व्यापक पटावरचे ‘रिंगाण’

भारतीय साहित्यात महत्त्वाचं विधान करणारी कादंबरी म्हणून ‘रिंगाण’कडे पाहता येईल. दुभंगलेपण भोगणारी माणसं आपल्या भुईभोगाला, ऊरस्फोड दु:खाला स्वीकारून निमूटपणे जगत राहतात. मात्र, ज्यांचा रांजणच भुईत पुरला आहे; त्याचा शोध घेणार्‍या, माती-मुळाकडे जाणार्‍या मराठीतील एका भूमिनिष्ठ जाणिवेच्या कादंबरीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला, ही गोष्ट भूषणावह आहे. साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्ताने… आजची मराठी कादंबरी काल-त्रिकाल कवेत घेणारी … The post व्यापक पटावरचे ‘रिंगाण’ appeared first on पुढारी.

व्यापक पटावरचे ‘रिंगाण’

विष्णू पावले

भारतीय साहित्यात महत्त्वाचं विधान करणारी कादंबरी म्हणून ‘रिंगाण’कडे पाहता येईल. दुभंगलेपण भोगणारी माणसं आपल्या भुईभोगाला, ऊरस्फोड दु:खाला स्वीकारून निमूटपणे जगत राहतात. मात्र, ज्यांचा रांजणच भुईत पुरला आहे; त्याचा शोध घेणार्‍या, माती-मुळाकडे जाणार्‍या मराठीतील एका भूमिनिष्ठ जाणिवेच्या कादंबरीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला, ही गोष्ट भूषणावह आहे. साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्ताने…
आजची मराठी कादंबरी काल-त्रिकाल कवेत घेणारी कादंबरी आहे. बहुविध आशय-विषय असणारी, नागर-अनागर भेदभिंत पार करणारी आहे. अनेक आवाजी स्वरूप आज तिला प्राप्त होत आहे. जाणिवांचे अनंत स्तर, व्यथा-व्यवस्थांचे चित्रण समोर येत आहे. यात प्रकल्पग्रस्त-विस्थापितांचे चित्रण हा मराठी कादंबरीच्या कक्षेतला विषय आहे. यासंबंधी ‘पाणी’(बा. सी. मर्ढेकर) ते ‘धरणकळा’(ल. म. कडू) असाही एक आलेख काढता येईल. याच प्रदीर्घ पटावर अण्णा भाऊ साठे यांची ‘रानगंगा’ उभी आहे; त्या ‘वारणे’वर उभा राहिलेले ‘चांदोली धरण’ परिसरातील लेखक-कवींना नवद़ृष्टी देणारे ठरले. यात ‘देवाची साक्ष’(चंद्रकुमार नलगे), ‘बुडणारा गाव’(स. ग. यादव), ‘झाडाझडती’(विश्वास पाटील), ‘भुईपाश’(अशोक कोकाटे), ‘कविता धरणाआधीच्या आणि नंतरच्या’(वसंत पाटील) या लेखनकृतींचा समावेश होतो. याच धरण-अभयारण्य प्रकल्पातील ‘विस्थापितांच्या जगण्याचं’ चित्रण करणार्‍या ‘रिंगाण’ या कृष्णात खोत यांच्या कादंबरीला यंदाचा (2023) ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला, आणि ‘विस्थापितांच्या आवाजाला ऊर्जा मिळाल्याची’ भावना कादंबरीकार कृष्णात खोत यांनी यानिमित्त व्यक्त केली.
कृष्णात खोत हे व्याकूळ काळाला शब्दबद्ध करणारेे लेखक आहेत. नव्वदोत्तरी साहित्यिकांत जबाबदारीने लेखन करणारे, भूमी व भूमिका पक्की असणारे आणि निष्ठेने लेखनकार्य करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. साहित्य-संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित ‘शब्द’ हा कवितासंग्रह, हे त्यांचे पहिले पुस्तक होय. ‘गावठाण’(2005), ‘रौंदाळा’(2008), ‘झडझिंबड’(2012), ‘धूळमाती’(2014) आणि ‘रिंगाण’(2017) या कादंबर्‍या; ‘नांगरल्याविन भुई’ (2017) हा व्यक्तिचित्रणसंग्रह; हे त्यांचे प्रकाशित साहित्य. या संग्रहातील काही व्यक्तिचित्रे ही दै. ‘Bharat Live News Media’च्या ‘बहार’मध्ये ‘काळी माती’ या सदरात प्रकाशित झाली आहेत. तसेच विविध नियतकालिकांतून त्यांच्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. सातत्याने असा भू-जैविक द़ृष्टिकोन त्यांच्या लेखनाचे केंद्र राहिला आहे.
