रफी नावाचं गारुड!
संतोष देशपांडे
महंमद रफी म्हणजे तमाम संगीतप्रेमी रसिकांचे आवडते गायक. एक गायक म्हणून ते जितके प्रतिभाशाली होते, तितकेच एक व्यक्ती म्हणूनही निगर्वी, साधे आणि तितकेच नम्र. रफी यांच्या गाण्यातून एक पर्व साकारतं. स्वरमयी अस्तित्वातून ते रसिकांचे भावविश्व अजूनही उजळवून टाकतात. ही किमया खूपच कमी गायकांना जमली आहे. त्यांची जन्मशताब्दी आजपासून (दि.24) सुरू होत आहे. त्यानिमित्त…
आपल्या गायकीतील गोडवा रसिकांच्या मनापर्यंत पोहोचवीत, त्यांना समृद्ध करणारे पार्श्वगायक महंमद रफी म्हणजे भारतीय चित्रपट संगीत क्षेत्रातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व. आवाजातील गोडवा, मिठास, आर्तता आणि सहजता यातून त्यांची असंख्य गाणी आजही आपल्याला झपाटून टाकतात. जेमतेम 55 वर्षे आयुष्य लाभलेल्या रफी साहेबांनी आपला काळ असा गाजविला की, आज त्यांची जन्मशताब्दी आली तरी गाण्यांच्या माध्यमातून रफीसाहेब आपल्या स्वरमयी अस्तित्वातून रसिकांचे भावविश्व अजूनही उजळवून टाकतात. ही किमया खूपच कमी गायकांना जमली आहे.
पंजाबमधील अमृतसरनजीकच्या कोटला सुल्तानसिंग या गावी महंमद रफी यांचा पंजाबी जाट मुस्लिम परिवारात जन्म झाला. गावातल्या फकिराचे गायन त्यांना बालवयात लुब्ध करीत होते. पुढे 1935 मध्ये त्यांचे वडील लाहोरला जाऊन स्थायिक झाले. सुरुवातीला रफी यांनी शास्त्रीय संगीताचे धडे किराणा घराण्याचे गायक उस्ताद अब्दुल वाहिद खान, पं. जीवनलाल मट्टू आणि फिरोज निझामी यांच्याकडून घेतले. लाहोर येथे असतानाच, वयाच्या 13 वर्षी त्यांनी पहिल्यांदाच जाहीर गायन केले. 1941 मध्ये ‘गुलबलोच’ या पंजाबी चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. त्याच काळात त्यांना आकाशवाणीच्या लाहोर केंद्रात गायनाची पहिली संधी मिळाली. 1944 मध्ये रफीसाहेब मुंबईत येऊन दाखल झाले. भेंडीबाजार येथील एका छोट्या खोलीत ते राहायला होते. इथे, हळूहळू संगीत क्षेत्रातील दिग्गजांशी त्यांच्या ओळखी होऊ लागल्या. इथेच पहिला ब्रेक मिळाला, तो संगीतकार नौशाद यांच्या ‘पहले आप’ या चित्रपटात. त्याच सुमारास, ‘गाँव की गोरी’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. त्यातील ‘अजी दिल को काबू में’ हे आपलं पहिलं हिंदी गाणं असल्याचं रफीसाहेब स्वतः मानत. या काळात नौशादजींकडून त्यांना अनेक संधी मिळाल्या. खरं सांगायचं झालं, तर नौशाद यांनीच त्यांना खरा ब्रेक दिला. ‘चांदनी रात’, ‘दिल्लगी’ व ‘दुलारी’ यांसारख्या चित्रपटांत रफींना संधी मिळाली. थोडक्यात, 1945 ते 50 या पाच वर्षांत महंमद रफी हे नाव झपाट्याने पुढं आलं आणि त्यांची जादू पुढील दशकांत उत्तरोत्तर वाढतच गेली. नौशाद, ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन, एस. डी. बर्मन व रोशन यांच्यासाठी साठच्या दशकात रफींनी गायलेल्या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले.
