Pune : ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वॉच नाइट उपासना
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्युतरोषणाईने उजळलेले चर्च…ठिकठिकाणच्या चर्चमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुका आणि सायंकाळी ख्रिश्चन समाजबांधवांनी एकत्र येऊन केलेली प्रार्थना…असे वातावरण रविवारी ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला विविध चर्चमध्ये पाहायला मिळाले. येशू यांच्या जन्मदिनानिमित्त रविवारी शहरातील विविध चर्चमध्ये सायंकाळी सहानंतर वॉच नाइट उपासना (विशेष भक्ती) करण्यात आली. तसेच, काही ठिकाणी मिरवणुकाही काढण्यात आल्या. रात्री बारानंतर येशू यांच्या जन्मोत्सवाला सुरुवात झाली अन् कॅम्पसह ठिकठिकाणी ख्रिसमस सेलिब्रेशनला रविवारी खर्या अर्थाने सुरुवात झाली. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला दरवर्षी चर्चमध्ये वॉच नाइट उपासना (विशेष भक्ती) करण्यात येते. त्यात मोठ्या संख्येने बांधव सहभागी होतात. यंदाही वॉच नाइट उपासना झाली आणि त्यात बांधवांनी एकत्र येऊन प्रार्थना केली. कॅम्प, खडकी, कोरेगाव पार्क आदी ठिकाणच्या चर्चमध्ये या विशेष भक्तीचे आयोजन केले होते. येशू यांच्या जन्मावर आधारित देखाव्यांची मिरवणूकही काढण्यात आली. सगळीकडे हर्षोल्हासाचे वातावरण पाहायला मिळाले. रात्री बारानंतर केक कापून नागरिकांनी सेलिब—ेशन केले. तर काही ठिकाणी कॅरल गीतांचा (आनंद गीते) कार्यक्रम आयोजित केला होता.
‘शांतता, सौहार्दाचे दूत म्हणून काम करा’
यंदा जगात अनेक ठिकाणी युद्ध, संघर्ष, वाद आणि हिंसाचार पाहायला मिळाला. त्यातून केवळ विनाश झाला. प्रभू येशू यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. प्रत्येकाने समाजामध्ये शांतता, एकता, सौहार्दाचे दूत म्हणून काम करावे. प्रभू येशू यांच्या जन्मदिनी, ख्रिसमसच्या दिवशी मी सर्वांना आशीर्वाद देतो, असा संदेश पुणे धर्मप्रांताचे बिशप जॉन रॉड्रिग्ज यांनी ख्रिसमसनिमित्त दिला आहे. आपल्या संदेशात रॉड्रिग्ज म्हणाले, ख्रिसमसच्या वेळी प्रभू येशू यांच्या जन्माचा देखावा घरांमध्ये, चर्चमध्ये असतो. प्रभू येशू हे प्रेमाचे प्रतीक आहेत. प्रेम आणि शांतता यालाच आयुष्यात स्थान हवे. तोच संदेश या ख्रिसमसला दिला जातो. सर्वांना आनंदी ख्रिसमस आणि नवीन वर्ष 2024 च्या खूप खूप शुभेच्छा.
Latest Marathi News Pune : ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला वॉच नाइट उपासना Brought to You By : Bharat Live News Media.