तळवडे दुर्घटनेतील कामगारांच्या मृत्यूचा जबाब द्या : कष्टकऱ्यांचे आंदोलन

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल कारखान्यास स्फोट होऊन लागलेल्या आगीत 14 कामगार महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये महापालिका, कामगार आयुक्त विभाग, पोलिस प्रशासन, अग्निशमन विभाग, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चुकांमुळे कष्टकर्यांचा नाहक बळी गेला. संबंधित अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत द्यावी. शहरातील सर्व औद्योगिक कारखाने व उद्योगांचे तसेच, कामगारांचे सोशल ऑडिट करण्यात यावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर गुरुवारी (दि.21) आक्रोश धरणेआंदोलन करण्यात आले.
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनात ज्येष्ठ नेते मानव कांबळे, राष्ट्रीय किमान वेतन आयोगाचे सदस्य चंद्रन कुमार, महासंघाचे कार्याध्यक्ष राजू बिराजदार, महिलाध्यक्षा माधुरी जलमुलवार, वृषाली पाटणे, अर्चना कांबळे, किरण साडेकर, संतोष माळी, सलीम डांगे, समाधान जावळे, सलीम शेख आदी सहभागी झाले होते.
नखाते म्हणाले, ‘शहरातील कामगारांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. त्याला प्रशासकीय यंत्रणा दोषी आहे. त्यांच्यावर सदोष खुनाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना भविष्यात घडू नये, यासाठी महापालिकेने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.’ चंदन कुमार म्हणाले, कंपन्यांचे सोशल ऑडिट होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून जबाबदारी स्वीकारून कामगार व कंपनीतील सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.
आंदोलनानंतर कामगारांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. येथून पुढे अशा प्रकारची दुर्घटना घडणार नाही, याची खबरदारी महापालिका प्रशासन घेत आहे. महापालिका संपूर्ण शहरात सर्वेक्षण करीत आहे, अशी ग्वाही जांभळे यांनी दिली.
कामगारांचा जीव कवडीमोल?
कामगारांच्या जीवाला कवडीमोल समजले जाते. तळेगाव जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्नही शासनाने सोडवलेला नाही. कामगारांची किंमत काय आहे, हे पुढील कालावधीमध्ये सरकारला दाखवावी लागेल, असे मानव कांबळे म्हणाले.
हेही वाचा
शिरूरच्या पूर्वभागात धोकादायकरीत्या ऊस वाहतूक
पाण्याखाली 375 वर्षांपूर्वीचे शहर की नैसर्गिक रचना?
संगमनेर : शेडमध्ये घुसलेला बिबट्या पाच तासानंतर जेरबंद
The post तळवडे दुर्घटनेतील कामगारांच्या मृत्यूचा जबाब द्या : कष्टकऱ्यांचे आंदोलन appeared first on Bharat Live News Media.