भारतीय साहित्यात महत्त्वाचं विधान करणारी कादंबरी म्हणून ‘रिंगाण’कडे पाहता येईल. ‘रिंगाण’ ही रूढ घटना-घटितांच्या पलीकडे जाणारी कादंबरी आहे. समस्यांचं नुसतं पसरटं स्तरीकरण न करता, उपलब्ध काळात व्यापक संदर्भपट उलघडून दाखवणारी आहे. प्रकल्पामुळे ‘गाव’ सोडून आणि ‘देव’ पाठीशी बांधून पिढ्यान् पिढ्या निसर्गाश्रितांचं विस्थापन होतं. आढंमेढी, कुळीडहाळी एकत्र नाही. दशदिशा पांगापांग. भयाणभूक दिवस समोर. अंत:करणं हळवी बनतात. वागणंबोलणं, खाणंराहणं, देवदेवस्की, प्रथापरंपरा चोळामोळा होऊन जातात. पावलापावलाला भुईभोग वाट्यास येतो. म्हणून ही कादंबरी ‘तुटल्या मुळांच्या कोंबांना’ अर्पण केली आहे.
‘रिंगाण’चा कथनकाळ दिसतो दोन दिवसांचा. देवाप्पाचं ‘मुदीवाली’ला आणायला जाणं आणि तिथं होणारा संघर्ष. यात लडीमागून लड सापडावी तशा अनेक आठवणी. त्या आठवणी नाहीत मुळी. हे काहीच येत नाही. जातीपातीचा, आडनावांचा उल्लेख नाही. हेच खरं माणूसपण वाटतं. इथं स्वप्नंसुद्धा देवाप्पाच्या म्हातारीला ‘सपान मनावरचं लिपान ढकलून दिल्यासारखं’ वाटतं, अन् देवाप्पा आणि त्याची वाढणारी म्हैसच दिसून येते. तिच्या कानात तांब्याची मुदी असते. तीच तिच्या पाळीवपणाची एक खूण.
गाव सोडताना जिथं आपलीच ‘जगायची पंच्याती’ आहे, तिथं जनावरांना नेऊन काय करायचं? म्हणून काहींनी जशी आपली जनावरं सोडली, तशीच नाइलाजानं ‘वांझलाटा’ मुदीवालीला सोडावी लागते. आधाराचे हात सुटतात. गाव उठतं. विस्थापित होतं. इकडेतिकडे चार-दोन वर्षं सरतात आणि देवाप्पाला समजतं, ‘मुदीवाली’ आता दूधदुभत्याची झाली आहे. साहजिकच, देवाप्पाची आई देवाप्पाला मुदीवालीला घेऊन येण्यासाठी मागं लागते. कशीतर आपल्याबरोबर दोघांना तयार करून देवाप्पा; ‘गाव सोडून आल्यापासून तिकडं जाणं झालं नव्हतं,’ त्या ‘मूळ ठाणका’कडे जायला निघतो. केवळ या तीनच प्रवाशांना घेऊन एसटी धरणपायथ्याशी थांबते. एसटीतून उतरल्यावर मात्र, ‘धरणाच्या भिंतीचं धूड’ म्हणजे ‘निसर्गाच्या दुनयेत माणसानं निर्माण केलेली दुनया’ बघत देवाप्पा. ‘भिंत डोळ्यांत मावंना’ म्हटल्यावर उठतो. चालू लागलो. आठवणी उचंबळून… आणि तेवढ्यात व्यवस्थाच जणू पेंगत असल्यासारखा गेटवरचा ‘मांजरमुरक्या’ हाक मारतो. जीव लख्खकन् हालतो. शेवटी हात जोडले जातात. ताडी आणण्याच्या बोलीवर सुटका होते. जसा चालत राहतो तसा मोडून पडलेल्या गावाचा ‘भयसूर’ चेहरा देवाप्पाला सतावत राहतो. त्यातही ‘रात्रीचा डोळं बांधून गावाकडं जाईल’ इतका प्रचंड आत्मविश्वास असल्यामुळं उभ्या वाटांचा त्याला आधीच ‘आदमास’ असतो. जसजसा पुढं… तसतसा तो रानवारा पिऊन अधिक खुला होतो.
