरंभीच्या काळात अनिष्ट चालीरीती नाहीशा व्हाव्यात, ही त्यांची द़ृष्टी होती. पुढे पुढे नाटकाच्या रचनेत कथानक रचना, संवाद, व्यक्तिरेखाटन याकडे विशेष लक्ष दिले जाऊ लागले व या नाटकांना स्वतंत्र स्वरूप प्राप्त झाले. उपलब्ध असलेल्या मराठी नाटकात आद्य नाटक म्हणून ‘लक्ष्मीनारायण कल्याण’ या नाटकाला प्रथम स्थान आहे. इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांना तंजावर येथील एका रामदासी मठात 1690 च्या सुमारास लिहिल्या गेलेल्या या नाटकाची पोथी सापडली. इ. स. 1665 मध्ये विजयनगर साम—ाज्याचा अस्त झाला. 17 व्या शतकाच्या मध्यावर कर्नाटकात नृत्य, नाट्य व दाक्षिणात्य संगीताला मान मिळाला व तंजावर हे विद्येचे माहेरघर बनले. व्यंकोजींचा मुलगा शहाजी हे मराठी नाटक लिहिणारे पहिले राजे होते. त्यांनी सुमारे 24 नाटके लिहिली असावीत, असा अंदाज आहे.
या संमेलनाला जिल्हाधिकारी दीपक जेकब, तमिळ विद्यापीठ तंजावर कुलगुरू प्रो. थिरूवल्लूवम, छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवे वारसदार शहाजीराजे भोसले, नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, कार्यकारी समिती सदस्य गिरीश महाजन, ज्येष्ठ नाट्यकर्मी आनंद कुलकर्णी, विवेकानंद गोपाल उपस्थित राहणार आहेत. नटराजनृत्य व शाहराजराजे भोसले लिखित ‘लक्ष्मीनारायण कल्याण’ या नाटकातील प्रवेश नाट्यसंमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी व कोषाध्यक्ष सतीश लोटके सादर करणार आहेत.
Latest Marathi News आद्य मराठी नाटककाराचे स्मरण! Brought to You By : Bharat Live News Media.