शाहूवाडीत ३२५ अंगणवाड्या कुलूपबंद; मदतनीस, सेविकांच्या आंदोलनाचा परिणाम

विशाळगड : सुभाष पाटील : मानधनवाढ व सेवेत कायम करावे यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर आहेत. त्यांनी ४ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे ‘शाहूवाडी’त ३२५ अंगणवाड्या १९ दिवसांपासून कुलूपबंद असल्याने चिमुकल्यांना शाळेत जाता येत नसल्याची स्थिती आहे.
शाहूवाडी तालुक्यातील ३२५ अंगणवाड्यांमध्ये जवळपास ३ हजार ३१९ विद्यार्थी आहेत. प्रत्येक गावांमध्ये किमान एक ते दोन अंगणवाड्या आहेत. चिमुकल्यांना शाळेची गोडी लागावी आणि शाळा व शिक्षकांविषयीची भीती दूर व्हावी या हेतूने या अंगणवाड्या सुरू आहेत. मात्र, शासन दरबारी मागण्यांचे निवेदन देऊनही त्यावर सकारात्मक तोडगा न निघाल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस महिलांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या शाळांचे समीकरण बिघडले आहे.
थंडी असतानाही दररोज सकाळी लवकर उठून अंगणवाडीत जाणारी चिमुकली शाळा (अंगणवाडी) सुरू आहे की नाही, हे पाहून पुन्हा घरी परत येत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. गाव व शहरी भागातील या स्थितीवर शासन स्तरावरून आता कधीपर्यंत तोडगा निघणार, याकडे चिमुकल्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील अंगणवाड्यांची स्थिती
एकूण अंगणवाड्या – ३२५
अंगणवाडी सेविका – ३२५
अंगणवाडी मदतनीस- २९१
अंगणवाड्या बंद – १९ दिवस
अंगणवाडी सेविका – मदतनीस यांच्या प्रमुख मागण्या-
* अंगणवाडी सेविका व मदतनिसांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा.
* सेविकांना २६ हजार तर मदतनीस यांना २० हजार रुपयांचे किमान वेतन द्या.
* सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांना ग्र्यॅच्युईटी लागू करा.
* अंगणवाड्यांचे खासगीकरण थांबवा व सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करा.
* लाभार्थ्यांना गरम, ताजा आहार द्या, अंगणवाडी केंद्रांचे भाडे वाढवून द्या.
* नवीन मोबाईल द्या व पोषण ट्रॅकरमधील त्रुटी दूर करा.
* केंद्र व राज्याचे मानधन नियमित व एकत्र द्या.
कामे जास्त मानधन कमी :
लसीकरण मोहीम, गर्भवती माता, स्तनदा मातांचे, लसीकरण, पोषण आहार, गृहभेटी, सहा महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना पोषण आहार, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना पूरक पोषण आहाराबरोबर पूर्व प्राथमिक शिक्षण, त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने हसत खेळत शिक्षण देणे, ई-आकार प्रशिक्षण, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, ऑनलाईन माहिती भरणे, रजिस्टर भरणे, जनजागृतीपर कार्यक्रम राबवणे, सरकारने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वेगवेगळे उपक्रम राबवणे, सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवणे, भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवून देणे, किशोरवयीन मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी निधी मिळवून देणे, आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनासोबत काम करणे, अशी अनेक कामे अंगणवाडीसेविका करत आहेत.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे अंगणवाडीमध्ये जाणारे विद्यार्थी आणि स्तनदा मातांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत आहे. अंगणवाड्या बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची हिरमोड होत असून त्यांच्या पोषण आहारावर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने अंगणवाडी सेविकांच्या मागणीची पूर्तता करावी.
– संजयसिंह पाटील, सामाजिक कार्यकर्ते, गजापूर
हेही वाचा :
‘अलमट्टी’ ५ मीटरने वाढल्यास पूर पातळी जाणार ७० फुटांवर
कोल्हापुरी फोडणीला भेसळीचा ठसका!
थेट पाईपलाईनला तुरंबेनजीक मोठी गळती
The post शाहूवाडीत ३२५ अंगणवाड्या कुलूपबंद; मदतनीस, सेविकांच्या आंदोलनाचा परिणाम appeared first on Bharat Live News Media.
