यशवंत कारखान्याच्या मतदार यादीवर आक्षेप घेण्याची संधी
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. त्यासाठी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी 1 ऑक्टोबर 2023 ही अर्हता दिनांक (कट ऑफ डेट) निश्चित करून कारखान्याच्या सभासदांची प्राथमिक मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द केली आहे. त्यावर 3 जानेवारीपर्यंत हरकती, आक्षेप घेता येणार आहेत.
प्रारूप मतदार यादी मंगळवारी (दि. 26) प्रसिध्द करण्यात आली असून, या प्रारूप मतदार यादीवर हरकती व आक्षेप हे 3 जानेवारीपर्यंत घेता येतील. दाखल हरकती व आक्षेपांवर 12 जानेवारीपर्यंत निर्णय घेतला जाईल, तर कारखान्याच्या सभासदांची अंतिम मतदार यादी 17 जानेवारी रोजी पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय आणि यशवंत कारखानास्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याची अधिसूचना जारी केली आहे.
दरम्यान, कारखान्याने सादर केलेल्या पात्र सभासद मतदारांची प्रारूप मतदार यादी सहा कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी व तपासणीसाठी लावण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय, पहिला मजला, साखर संकुल, शिवाजीनगर, थेऊर येथे यशवंत सहकारी साखर कारखानास्थळावर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे शहर), जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (पुणे ग्रामीण), उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (4) पुणे, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे या कार्यालयांचा समावेश आहे.
अखेर पडघम वाजण्यास सुरुवात
‘यशवंत’च्या 2023-24 ते 2028-29 या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम अखेर वाजण्यास सुरुवात झाली असून, लोकनियुक्त संचालक मंडळ कारखान्यावर येण्याची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष संजय गोंदे यांनी तयार केलेल्या प्राथमिक मतदार यादीत व्यक्तिगत व संस्था सभासद मिळून एकूण 21 हजार 414 सभासदांचा समावेश असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा
ट्रम्प यांचे काय होणार?
कोल्हापूर : फुटबॉल संघ, खेळाडूंवर कारवाई
इंडिया आघाडीपुढे जागा वाटपाचे आव्हान
Latest Marathi News यशवंत कारखान्याच्या मतदार यादीवर आक्षेप घेण्याची संधी Brought to You By : Bharat Live News Media.