सायबर ठकसेनांना ‘लगाम’

संवाद-संपर्क माध्यमांचा वाढता वापर, प्रत्येक कामात डिजिटल अवलंबित्व आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला बूस्टर मिळाला असला तरी दुसर्‍या बाजूला सायबर चोरांच्या कारवायाही झपाट्याने वाढल्या आहेत. आधुनिक बँकिंग प्रणालीमध्ये ग्राहक ए.टी.एम. आणि इंटरनेट सुविधांशी जोडलेले असल्याने सायबर गुन्हेगारांचे फावले आहे. इंटरनेटच्या प्रचार, प्रसार आणि वापरामुळे आर्थिक व्यवहारांना नवी दिशा मिळाली आहे. ‘डिजिटल इंडिया’ ही … The post सायबर ठकसेनांना ‘लगाम’ appeared first on पुढारी.

सायबर ठकसेनांना ‘लगाम’

महेश कोळी, आय.टी. तज्ज्ञ

संवाद-संपर्क माध्यमांचा वाढता वापर, प्रत्येक कामात डिजिटल अवलंबित्व आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला बूस्टर मिळाला असला तरी दुसर्‍या बाजूला सायबर चोरांच्या कारवायाही झपाट्याने वाढल्या आहेत. आधुनिक बँकिंग प्रणालीमध्ये ग्राहक ए.टी.एम. आणि इंटरनेट सुविधांशी जोडलेले असल्याने सायबर गुन्हेगारांचे फावले आहे.
इंटरनेटच्या प्रचार, प्रसार आणि वापरामुळे आर्थिक व्यवहारांना नवी दिशा मिळाली आहे. ‘डिजिटल इंडिया’ ही मोहीम सुरू झाली तेव्हा अनेकांनी भारतासारख्या खेड्यापाड्यांत वसलेल्या देशामध्ये वीज, इंटरनेटसेवा, मोबाईल सेवा उपलब्ध नसताना डिजिटलायजेशन कसे शक्य होणार, असे म्हणत टीका केली होती; परंतु आज शहरा-महानगरांतूनच नव्हे, तर खेड्यापाड्यांतून, दुर्गम भागातून इंटरनेटचा वापर वाढला आहे आणि पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण काही सेकंदांमध्ये केली जात आहे. भारताची यूपीआय प्रणाली ही जगातील अनेक विकसनशील, गरीब देशांसाठी आदर्श ठरली आहे. भारतात विकसित झालेले डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर जगभरात प्रशंसले जात आहे. डिजिटलायजेशनची ही बाजू जितकी उत्साहवर्धक, अभिमानास्पद आणि आशादायक आहे, तितकीच दुसरी बाजू काहीशी चिंता वाढवणारी आणि आव्हानात्मक आहे. ही बाजू म्हणजे वाढलेली सायबर गुन्हेगारी आणि या ठकसेनांकडून घातले जाणारे गंडे. काही वर्षांपूर्वी अशा प्रकारची ऑनलाईन फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार मेल पाठवून संबंधितांच्या बँक खात्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असत. त्यानंतर मोबाईल मेसेजद्वारे त्यांनी हे काम करण्यास सुरुवात केली. थेट कॉल करूनही लोकांची फसवणूक करण्यातही ते मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. निष्पाप, निरपराध लोकांना फोन करून त्यांचे बँक तपशील मिळवायचे आणि काही मिनिटांत त्यांच्या खात्यावर डल्ला मारून ते रिकामे करायचे, असे उद्योग अलीकडील काळात प्रचंड वाढले आहेत. संवाद माध्यमांचा वाढता वापर, प्रत्येक
कामाबाबत वाढलेले डिजिटल अवलंबित्व आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे सायबर चोरांच्या कारवायांना चालना मिळाली आहे. लोकांची फसवणूक करण्यासाठी हे ठकसेन वेगवेगळे मार्ग शोधत राहतात. आधुनिक बँकिंग प्रणालीमध्ये ग्राहक स्वयंचलित टेलर मशीन आणि इंटरनेट सुविधांशी जोडलेले असल्याने, बहुतेक सायबर गुन्हेगार लोकांच्या बँक खात्यांवर लक्ष ठेवतात.
ते खोटे संदेश आणि ‘इंटरनेट लिंक’ पाठवून लोकांची दिशाभूल करतात. त्यांचा संदेश उघडताच चोर त्यांच्या बँक खात्यात प्रवेश मिळवतात. असे घोटाळेबाज केवळ भारतातच नाही, तर जगाच्या कोणत्याही भागात बसून आपली कारस्थाने यशस्वी करू शकतात. भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा अस्तित्वात असूनही आणि आपली डिजिटल बँकिंग प्रणाली अभेद्य राखण्याचा कसोशीने प्रयत्न करूनही आपल्या देशात रोज हजारो लोक अशा फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे देशातील बँकिंग प्रणालीबरोबरच सरकारपुढेही हे एक मोठे आव्हान बनून राहिले आहे.