नौशादजींसाठी रफी यांनी सुमारे 149 गाणी ध्वनिमुद्रित केली. 1944 मध्ये नौशादजींशी जुळलेलं नातं पुढे प्रत्येक चित्रपटागणित द़ृढ होत गेलं. ‘बैजू बावरा’ (1952) मधील ‘ओ दुनिया के रखवाले’, ‘मन तरपत हरी दर्शन को’, ‘तू गंगा मी मौज’ अशा गाण्यांनी महंमद रफी हे नाव रसिकांच्या मनावर कायमच कोरलं गेलं. रफींच्या पूर्वी नौशाद यांनी तलत मेहमूद यांनाच प्राधान्य दिले होते. मात्र, रफींच्या आगमनानंतर त्यांनी तलतऐवजी रफीलाच आपल्या बहुतांश चित्रपटांसाठी पार्श्वगायनाची संधी दिली.
सचिनदेव बर्मन म्हणजेच एस. डी. बर्मन आणि महंमद रफी यांचंही एक आगळं ट्युनिंग जमलं होतं. 1955 च्या सुमारास गुरुदत्त आणि देव आनंद यांचं युग सुरू झालं होतं. तेव्हा, बर्मनदांनी रफीला देव आनंद आणि गुरुदत्तचा आवाज बनवलं. बर्मनदांसोबत रफींनी सुमारे 37 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं. त्यातील बहुतांश गाणी अतिशय गाजली. ‘प्यासा’ व ‘कागज के फूल’ हे तर चित्रपटसृष्टीत आजही मैलाचे दगड समजले जातात. ‘ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, कहा नाझ है हिंदपे वो कहा है’ असा आर्त स्वर विचारणारा गुरुदत्त आजही आपल्या डोळ्यापुढं येतो; पण तो आवाज रफींचा आहे, हे कळतही नाही इतका तो गुरुदत्तमय झालेला असतो. हेच रफी साहेबांचं वैशिष्ट्य. तीच बाब देव आनंद यांच्या चित्रपटांसाठीच्या पार्श्वगायनाची. ‘दिल का भंवर करे पुकार, तू कहा ये बता’(तेरे घर के सामने), ‘अपनी तो हर आह एक तुफान है’(काला बाजार), ‘आखों ही आखोंमे इशारा हो गया’(सीआयडी), ‘तेरे मेरे सपने, दिन ढल जाए’(गाईड), ‘मेरा मन तेरा प्यासा’(गॅम्बलर), ‘दिल पुकारे आरे आरे’(ज्वेलथिफ), ‘दिवाना मस्ताना हुआ दिल’ (बम्बई का बाबू), किती किती गाणी सांगायची. देव आनंदची अशी कित्येक गाणी रफींनी अजरामर केली आहेत. विशेषतः किशोरकुमारपूर्वी रफी हेच देव साहेबांचे आवाज बनले होते. तेव्हा किशोरदा अभिनयातही नशीब आजमावत होते.
प्रत्येक संगीतकाराची स्वतःची अशी एक खासियत होती. शंकर-जयकिशन यांनीही आपल्या संगीताचे एक वेगळेपण जोपासले होते. रफी साहेबांचं त्यांचं नातं जुळलं, ते 1949 च्या ‘बरसात’पासून. शंकर-जयकिशन यांनी रफी साहेबांचा आवाज प्रामुख्याने राजेंद्र कुमार आणि शम्मी कपूर यांच्यावर चित्रित गाण्यांसाठी वापरला. बहुतांश गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. ‘तेरी प्यारी प्यारी सूरत को’ (ससुराल), ‘बहारों फूल बरसाओ’(सूरज), ‘चाहे कोई मुझे जंगली कहे’(जंगली), ‘दिल के झरोकोंमें’ (ब्रह्मचारी), ‘आवाज देके हमे तुम बुलाओ’(प्रोफेसर) अशी किती किती गाणी सांगायची?
