सामर्थ्यवान भारतासाठी शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालायचेय : मोहन शेटे
पुणे : छत्रपती श्रीशिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे राष्ट्रपुरुष होते. त्यामुळे आपल्याला सामर्थ्यवान भारत घडवायचा असल्यास, श्रीशिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरून चालण्याशिवाय पर्याय नाही, असे मत इतिहासकार मोहन शेटे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या 24 डिसेंबरपर्यंत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शेटे यांनी ‘शिवरायांची गाथा’ हा कार्यक्रम सादर केला.
शेटे म्हणाले, छत्रपती श्रीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक युग प्रवर्तक घटना होती. स्वराज्याची घोषणा झाल्यानंतर, रायगडावर सोन्याच्या सिंहासनाची निर्मिती करण्यात आली. त्या वेळी स्वराज्याचा आकार थोडा लहान होता. मात्र, अवघ्या शंभर वर्षांत स्वराज्याचा विस्तार हा पेशावरपासून ते तंजावरपर्यंत झाला. ही स्वराज्य विस्ताराची प्रेरणा श्रीशिवाजी महाराजांपासून मराठ्यांना मिळाली होती. श्रीशिवाजी महाराजांनी या भूमीतील सामान्य लोकांना एकत्र करून, असामान्य इतिहास घडवला. श्रीशिवाजी महाराजांकडे असामान्य संघटन कौशल्य होते. त्यांनी आपल्या आचरणातून आपल्या अनुयायांवर संस्कार केले होते. त्यामुळेच स्वराज्याच्या रणसंग्रमामध्ये प्राणांची आहुती देण्यासाठी तयार असलेले बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे असे वीर त्यांना मिळाले. त्यातूनच स्वराज्याची निर्मिती झाल्याची माहिती शेटे यांनी दिली.
फाळणीचा इतिहास समजावून सांगण्याची गरज : सुनील आंबेकर यांचे मत
देशाच्या फाळणीचा इतिहास अजूनही अनेकांना माहिती नसल्याने, त्यांच्यात संभ्रम आहे. काही राजकीय पक्ष आणि त्यातील विद्वानही संभ्रमात आहेत. त्यामुळे देशाच्या फाळणीचा इतिहास नव्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयात ‘फाळणी – भारत आणि भवितव्य’ या विषयावरील आयोजित परिसंवादात आंबेकर बोलत होते. या वेळी ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे, लेखक प्रशांत पोळ, अभ्यासक केदार नाईक आदी उपस्थित होते.
आंबेकर म्हणाले, फाळणीच्या इतिहासावर सविस्तर विश्लेषण होणे गरजेचे आहे. फाळणी ही आपल्यासाठी खूप मोठी चूक होती, हे पाकिस्तानला काही दिवसात कळणार आहे. मुस्लिमांनीसुद्धा बघताना पाकिस्तान ऐवजी इंडोनेशियाकडे बघितले पाहिजे. महात्मा गांधी यांनी कस्तुरबा गांधी यांच्यासोबत आपल्या आयुष्यात एकच चित्रपट बघितला आणि त्याचे नाव ‘रामराज्य’ होते, असे एक संशोधन पुढे आले आहे. महात्मा गांधी यांनी अयोध्येलाही भेट दिली होती. प्रतिभा रानडे यांनी आपल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या भेटीतील प्रसंग सांगितले. केदार नाईक यांनीही फाळणीनंतर निर्माण झालेल्या भौगोलिक परिस्थितीबाबत; तसेच फाळणीपूर्वीच्या घटनांबाबत माहिती सांगितली.
पाकिस्तानचे तीन ते चार तुकडे होतील
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती भडकली असून, विमानात भरायलाही इंधन नाही. त्यामुळे पाकिस्तान आपल्या खिजगणतीत नाही. चीनने पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे अस्तित्व टिकून आहे. मात्र, येत्या काही वर्षांत पाकिस्तानचे तीन ते चार तुकडे होतील. फाळणीमुळे पाकिस्तानचे केवळ नुकसानच झाले आहे, असे लेखक प्रशांत पोळ म्हणाले.
फाळणीचे अनावश्यक ओझे वाहून नेण्याची आवश्यकता नाही. ते तातडीने आपल्यापासून दूर केले पाहिजे. आपल्या भारतातील ‘सो कॉल्ड विद्वान’, राजकीय पक्षाचे नेते, संभ्रमातील व्यक्ती यांनीच ते ओझे वाहायचे आहे.
– सुनील आंबेकर, प्रचारक प्रमुख, आरएसएस
आज काय?
सकाळी 10.30 : ओंकार काव्यदर्शन : सादरीकरण : विसूभाऊ बापट.
सकाळी 11.30 : कवितेबाबत कार्यशाळा
दुपारी 12.30 : स्टॅम्प मेकिंग वर्कशॉप.
दुपारी 1.30 : टॅलेंट हंट
दुपारी 2.30 : बिहाईंड द बायलाइन्स : एडिटर्स अनप्लग्ड : परिसंवाद
सायंकाळी 5.30 : ज्ञानपीठातील ज्ञानतपस्वी : गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आदींवर आधारित कार्यक्रम
सायंकाळीं 6.00 : इंद्रधनुष्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण.
The post सामर्थ्यवान भारतासाठी शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालायचेय : मोहन शेटे appeared first on Bharat Live News Media.