‘जनाईवाडीच्या झर्‍यावर पालथंच पडून तोंड लावून देवाप्पा पोटभर पाणी’ पितो. आता मात्र देवाप्पाच्या आत जे जे काही दडपून असतं, ते ते उसळी मारून वर येतं. देवाप्पा ‘ओळखीची ओळख करत’ निघतो. नामशेष झालेल्या गावभूमीकडे. ही ओढ इतकी अनावर की, देवाप्पाचं वागणं हे आपल्या आदिम जगण्याचं मूळ ठरतं. मुळांचा शोध घेणारं. भूमीचं दर्शन अखेर त्याचा शिणवटा कुठल्याकुठे पळवणारं. आणि एकदाचा त्याचा म्हशींचा शोध पुरा होतो. दिवस मावळतो. ती सबंध रात्र देवळात सरते. आता दुसरा दिवस… पुन्हा मुदीवाली डोळ्यापुढे. शाळूसोबती गळाटतात. नाना खटपटी करून देवाप्पा एकटाच रेडकाला धरतो. ही अवस्था थरारून सोडते. ‘माणसानं तुमाला दावणीला बांधली की तुमी माणसाला’ याचा ‘फेसला पाडायचा’ या एकाच विचारानं देवाप्पा त्याचा न उरतो. अखेर म्हशी ‘हद्द’ सोडत नाहीत आणि देवाप्पाला ती सापडत नाही. संघर्ष फक्त त्याचा आणि तिचाच? नाही! घोड्याच्या नालाचा आकार घेऊन सार्‍याच म्हशी त्याच्याविरुद्ध… आणि ‘भरला शेर’ इथंच लवंढणारा. हा कादंबरीचा पृष्ठस्तर. ‘रानटी ते पाळीव’ ‘पाळीव ते रानटी’ असे वर्तुळ पूर्ण. हे केवळ म्हशीबद्दल नाही. सृष्टीतील एकूण प्राण्यांच्या जगण्याचे पूर्ण वर्तुळ आहे. ‘आपली मुळं आम्ही तोडू दिली.’ असं एक जैविक पर्यावरण.
कादंबरीचा अंत:स्तर निराळाच. मानसतज्ज्ञ तिला ‘नवउत्क्रांतिवादाकडे जाणारी’ म्हणतात. खरे आहे. मानव-प्राणी हा संघर्षच सनातन. परंतु, ज्या दिशेने आपण आता जात आहोत, त्याचा सूचक इशारा म्हणजे ही कादंबरी. ‘तू घावचील माझ्या तावडीत. नाही तुझं काढलं रिंगाण तर बघ.’ या युद्धखोर प्रवृत्तीचं प्रतीक ही कादंबरी ठळक करते. आदिमावस्था, शिकार ते शेती, वस्ती… अशा व्यापक संदर्भपटावर ही कादंबरी भाष्य करते. मानवी धारणा शोधायला भाग पाडते.
साहित्य अकादमी पुरस्काराच्या निमित्ताने एक झालं. अनगड वाटा खुल्या झाल्या. मुळात, लेखक आपली भूमिरीत सांगत असतो. त्याच्या जाणीव-नेणिवेत एक प्रदेश सतत वसत असतो. तो त्या प्रदेशाला लगटून असतो, तोच त्याच्या लेखणीतून स्रवत असतो. या अर्थाने कादंबरीकार कृष्णात खोत यांचे सर्जनकार्य कृषिसंस्कृतीच्या मूल्यनिकषांवर उभे आहे. जीवकेंद्री विश्वद़ृष्टीचा प्रत्यय देणारे आहे. या कादंबरीत क्रियापदं अल्प प्रमाणात येतात. अद्भुत असा निसर्ग येतो. या निसर्गवृत्तीचा संस्कार ‘मूळं’ शोधणारा ठरतो. असाच कादंबरीतील भाषिक भांडाराबद्दल स्वतंत्र विचार करता येईल. अनेक अंगांनी या कादंबरीची चर्चा करता येईल. अर्थवाही शब्दकळा, प्रवाहीपणा हे तर कादंबरीचं अंगभूत वैशिष्ट्य आहे. मराठी कादंबरीला ‘मुरडाण’ प्राप्त करून देणारी कादंबरी म्हणून ‘रिंगाण’कडं पाहता येईल. दुभंगलेपण भोगणारी माणसं आपल्या भुईभोगाला, ऊरस्फोड दु:खाला स्वीकारून निमूटपणे जगत राहतात. मात्र, ज्यांचा रांजणच भुईत पुरला आहे; त्याचा शोध घेणार्‍या, माती-मुळाकडे जाणार्‍या मराठीतील एका भूमिनिष्ठ जाणिवेच्या कादंबरीचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला, ही गोष्ट भूषणावह आहे.
Latest Marathi News व्यापक पटावरचे ‘रिंगाण’ Brought to You By : Bharat Live News Media.