आपल्या उडत्या चालींसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण शैलीसाठी ओ. पी. नय्यर ओळखले जातात. रफी साहेबांच्या आवाजातील गोडव्याचा अत्यंत सुरेल वापर त्यांनी आपल्या गाण्यांमधून केला. विनोदवीर जॉनी वॉकर यांच्यावर चित्रित ‘ऐ दिल है मुश्कील जीना यहां’ हे ओ. पी. नय्यर यांनीच संगीतबद्ध केलेलं. विशेष म्हणजे, त्यांनीच रफी यांना किशोरकुमार यांच्यावर चित्रित ‘रागिनी’ चित्रपटात ‘मन मोरा बावरा’ या गाण्यासाठी संधी दिली. एका महान गायकाला दुसर्या महान गायक अभिनेत्यासाठी पार्श्वगायनाचा संयोग त्यांनी जुळवून आणला. ‘नया दौर’, ‘तुमसा नही देखा’, ‘एक मुसाफिर एक हसिना’, ‘कश्मीर की कली’ यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी ओ. पी. नय्यर यांनी रफी साहेबांचाच आवाज वापरला. नय्यर साहेबांसाठी रफी यांनी तब्बल 197 गाणी गायली, यातूनच त्यांची केमिस्ट्री किती जुळली होती, हे लक्षात येऊन जातं. पुढे त्यांच्यातील नात्यात काहीसा दुरावा आला व तीन वर्षे नय्यर यांनी रफी साहेबांना संधी दिली नाही. तथापि, या जोडीने आविष्कृत केलेली प्रत्येक रचना आजही रसिकांच्या मन घर करून आहे. ‘ये चांद सा रोशन चेहरा…’ असं म्हणताक्षणी प्रत्येकाच्या मनात ‘कश्मीर की कली’ खुलते, ती आजही.
आपल्या निवडक आणि नितांतसुंदर रचनांसाठी प्रसिद्ध संगीतकार रवि यांनीही रफी साहेबांच्या आवाजात आपल्या मास्टरपीस म्हणता येतील, अशा रचना साकारल्या. रफी यांना लाभलेल्या पहिल्या फिल्मफेअर पुरस्काराची मानकरी ठरलेली रचना म्हणजे ‘चौधवी का चांद’(1960)चे संगीत रवि यांचेच. 1968 मध्ये आलेल्या ‘नीलकमल’मधील गाण्यांनीही इतिहास रचला. ‘तुझको पुकारे मेरा प्यार’ हे गाणं कधी कुणाच्या विस्मरणात जाऊ शकते का? याच चित्रपटातील ‘बाबुल की दुआऐ लेती जा’ या भावोत्कट गीतासाठी रफी साहेबांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार लाभला. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी आपणास रडू आवरले नाही, असे खुद्द रवि यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. रवि साहेबांसोबत रफी साहेबांनी ‘चायना टाउन’ (1962), ‘काजल’(1965) आणि ‘एक फूल दो माली’(1969) या चित्रपटांतील गीतांनाही आपला आवाज दिला. रवि साहेबांप्रमाणेच, रफी यांनी आणखी एक प्रतिभावंत संगीतकार मदनमोहन यांच्यासाठी निवडकच मात्र आजही मनाचा ठाव घेतील, अशा रचना गायल्या. ‘तेरे आखों के सिवा दुनिया में रखा क्या है’, ‘ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नही’, ‘तुम जो मिल गये हो’, ‘मेरी आवाज सुनो’ तसेच ‘आपके पहलू में आकर रो दिए’ अशा अनेक गीतांचा त्यात समावेश होतो. रफी साहेबांनी अजरामर केलेली ‘कर चले हम फिदा’ ही देशभक्तीपर रचना मदनमोहन यांचीच होती.
1960 नंतर उदयास आलेल्या लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने रफी साहेबांसोबत त्यांचा पहिलाच चित्रपट केला. तो म्हणजे, ‘पारसमणी.’ त्यातील ‘वो जब याद आएँ’, ‘बहोत याद आएँ’ हे लतादीदींसोबतचे युगलगीत हिंदी सिनेमातील सर्वोत्तम युगलगीतांपैकी एक समजले जाते. ‘पारसमणी’पाठोपाठ आलेल्या ‘दोस्ती’(1964) या चित्रपटातील गीतांनी मिळवलेली लोकप्रियता अजूनही तशीच आहे. त्यातील ‘चाहूँगा मै तुझे सांजसवेरे’ या गीताला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रफी साहेबांना लाभलेल्या एकूण पुरस्कारांपैकी या संगीतकार जोडीसोबतच्या गाण्यांनीच सर्वाधिक पुरस्कार मिळविले.
लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याबरोबरीनेच पुढे आलेल्या कल्याणजी-आनंदजी यांनीही रफी साहेबांच्या सुमारे 170 रचना संगीतबद्ध केल्या. ‘राज’, ‘जब जब फूल खिले’, ‘ब्लफमास्टर’, ‘गीत’, ‘कुर्बानी’, ‘हसीना मान जाएगी’ अशा कित्येक चित्रपटांतील गाणी अजूनही रसिकांच्या मनाला वारंवार स्पर्श करतात.
