दुध भेसळीच्या छाप्याने काटा कोणाचा?
रियाज देशमुख
राहुरी : अन्न, औषध प्रशासनाच्या नाशिक व नगर येथील संयुक्त पथकाने राहुरी तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव येथे दूध भेसळ करीत असल्याच्या कारणास्तव छापा टाकला. छाप्यावेळी सकाळीच अधिकार्यांना मारहाण होऊनही सायंकाळच्या तक्रारीत बदल झाला. भेसळीचे घातक रसायन समजल्या जाणार्या पॅराफिन लिक्विडचेही सायंकाळी पाणी झाल्याने अन्न, औषध प्रशासनाच्या छाप्याने भेसळखोरांचा काटा निघाला की सर्वसामान्यांचा? या चर्चेचे गुर्हाळ जिल्हाभर गाजत आहे.
अन्न, औषध प्रशासनाकडून 15 डिसेंबर रोजी सकाळीच दोन ठिकाणी भेसळखोरांवर कारवाई केली. कारवाईच्या वेळी एका ठिकाणी अधिकार्याला मारहाण झाल्याची चर्चा पसरली. अन्न, औषध प्रशासनाकडूनही तशी माहिती पत्रकारांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्यात दूध भेसळीचे साहित्य दोन वाहनांमध्ये भरून आणण्यात आले. कॅनमध्ये पॅराफिन लिक्विड, घातक रसायने व व्हे पावडर असल्याची माहिती दिली जात होती. तसेच पवार नामक अन्नसुरक्षा अधिकार्यावर दूध भेसळखोराकडून हल्ला झाल्याने त्यांचे फाटलेले कपडेे, हाताला झालेल्या जखमा दाखविल्या जात होत्या.
पांढर्याशुभ्र दुधाला काळा डाग लावण्यासाठी दुधात घातक रसायन, व्हे पावडर टाकून लोकांच्या आरोग्यावर संक्रांत आणणार्या भेसळखोरांवर कठोर कारवाई व्हावी, दूधभेसळ थांबवावी यासाठी अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकार्यांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. त्याच अधिकार्यांना मारहाणीची माहिती मिळाल्यानंतर सर्वसामान्यांनीही संताप व्यक्त केला. सकाळी 10 वाजेपासून 10 ते 12 अधिकारी राहुरी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. घटनेची माहिती मागितल्यानंतर एकमेकांच्या कानात कुजबुजत ‘गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती देऊ’ असे सांगत होते. सायंकाळ होत आली तरी गुन्हा दाखल होत नसल्याने बाहेर चर्चा, तर्क-वितर्क सुरू झाली. मारहाणीचा विषय असतानाही अधिकार्यांची जहाल भाषा सायंकाळी मवाळ झाली. मारहाणीचा प्रकारच तक्रारीतून गायब झाला. ‘पॅराफिन लिक्विड नसून ते पाणी होते’ असा खुलासा देण्यात आला. घातक रसायन नसून, केवळ व्हे पावडरीच्या गोण्या जप्त केल्याची माहिती देत अन्न, औषध प्रशासनाने छाप्याची सविस्तर माहिती सांगितली.
सर्वसामान्यांचाच काटा?
तेव्हापासून राहुरीच्या कारवाईबाबत तर्कवितर्कांच्या चर्चेचे गुर्हाळ चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. अन्न, औषध प्रशासनाच्या कारवाईने दूध भेसळखोरांचा काटा निघाला, की दूधभेसळ करूनही गुन्ह्याची तीव्रता कमी करीत लपवालपवी होऊन सर्वसामान्यांचा काटा काढला गेला? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
राहुरी तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव येथील दूध भेसळखोरांवरील छाप्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. सकाळच्या सत्रात मारहाण झाल्याचे सांगत कठोर कारवाई करणार असल्याचे सांगत पुढाकार घेणारे अधिकारी नरमले कसे? सकाळच्या सत्रात जे द्रव्य घातक होते त्याचे पाणी झाले कसे? मारहाण करणार्यांवर कठोर कारवाई होईल अशी शक्यता असताना केवळ सही न देता शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल करून बचाव कोणाचा केला? सकाळपासून नाशिक व नगर येथील अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते, ते सांयकाळी गुन्हा दाखल होत असताना कोठे गायब झालेे? अशा अनेक प्रश्नांचे काहूर सर्वसामान्यांच्या मनात उठले आहे. त्यामुळेच अन्न, औषध प्रशासनाच्या छाप्याने दूध भेसळखोरांचा काटा निघाला की सर्वसामान्यांचा, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा ठरत आहे.
