सोलापूर : उडगीत सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बॅनरची विटंबना; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

उडगी: Bharat Live News Media वृत्तसेवा : उजनीतील पाणी कुरनूर धरणात येण्याआधीच पाण्याचा श्रेयवाद अक्कलकोट मतदारसंघात चांगलाच रंगला आहे. विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पाण्यावरून डिजिटल बॅनरबाजीचा विषय चांगलाच चर्चेत आला आहे. दरम्यान, तालुक्यातील उडगी येथे आज (दि.२२) पहाटे म्हेत्रे यांच्या डिजिटल बॅनरवर अज्ञात व्यक्तीने शेणफेक केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि म्हेत्रे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. टायर जाळून निषेध करत रास्ता रोको केला.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलीस पाटील यांनी दक्षिण पोलीस स्टेशनला तात्काळ कळवली. आंदोलकांनी संबंधित अज्ञात व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन करीत कायदा -सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला. उजनी धरणातून तालुक्यातील कुरनुर धरणात पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे दोन्ही आजी-माजी आमदारांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून या संदर्भातील डिजिटल बॅनर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात झळकत आहेत.
आठ दिवसांपूर्वी अक्कलकोट शहरात म्हेत्रे यांचे डिजिटल बॅनरची तोडफोड झाली आहे. आज पहाटे उडगी येथे बसस्टँड समोरील म्हेत्रे यांच्या डिजिटल बॅनरवर शेणफेक केल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होते.
या घटनेसंदर्भात तक्रार दाखल करण्यासाठी अद्यापही कोणीही आलेले नाही. संबंधित घटनेबाबत लेखी तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात येईल. शांतता राखत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये.
महेश स्वामी, पोलीस निरीक्षक, दक्षिण पोलिस स्टेशन अक्कलकोट
हेही वाचा
सोलापूर : अकलूज-माळशिरस मार्गावर शैक्षणिक सहलीच्या बसचा अपघात, १ शिक्षक ठार तर ४ जखमी
सोलापूर : समांतर जलवाहिनीच्या ३८२.६८ कोटी वाढीव निधीस प्रशासकीय मान्यता
सोलापूर : एसटी बसमध्ये राहिलेली पाच लाख ऐवजाची पिशवी महिला प्रवाशाला परत
The post सोलापूर : उडगीत सिद्धाराम म्हेत्रे यांच्या बॅनरची विटंबना; काँग्रेस कार्यकर्त्यांचा रास्ता रोको appeared first on Bharat Live News Media.