आणखी एक महान संगीतकार, ज्यांच्या रचना रफी साहेबांच्या आवाजातून आमच्या मनास कायम साद घालतात, ते म्हणजे रोशन. साहिर यांच्या शब्दांतून फुललेली ‘तुम एक बार मुहब्बत का इम्तेहान तो लो’ हे 1960 मधील गाणं असो की, ‘जिंदगीभर नही भुलेगी बरसात की रात’ हे शीर्षकगीत असो. ‘आरती’(1962)मधील ‘अब क्या मिसाल दू’ सारखी सर्वच गाणी अप्रतिम, अद्वितीय. ‘जो बात तुझमें है’ (ताजमहल, 1963), ‘दिल जो न कह सका’ (भीगी रात, 1965), ‘हम इंतजार करेंगे’, ‘तेरा कयामत तक’ (बहु बेगम, 1967), ‘मिले न फूल तो काटोंसे दोस्ती कर ली’ (अनोखी रात, 1968) अशा रोशन यांच्या काही निवडक रचना रफी साहेबांच्या आवाजात आजही आपल्या भावजीवनात कधी अवचित तरंग उमटवतात.
1970 च्या दशकात रफी साहेबांना घशाच्या संसर्गाचा त्रास सुरू झाला. आणि त्याच काळात ‘आराधना’ चित्रपटाच्या माध्यमातून किशोरकुमार यांनी धडाक्यात पुनरागमन केले. सत्तरीच्या या आव्हानाच्या काळातही रफी साहेबांनी अनेक अप्रतिम रचना गायल्या. 1974 मध्ये त्यांनी ‘तेरी गलियो में न रखेगे कदम’ (हवस, 1974) या गाण्यासाठी फिल्मवर्ल्ड मॅगझीनचा सर्वोत्तम गाण्यासाठीचा पुरस्कार मिळविला. त्यानंतर राहुलदेव बर्मन तसेच अनेक नवीन संगीतकारांसमवेतही त्यांनी काम केले. तोवर ऋषी कपूर, विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना यांचे राज्य पडद्यावर आलेले होतेच. रफी साहेबांनी अनेक मराठी गीतेही गायली. ‘शोधिशी मानवा’, ‘हे मना आज कोणी बघ तुला साद घाली’, ‘प्रभू तू दयाळा’ अशी त्यांची अनेक गाणी मराठी रसिकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत.
रफी साहेबांनी आजवर हजारो हिंदी गाणी गायली आहेत. त्यांच्या नेमक्या आकड्याविषयी मतांतरे आहेत. त्यांनी 7405 गाणी गायली, असे एका ऑनलाइन रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. 1977 मध्ये लता मंगेशकर यांनी सर्वाधिक हिंदी गाणी गायली असलाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. त्यास रफी साहेबांनी आव्हान देऊन आपण सर्वाधिक गाणी गायली असल्याचा दावा केला होता. काही काळ हा वाद सिनेविश्वात चांगलाच गाजला होता. पुढे लतादीदी आणि रफीसाहेब या दोघांनाही बाजूला सारत आशा भोसले यांनी 2011 मध्ये आपल्या नावे हा विक्रम नोंदविला, हे इथे उल्लेखनीय.
असे हे महंमद रफी म्हणजे तमाम संगीतप्रेमी रसिकांचे आवडते. एक गायक म्हणून ते जितके प्रतिभाशाली होते, तितकेच एक व्यक्ती म्हणूनही निगर्वी, साधे आणि तितकेच नम्र. आपल्या आयुष्यात अनेकांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. आज दोन-चार गाणी हिट होताच स्टारडम डोक्यात जाणार्यांच्या काळात रफी साहेबांचे वेगळेपण अधिक तीव्रतेने अधोरेखित होतं कारण रफीसाहेब जेव्हा गाणी म्हणतात, तेव्हा त्यातून एक पर्व साकारतं. संगीतावर अफाट प्रेम करणारे रसिक जोवर असतील, तितकेच हे पर्वही मनामनात जपले जाणार आहे. रफी नावाचं गारुड कायम राहणार आहे.
Latest Marathi News रफी नावाचं गारुड! Brought to You By : Bharat Live News Media.