कृपामयी रेल्वे पूल अवजड वाहतुकीस बंद होणार नाही
सांगली; Bharat Live News Media वृत्तसेवा : सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. हा पूल पाडण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
यासंदर्भातील निवेदनात जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे की, सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल धोकादायक बनला आहे. तो अवजड वाहतुकीसाठी बंद करावा, असे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये म्हटलेले आहे. या अहवालावर रेल्वे, महानगरपालिका, वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली. बैठकीत रेल्वेच्या सक्षम प्राधिकारी यांच्या स्वाक्षरीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागास सादर करण्याच्या सूचना रेल्वे अधिकार्यांना देण्यात आल्या. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील सूचनांवर अभ्यास व पाहणी करण्यात येईल. त्यानंतर यासंदर्भात पुन्हा बैठक घेण्यात येईल.
हा पूल वाहतुकीसाठी बंद होणार असल्याची अफवा पसरली होती. परंतु, 45 ते 50 वर्षांपूर्वी पूल बांधला आहे. तो पाडून त्या ठिकाणी नवा पूल बांधावा, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अरुंद पुलामुळे सांगली- मिरजदरम्यानच्या चौपदरीकरणामध्ये देखील अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी नवा पूल उभारण्याची गरज आहे. यासाठी रेल्वेकडून पुणे विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. यासाठी पाच ते सहा महिन्यांचा अवधीदेखील लागणार आहे. रेल्वेकडून पूल उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्यानंतरच हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत विचार होऊ शकेल, असेही निवेदनात म्हटले आहे.
…तर सर्वांना घेतले जाईल विश्वासात
हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याची गरज भासल्यास पर्यायी मार्ग सुचविण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. निर्णय घेण्याची वेळ आलीच, तर नागरिकांची सुरक्षा व सुरळीत वाहतूक या दृष्टिकोनातून सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
…तर पुलाचे काम करावे लागेल गतीनेच
सांगली-मिरज हा रस्ता प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे हा पूल पाडून नवा पूल बांधायचा असल्यास, हे काम प्रचंड गतीने पूर्ण करावे लागेल. सांगलीतील चिंतामणीनगर पूल पाडल्यानंतर तो उभारणीसाठी खूप कालावधी लागत आहे. परंतु कृपामयी रेल्वे पूल पाडल्यानंतर तो गतीनेच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वेकडून पूर्ण तयारी करूनच नवा पूल उभारण्यात येणार आहे.
The post कृपामयी रेल्वे पूल अवजड वाहतुकीस बंद होणार नाही appeared first on Bharat Live News Media.