आयआयटी कानपूरमधील फ्यूचर क्राईम रिसर्च फाऊंडेशन या स्टार्टअपच्या ‘ए डीप डाइव्ह इन टू सायबर क्राईम ट्रेंडस इम्पॅक्टिंग इंडिया’ नामक एका सर्वेक्षणानुसार, जानेवारी 2020 ते जून 2023 पर्यंत देशात 75 टक्क्यांहून अधिक सायबर गुन्हे हे वित्तीय फसवणुकीसाठी झाले. यातील 50 टक्के प्रकरणे ही यूपीआय आणि इंटरनेट बँकिंगशी संबंधित होती. या काळातील ऑनलाईन गुन्ह्यांमध्ये 12 टक्के हिस्सा सोशल मीडियाशी संबंधित गुन्ह्यांचा राहिला. अलीकडेच ‘क्विक हिलच्या सेक्युराइट लॅब्स’च्या अहवालामधूनही ही बाब निदर्शनास आलीय. या यादीनुसार, मुंबईत 7 दशलक्ष सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
या समस्येवर मात करण्यासाठी केंद्रीय दळणवळण विभाग आता एक पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून अशा फसवणूक करणार्‍यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. हे पोर्टल अशा गुन्हेगारांची ओळख पटवेल आणि त्यांच्यावर कडक कारवाई करेल. या पोर्टलमुळे सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यास नक्कीच मदत होईल, असा सरकारचा दावा आहे. वास्तविक, याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम सुरू केली असून, त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत; पण चोर नेहमी आपल्यापुढे चार पावले असतात, असे म्हटले जाते. त्यामुळे अशा प्रयत्नांना यश लाभण्यास मर्यादा येतात.
अलीकडील काळात व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, फेसबुक आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शिरून सायबर गुन्हेगार लोकांची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते अशा धूर्त पद्धती वापरतात की केवळ अशिक्षित किंवा ग्रामीण लोकच नाही, तर सुशिक्षित, उच्चशिक्षित, शहरी लोकही त्यांच्या जाळ्यात येतात. या ठकसेनांनी अनेक कंपन्यांच्या खात्यांवरही डल्ला मारला आहे. इतकेच नव्हे, तर भारतातील अनेक बँकांनाही सायबर गुन्हेगारांनी भगदाड पाडल्याचे दिसून आले आहे. ही समस्या एकट्या भारताची नसून, जगभरातील सरकारे, बँकिंग प्रणाली आणि डेटा संकलन प्रणालीसाठी हे गुन्हेगार आव्हान बनले आहेत.
इतर देशांच्या तुलनेत भारतातील दक्षतेची पातळी कमी असल्याचे दिसून येत असल्याने सायबर गुन्हेगारांच्या कारवायाही येथे जास्त आहेत. अशा गुन्हेगारांची नवीन केंद्रे तयार होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे फसवणूक करणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी काही बँकांनी त्यांच्या सुरक्षा व्यवस्था केली असली, तरीही हे लबाड गुन्हेगार घुसखोरीचा मार्ग शोधण्यात यशस्वी होताहेत. हे लक्षात घेता, भारतीय दळणवळण विभाग या गुन्हेगारांना रोखण्यासाठी किती भक्कम आणि व्यावहारिक ढाल तयार करतो, हे पाहावे लागेल. काही वर्षांपूर्वी जेव्हा लोक नको असलेल्या कॉल्समुळे हैराण झाले होते, तेव्हा दळणवळण विभागाने लोकांना एक नंबर उपलब्ध करून दिला होता, ज्यावर कॉल करणार्‍याचा नंबर टाकल्यास तो आपोआप रद्द केला जायचा. अशाच प्रकारची सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करून द्यावी लागेल. जेणेकरून लोक अशा चोरांविरुद्ध तक्रारी नोंदवू शकतील. आज सायबर गुन्हेगार कक्ष बर्‍याच प्रमाणात सक्रिय आहेत आणि ते चांगली कामगिरीही करत आहेत; परंतु आता या कामी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतल्यास ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे बर्‍याच प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते.
Latest Marathi News सायबर ठकसेनांना ‘लगाम’ Brought to You By : Bharat Live News Media.