वेस्ट इंडिजला ‘साल्ट’ वादळाचा तडाखा, इंग्लंडच्या विजयानंतर टी-20 मालिका बरोबरीत
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : WI vs ENG T20 : फिल सॉल्टच्या सलग दुसऱ्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 75 धावांनी पराभव केला. यासह इंग्लिश संघाने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. सॉल्टने 59 चेंडूत 7 चौकार, 10 षटकार ठोकून 119 धावांची वादळी खेळी साकारली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 267 धावा केल्या. टी-20च्या डावात इंग्लंडची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. 268 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ 15.3 षटकांत 192 धावांत गारद झाला.
ICC Ranking : आयसीसी रँकींगमध्ये शुबमन गिल, रवी बिश्नोईला मोठे नुकसान
इंग्लंडची शतकी सलामी (WI vs ENG T20)
टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडची सुरुवात धडाकेबाज झाली. इंग्लिश सलामीवीर साल्ट आणि बटलर यांनी एकापाठोपाठ विंडिजच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवले. या जोडीने 117 धावांची भागिदारी केली. बटलरच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. तो 9.5 व्या षटकात जेसन होल्डरच्या चेंडूवर रोव्हमन पॉवेलकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलरने 29 चेंडूत 55 धावा केल्या. यानंतर मैदानात उतरलेल्या विल जॅकने 9 चेंडूत 24 धावांचे योगदान दिले. साल्ट आणि जॅक यांच्यात 56 धावांची भागिदारी झाली. यानंतर लियाम लिव्हिंगस्टोननेही तडाखेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. त्याने 21 चेंडूत नाबाद 54 फटकावल्या. त्याने साल्टसह 73 धावांची भागिदारी केली. डेथ ओव्हर्समध्ये साल्ट (119) बाद झाला. हॅरी ब्रुकला कमी चेंडूत अधिकच्या धावांचे योगदान देण्यात यश आले नाही. तो केवळ 6 धावा करू शकला. वेस्ट इंडिजकडून आंद्रे रसेल, जेसन होल्डर आणि अकील हुसेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
IPL Auction Sameer rizvi : चेन्नई सुपर किंग्जची ‘रैना-2’ साठी ८. ४० कोटींची बोली!, कोण आहे समीर रिझवी?
IPL Auction 2024 Shubham Dubey | नागपूरच्या पानवाल्याचा मुलगा बनला कोट्यधीश, राजस्थानने मोजले ५.८० कोटी, शुभम दुबेची प्रेरणादायी गोष्ट
वेस्ट इंडिजची सुरुवात खराब (WI vs ENG T20)
268 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात अत्यंत खराब झाली. डावाच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोईन अलीने ब्रेंडन किंगला आल्या पावली माघारी धाडले. टोपलीने किंगचा झेल पकडला. त्यानंतर टोपलीने विंडिजला दुसरा धक्का दिला. काइल मेयर्स (12) वोक्सकरवी झेलबाद झाला. अशाप्रकारे काही अंतरांनी विंडिजच्या विकेट पडत गेल्या आणि त्यांची अवस्था 7 बाद 120 झाली. या बिकट प्रसंगी आंद्रे रसेलने एका टोकाकडून आक्रमक खेळी केली आणि संघाचा पराभव लांबला. त्याने अकिल हुसेनच्या सोबतीने 21 चेंडूत संघासाठी 40 धावांची भागिदारी रचली. यादरम्यान रसेलने झुंझार अर्धशतक झळकावले. पण 25 चेंडूंत तीन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 51 धावा करणा-या रसेलला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. शेवटी तो बाद होताच विंडिजला हा सामना 75 धावांनी गमवावा लागला.
इंग्लंडकडून रीस टोपलेने सर्वाधिक तीन बळी घेतले. सॅम कुरन आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोईन अली, ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
The post वेस्ट इंडिजला ‘साल्ट’ वादळाचा तडाखा, इंग्लंडच्या विजयानंतर टी-20 मालिका बरोबरीत appeared first on Bharat Live News Media.