ज्याचा त्याचा प्रश्न..!

वृत्तपत्र उघडल्याबरोबर असंख्य बातम्या अशा असतात की, ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात वाईट होते. खून, दरोडे आणि इतर काही बरेच उबग आणणारे असते; परंतु अशात एक बातमी वाचण्यात आली ती फार दिलासा देणारी आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास केलात, तर तुमच्या सहज लक्षात येईल की, सिगारेट, बिडी पिणार्‍यांचे आणि तंबाखू खाणार्‍यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. सार्वजनिक … The post ज्याचा त्याचा प्रश्न..! appeared first on पुढारी.

ज्याचा त्याचा प्रश्न..!

बोलबच्चन

वृत्तपत्र उघडल्याबरोबर असंख्य बातम्या अशा असतात की, ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात वाईट होते. खून, दरोडे आणि इतर काही बरेच उबग आणणारे असते; परंतु अशात एक बातमी वाचण्यात आली ती फार दिलासा देणारी आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास केलात, तर तुमच्या सहज लक्षात येईल की, सिगारेट, बिडी पिणार्‍यांचे आणि तंबाखू खाणार्‍यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि विशेषत: रेल्वे प्रशासनाने जागोजागी प्रतिव्यक्ती दोनशे रुपये दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे हे प्रमाण नक्कीच कमी झालेले नाही. यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे रेल्वे स्टेशन स्वच्छ दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवरही कुठेही अस्वच्छता नसते.
तुम्ही पूर्वीचा रेल्वे प्रवास आठवून पाहिला, तर दोन डब्यांच्या पॅसेजमध्ये किंवा गर्दीमध्येसुद्धा बीडीचा मनसोक्त धूर काढणारे आणि प्रचंड गर्दीच्या धकाधकीत स्वर्ग सुखाचा अनुभव घेणारे असंख्य लोक दिसत असत. या लोकांची संख्या आता कमी झाली आहे, हे निश्चित! कदाचित अशी व्यसने करणारे लवकरच स्वर्गवासी होऊन निघून गेले असतील आणि त्यांच्या पुढच्या पिढीने अशा व्यसनाचा धोका ओळखून बापाला असलेले व्यसन टाळले असावे, अशी शंका घेण्यास जागा आहे. काही लोकांच्या मते सिगारेटच्या पाकिटावर जे कॅन्सरचे फोटो गेल्या वीस वर्षांपासून लावले जात आहेत, त्याच्या भीतीमुळे हे प्रमाण कमी झाले असावे. एकंदरीत वैधानिक इशारा आणि तंबाखू, विडी आणि सिगारेटच्या पाकिटावर असलेले भीतीदायक चित्र बघून बर्‍याच लोकांनी या दोन्ही व्यसनांना रामराम केला असावा, असे दिसून येत आहे.
मोबाईलचे व्यसन हे एक नवीन व्यसन आल्यामुळे कदाचित ही जुनी व्यसने मागे पडली असावीत. म्हणजे दोन तासांचा रेल्वे प्रवास असेल आणि त्या वेळेला काहीच करण्यासारखे नसेल, तर उगाच रिकामपणाचा चाळा म्हणून काही लोक विडी किंवा सिगारेट पीत असावेत. लोकांना प्रवासात काय करावे, हा प्रश्न आता राहिलेला नाही. ते निवांत मोबाईलवर असलेले रिल्स, सिनेमे, बातम्या, मॅचेस, व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक पाहण्यामध्ये इतके गुंग झाले आहेत की, कुणाला विडी-काडीची आठवण येत नाही. प्रस्तुत लेखकाने नुकताच दोन हजार किलोमीटरचा रेल्वे प्रवास केला. एवढ्या प्रवासात चार दिवसांत एकही व्यक्ती रेल्वे स्टेशनवर फुंकताना आढळला नाही. सिगारेट, विडी पिणार्‍यांना ‘फुंके’ असे म्हणता येईल आणि तंबाखू खाऊन थुंकणार्‍यांना ‘थुंके’ असे म्हणता येईल.
गेल्या दहा वर्षांत थुंके आणि फुंके यांचे प्रमाण खूपच घटलेले दिसून आले आहे, ही फार महत्त्वाची आणि चांगली बाब. व्यसनांपासून दूर राहा असे कितीही सांगितले, तरी जे लोक ऐकत नव्हते त्या तुमच्या मनात प्रश्न येईल की, ही व्यसने बरी की मोबाईलचे व्यसन बरे? हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. आता रेल्वेमध्ये सिगारेट, विडी फुंकणारे आणि तंबाखू खाऊन पचा पचा थुंकणारे यांची संख्या कमी झाली असली, तरी मोबाईलवर दणादण आवाजात गाणी वाजवणारे यांची संख्या मात्र खूप वाढली आहे. इतर व्यसने करणारे लोक रेल्वेच्या डब्यांमध्ये चोरून, लपून आपली तलफ भागवून घ्यायचे; परंतु मोबाईलवाले मात्र मोठ्या आवाजात राजरोस सगळ्यांच्या समोर बसून, शांततेचा भंग करून इतर लोकांच्या डोकेदुखीला कारण होत आहेत. त्यांचे काय करायचे, याचाही विचार आज न उद्या आपल्याला करावा लागणार आहे. तूर्त रेल्वे प्रवासात विडी, काडी आणि तंबाखू हे प्रकार कमी झाल्यामुळे त्याचा आनंद साजरा करायला हरकत नाही.
Latest Marathi News ज्याचा त्याचा प्रश्न..! Brought to You By : Bharat Live News Media.