तक्रारीत केवळ ‘शासकीय कामात अडथळा’
आरोपीने पाण्यामध्ये व्हे पावडर टाकून कृत्रिमरित्या दुधाचा एसएनएफ वाढवत भेसळयुक्त दूध तयार केले. तेथे मोठ्या प्रमाणात व्हे पावडरचा साठा आढळून आला. दूध व्हे पावडरचे नमुने घ्यायचे आहेत, असे अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगताच, आरोपी कोठेही सही न करता पळून गेला. त्यामुळे नमुने घेण्याच्या शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यासाठी अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी राहुरी पोलिस ठाण्यात 8 तास बसून होते. त्यामुळे या कारवाईची चर्चा होत आहे.
ते सायंकाळपर्यंत पंचनामा करीत होते!
हा गुन्हा दाखल करण्यासाठी शासकीय अधिकार्यांना आठ तास बसवून ठेवल्याची चर्चा असल्याबाबद राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय सोनवणे यांनी सांगितले, की अन्न, औषध प्रशासनाचे अधिकारी सकाळपासूनच पोलिस ठाण्यात बसून होते. मात्र तक्रार दाखल करण्यापूर्वी पंचनामा केला जाईल, असे त्यांनी सांगितले होते. सायंकाळपर्यंत पंचनामा केल्यानंतर त्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा सायंकाळी दाखल केला.
अंगावर हात टाकण्याची हिंमत येते कशी?
अवैध धंद्यांच्या ठिकाणी छापा पडल्यास आरोपींकडून अधिकार्यांवर हल्ला होणे ही मोठी गोष्ट आहे. अधिकारी व आरोपींमध्ये काही तरी देवाणघेवाण होत असेल आणि देवाण घेवाण होऊनही कारवाई होत असल्यास अवैध धंदे करणारे अधिकार्यांवर हात उचलण्यास मागेपुढे पाहत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामुळे अधिकार्यावर हात उचलूनही गुन्हा दाखल न झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
‘मी तर पाठलाग करताना पडलो’
अन्न, औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी ‘Bharat Live News Media’ला सांगितले, की मला मारहाण झाली नाही. सही न करता आरोपी पळत असताना मी पाठलाग करताना पडलो. त्यामुळे कपडे फाटले व हाताला लागले. संबंधित ठिकाणाहून भेसळयुक्त दूध, कॅनमधील द्रव्यसाठा, व्हे पावडर जप्त केली आहे. मात्र लॅब अहवाल येईपर्यंत भेसळीबाबत कारवाई करता येणार नाही.
कारवाई होते; पण गुन्हा दाखल होत नाही!
दोन वर्षांमध्ये अन्न, औषध प्रशासनाने राहुरी तालुक्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली. परंतु छापेमारीनंतर रसायन व साहित्य नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविली जातात. नमुन्यांचा अहवाल येईपर्यंत पुलाखालून बरेचसे पाणी वाहून जाते आणि नंतर कारवाईची तीव्रताही कमी होते. छापेमारीनंतर नमुना अहवालाकडे बोट दाखवून गुन्हे दाखल न झाल्याने भेसळखोरांची हिंमत वाढत असल्याचे बोलले जात आहे.
The post दुध भेसळीच्या छाप्याने काटा कोणाचा? appeared first on Bharat Live News Media.