नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता निकालाची प्रतीक्षा असताना नेमके काय होणार, अशी उत्सुकता राज्यातील जनतेला आहे. कोण-कोण राजीनामा देणार,अशीही चर्चा असताना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचे विधान केले आहे. पक्षांतर विरोधी कायद्यासाठी दिशादर्शक ठरणारा निर्णय देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अध्यक्ष नार्वेकर यांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात काढले जात आहेत. (Rahul Narvekar on MLA disqualification)
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांनी दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली अशी प्रशंसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली हे विशेष. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी उशिरापर्यंत चाललेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही अंतिम सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुनावणी आणि निकालावर भाष्य केले. कायदेशीर तरतुदींचा आपण अभ्यास करुनच निर्णय घेणार असून निर्णय पक्षांतरविरोधी कायद्यासाठी दिशादर्शक असेल, असे त्यांनी म्हटले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला दिलेल्या मुदतीच्या आत निर्णय देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. (Rahul Narvekar on MLA disqualification)
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवर सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यासंदर्भात बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की, पक्षांतरबंदी कायद्याचा उल्लेख संविधानाच्या १० व्या अनुसूचित केलेला आहे. हा कायदा विकसित होत असलेला कायदा असून याच्यात अनेकवेळा संशोधन होऊन सुधारणा केलेल्या आहे. ज्या- ज्या वेळी कायद्यात सुधारणा केल्या गेल्या, त्या -त्या वेळी सदर कायदा अधिक बळकट झाला. सर्वोच्च न्यायालय असो किंवा उच्च न्यायालय असो, या न्यायालयांमध्ये झालेल्या सुनावणीमध्ये या कायद्याचा वेगवेगळ्याप्रकारे अर्थ लावण्यात आला. अनेक राज्यांच्या संदर्भात न्यायालयांनी जे निर्णय घेतले त्यातून आगामी काळातील खटल्यांना दिशा मिळाली, असेही अध्यक्ष म्हणाले आहेत. (Rahul Narvekar on MLA disqualification)
The post आमदार अपात्रता – ‘पक्षांतरविरोधी कायद्यासाठी दिशादर्शक निर्णय असेल’ appeared first on Bharat Live News Media.