IND vs SA 1st Test : 31 वर्षांचा इतिहास बदलण्यास भारत सज्ज
सेंच्युरियन, वृत्तसंस्था : सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीसाठी (IND vs SA 1st Test) भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज, मंगळवार (26 डिसेंबर) पासून उभय संघांमधील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर 31 वर्षांत प्रथमच कसोटी मालिका जिंकून इतिहास रचण्यास सज्ज झाला आहे.
आतापर्यंत भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आठ दौरे केले, ज्यामध्ये टीम इंडियाला एकही कसोटी मालिका जिंकता आली नाही. अशा स्थितीत यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकून भारतीय संघ नवा सुवर्ण इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करेल. भारताने 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी सामना खेळला होता. या कालावधीत, दोन्ही संघांमध्ये 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली, त्यापैकी 3 सामने अनिर्णीत राहिले आणि आफ्रिकेने 1 सामना जिंकून मालिका जिंकली.
टीम इंडियाने 2006 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पहिला कसोटी विजय मिळवला होता, मात्र त्या काळातही भारताला तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी गमवावी लागली होती. त्यानंतर, 2010 मध्ये, भारतीय संघ आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यात यशस्वी ठरला होता. मात्र, टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर 4 कसोटी सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने भारतीय भूमीवर एक मालिका जिंकली आहे.
या मालिकेत सर्वांच्या नजरा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यावर असतील. दोन्ही खेळाडूंचे लक्ष सध्या कसोटी क्रिकेटवर केंद्रित आहे. कारण दोन्ही खेळाडूंनी वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भाग घेतला नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असेल आणि ती बजावतील, अशी आशा टीम इंडियाच्या चाहत्यांना आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारताच्या वेगवान गोलंदाजी विभागावरही बरीच जबाबदारी असेल.
टीम इंडियाच्या सराव सत्राला पावसाचा अडथळा (IND vs SA 1st Test)
पहिल्या कसोटीच्या एक दिवस आधी म्हणजे सोमवारपासून सेंच्युरियनमधील हवामान ढगाळ दिसत आहे. भारताच्या सराव सत्रावेळी येथे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ दुपारपासून सराव सत्रात भाग घेणार होता. पहिले सराव सत्र भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होणार होते. मात्र, सकाळपासून येथे मुसळधार पाऊस सुरू झाला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी (26 डिसेंबर) पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. दुसर्या दिवशी आकाश निरभ्र राहील असा अंदाज आहे. तिसर्या दिवसाच्या पहिल्या सत्रात हलका पाऊस पडेल. मात्र, शेवटच्या 2 सत्रांमध्ये हवामान स्वच्छ राहील. सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसामुळे खेळात अडथळा येऊ शकतो. या दोन्ही दिवसांत 60 टक्के पाऊस पडेल आणि कमाल तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
खेळपट्टी कशी आहे?
सुपरस्पोर्ट पार्कची खेळपट्टी कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांना फायदेशीर राहते. ही द. आफ्रिकेतील सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे. येथे अतिरिक्त बाऊन्समध्ये समानता आहे, ज्यामुळे क्रिझवर स्थिरावल्यानंतर फलंदाज धावा करू शकतात. फिरकी गोलंदाजांना मात्र या खेळपट्टीवर संघर्ष करावा लागतो. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणार्या संघांची सरासरी धावसंख्या 330 आहे. तर पाठलाग करताना यशस्वीरीत्या गाठलेले सर्वोच्च लक्ष्य 249 धावांचे आहे.
विराट कोहलीला विक्रमाची संधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नजरा एका मोठ्या विक्रमाकडे असतील, त्याला हा विक्रम करण्यासाठी केवळ 66 धावांची गरज आहे. असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरणार आहे. कोहलीने आतापर्यंत सहा वेळा एका वर्षात 2000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या बाबतीत तो कुमार संगकाराबरोबर संयुक्तपणे आघाडीवर आहे, त्यानेही सहा वर्षांत दोन हजारांहून अधिक धावा केल्या होत्या. कोहली यंदाच्या 2000 धावांपासून 66 धावा दूर आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना दोन्ही संघांसाठी वर्षातील शेवटचा सामना आहे. या सामन्यात कोहलीने 66 किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर तो 7 वेगवेगळ्या वर्षांत 2000 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल.
याशिवाय जर विराट कोहलीने या कसोटी मालिकेत 71 धावा केल्या तर तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय ठरेल, सध्या तो चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीने 1236 धावा केल्या आहेत, दुसर्या क्रमांकावर असलेल्या सेहवागने 1306 धावा केल्या आहेत. कोहली 71 धावा करून सेहवागला मागे टाकू शकतो. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 1741 धावा केल्या आहेत.
The post IND vs SA 1st Test : 31 वर्षांचा इतिहास बदलण्यास भारत सज्ज appeared first on Bharat Live News Media.