साहित्य संमेलनाच्या मांडवासमोरच विद्रोहीचा मांडव गरजेचा आहे का?
पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : विद्रोही या शब्दालाच माझा आक्षेप असून, साहित्यिक हा मुळातच विद्रोही वृत्तीचा असतो, म्हणूनच बहुतेकदा तो केवळ समाजाला रुचेल, आवडेल असे लेखन न करता समाजाला दिशादर्शक ठरेल असे लेखन करीत असतो. संतसाहित्यिकांपासून विद्रोहाची परंपरा सुरू झालेली असताना साहित्य संमेलनाच्या मांडवासमोरच विद्रोही साहित्य संमेलनाचा मांडव गरजेचा आहे का? असा सवाल अमळनेर येथे होणार्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी रविवारी केला. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित 23 व्या साहित्यिक कलावंत संमेलनात वाग्यज्ञे साहित्य व कलागौरव पुरस्काराचे वितरण डॉ. शोभणे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. साहित्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांना, तर कला क्षेत्रासाठीचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांना प्रदान करण्यात आला. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या वतीने त्यांचे बंधू विलास देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अनिल डेहड्राय, अभय बारटक्के आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
काळजी घ्या ! आगामी दोन दिवस राहणार थंडीचा जोर
Nashik News : गरम पाणी अंगावर पडल्याने चिमुकलीचा मृत्यू
मराठा समाज सर्वेक्षण : अटी, संदर्भ बदलले जाण्याची शक्यता
डॉ. शोभणे म्हणाले की, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरील अध्यक्ष हा विद्रोही साहित्यिक नाही आणि विद्रोही साहित्य संमेलनातील आम्हीच विद्रोही आहोत, ही भूमिका चुकीची आहे. जातीपातीच्या चक्रव्यूहात अडकून अडथळे निर्माण करणे आणि साहित्य संमेलनाला दोन कोटींचा निधी आवश्यक आहे का? असे निरर्थक प्रश्न उपस्थित करून मराठी साहित्य व्यवहारात खेकडा मनोवृत्ती दाखवून देण्याचा प्रयत्न यामध्ये दिसून येतो. साहित्यिक आणि कलाकारांनी त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन त्यांच्या कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणे आणि प्रश्न उपस्थित करणे आवश्यक आहे.
संमेलनात पुरस्कार वितरणाआधी मकरंद अनासपुरे यांची मुलाखत रंगली. राजेश दामले यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीत अनासपुरे म्हणाले की, मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून मुंबईत आल्यानंतर माझी थोडी भांबावलेली अवस्था होती. अभिनयक्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने संघर्ष खूप होता. परंतु, तो संघर्ष हा मी आनंदाने स्वीकारला. त्या संघर्षाच्या कालावधीत अनेक अपमानास्पद आणि अवहेलनात्मक प्रसंगांना मी सामोरा गेलो. परंतु, याचा खेद न बाळगत बसता मी ध्येयापासून माझे लक्ष विचलित होऊ दिले नाही. नाना पाटेकर यांना मी गुरुस्थानी मानतो. रुपेरी पडद्यावरचे माझे आगमन नाना पाटेकर यांच्यामुळे सुखकर झाले.
Latest Marathi News साहित्य संमेलनाच्या मांडवासमोरच विद्रोहीचा मांडव गरजेचा आहे का? Brought to You By : Bharat Live News Media.