Weekend ला वाहतूक कोंडीचे ‘पुणे दर्शन’! पार्किंगच्या समस्येने पर्यटक नाराज
नवीन वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी रविवारी (24) सिंहगड, राजगड, तोरणा किल्ल्यांवर पर्यटकांनी अलोट गर्दी केली होती. तसेच डिसेंबर महिन्यात शहरातील पर्यटन व धार्मिक स्थळे पाहण्यासाठी सहली, पर्यटक शहरात आल्याने मध्यवर्ती भागातील शनिवारवाडा, लालमहाल, नाना वाडा, महात्मा फुले वाडा परिसरातही पर्यटकांना गाड्या पार्क करायला जागाच मिळाली नाही. पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सिंहगड गर्दीने हाउसफुल्ल झाला, तर शहरात पर्यटकांना वाहतूक कोंडीने ‘पुणे दर्शन’ घडविले.
कसबा पेठ : ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक खाणाखुणा असलेल्या पुणे शहरास दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. पण पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधादेखील उपलब्ध नसल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरत आहे. शनिवारवाड्यात पर्यटकांसाठी वाहनतळ निःशुल्क आहे. इतर वाहनांसाठी प्रवेश मनाई आहे. या बाबतचे माहितीफलक शनिवारवाडा पार्किंग परिसरात लावण्यात आलेले आहेत. पण पार्किंग परिसरात फक्त पर्यटकांच्या गाड्या पार्क होतात का ? इतर नागरिकसुद्धा आपल्या गाड्या दिवसभर लावून जातात, याबाबत कोणतेही नियोजन पार्किंग परिसरात नाही. तसेच जवळपास दुसरे वाहनतळही उपलब्ध नाही. काही महिन्यांपूर्वी शनिवारवाडा पार्किंग परिसरात दोन्ही बाजूंस कर्मचारी होते, पण आता तेसुद्धा दिसत नाही त्यामुळे पार्किंग समस्यात भरच पडली आहे. गाड्या पार्क करण्यास जागा न मिळल्याने पर्यटकांना नाइलाजाने परिसरातील बाजीराव रस्ता, शिवाजी रस्त्यावर गाड्या नो-पार्किंगमध्ये पार्क कराव्या लागतात.
पर्यटकांमध्ये वाद
शनिवारवाडा परिसरात पार्किंग फुल्ल असल्याने पर्यटकांना गाड्या पार्क करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. तसेच जवळपास कोणतेही वाहनतळ उपलब्ध नसल्याने पर्यटकांनी परिसरात बाजीराव व शिवाजी रस्त्यावर नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क केल्या होत्या. परिसरातील सार्वजनिक स्वच्छता, पिण्याचे पाणी याबाबत माहिती फलकच नसल्याने पर्यटकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शनिवारवाड्याच्या डाव्या बाजूच्या गेटजवळ वाहनांची गर्दी झाल्याने पर्यटकांमध्ये बाचाबाचीही झाल्याचे पाहायला मिळाले.
सुट्यांच्या दिवशी अनेक पर्यटक शनिवारवाड्याला भेट देतात. परिसरात पार्किंगबाबत माहितीफलक, दिशादर्शक फलक व संबंधित कर्मचारी नसल्याने अनेक पर्यटक पार्किंगच्या प्रतीक्षेत बाजीराव रस्त्यावरील गेटवर रेंगाळताना दिसतात. त्यामुळे बाजीराव रस्त्यावरील मागील गाड्यांना पुढे जाण्यास जागा मिळत नसल्याने या भागात वाहतूक कोंडी झाली होती.
कल्याणी पाडोळे, पोलिस निरीक्षक, विश्रामबाग.
माहिती-फलक, दिशादर्शक फलकाची आवश्यकता
शनिवारवाडा पार्किंगमध्ये प्रवेश करण्यासाठी शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता अशा दोन्ही बाजूंनी प्रवेश करता येतो. शिवाजी रस्त्यावरील पार्किंगचे गेट अर्धवटच उघडण्यात येते, त्यामुळे येथून फक्त दुचाकीच आत जाऊ शकतात. याबाबत दर्शनीभागात पार्किंगबाबत कोणताही माहिती-फलक नाही. त्यामुळे चारचाकी वाहनचालकांनी गाड्या पार्क करायच्या कुठे या गोंधळात ते पडतात. त्यामुळे ते प्रवेशद्वारावर थांबलेले दिसतात. तसेच शैक्षणिक सहली व पुणे दर्शनच्या बस शिवाजी रस्त्यावर, बाजीराव रस्त्यावर पार्क केलेल्या दिसतात.
Latest Marathi News Weekend ला वाहतूक कोंडीचे ‘पुणे दर्शन’! पार्किंगच्या समस्येने पर्यटक नाराज Brought to You By : Bharat Live News Media.