शेअर बाजाराची उच्चांकी उसळी
– प्रा. डॉ. विजय ककडे
भारतीय शेअर बाजारने आत 71 हजारांचा टप्पा ओलांडला असून 2025 च्या नाताळसाठी येणारा सांताक्लॉज 1 लाख सेन्सेक्सची भेट आपल्या पोतडीतून आणू शकेल, असा भक्कम आशावाद व्यक्त केला जात आहे. शेअर बाजारातील वर्षाअखेरची ही नवी उच्चांक पातळी नेमक्या कोणत्या घटकांनी प्रेरित असून त्याचा अन्वयार्थ सर्वसामान्य, छोट्या गुंतवूणकदारांच्या द़ृष्टीने पाहणे महत्त्वाचे ठरते. अमेरिकेचे व्याज धोरण अथवा फेडरेट आता दिलासादायक वळण घेत असून मार्च 2024 मध्ये 0.25 टक्क्यांनी कमी केले जाणार असल्याने भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली आहे. (Stock Market)
शेअर बाजाराची ही लक्षवेधक झेप अनेकांना गुंतवणूक चांगलीच वाढल्याचा आनंद देणारी आहे तशीच आता पुढे काय? घसरण होणार का? या प्रश्नांनीही चिंतीत करणारी आहे. शेअर बाजार नेहमी जोखीमप्राप्त असला, तरी यामध्ये परतावाही सातत्यपूर्ण व आकर्षक दिला आहे, हे वास्तव आहे. भारतीय गुंतवणूकदाराची मंदगतीने बदलणारी गुंतवणूक वर्तनशीलता ही अर्थ प्रगतीचा पाया ठरणार असल्याने शेअर बाजारातील ही तेजी तपशिलाने समजून घेणे महत्त्वाचे ठरते. 25 जुलै 1990 रोजी सेन्सेक्स किंवा मुंबई शेअर बाजाराने एक हजार अंकांचा टप्पा गाठला. त्यानंतर 33 वर्षांच्या कालावधीत 71,000 चा टप्पा पार करीत लक्षपूर्ती (100,00) साध्य करण्याकडे झेपावत असला, तरी या प्रवासात अनेक अडचणींतूनही मार्गक्रमण केले आहे. हर्षद मेहता, केतन पारेख शेअर्स घोटाळा, कारगिल युद्ध, मुंबई दहशतवादी हल्ला, संसदेवर हल्ला, 2008 चे जागतिक गृह कर्ज संकट, कोरोना महामारी अशा सर्व घटकांना वळसे देत शेअर बाजाराचा आलेख वाढत आहे. निफ्टीचा बाजाराचा सूचकांक 1 हजार अंकांचा टप्पा पार करण्यासाठी केवळ 8 व्यवहार सत्रे लागली, तर 14 हजार ते 15 हजार ही वाटचाल 5 व्यवहार सत्रांत पूर्ण झाली आहे. 11 हजार ते 12 हजार ही निफ्टीची वाटचाल करण्यासाठी 60 व्यवहार सत्रे लागली.
भारताचा विकास दर अपेक्षेपेक्षा चांगला 7.1 टक्के असण्याची घटनाही प्रेरक ठरली आहे. मोठ्या आकाराच्या आणि वेगवान विकास दरात भारताने आपला प्रथम क्रमांक मिळवला आणि भांडवल बाजारने 4 लाख कोटींचा टप्पा पार केला. एकूण राष्ट्रीय उत्पन्नाशी भांडवल बाजाराचे प्रमाण 110 टक्क्यांपर्यंत वाढले. गुंतवणुकीस पायाभूत क्षेत्रात भरीव वाढ करण्याचे धोरण विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षक वाटले, यात नवल नाही. विशेषतः चीनमधून गुंतवणूक बाहेर पडत असून त्याचा भारत हा सर्वात मोठा लाभार्थी असल्याचे मत अमेरिकन गुंतवणूकतज्ज्ञाने म्हटले आहे. विदेशी संस्थाअंतर्गत गुंतवणूकदार हे बाजाराचे दिशादर्शक असतात. त्यांनी गेल्या 5 व्यवहार सत्रांत सातत्याने गुंतवणूक वाढ केली आणि 9 हजार 339 कोटींची निव्वळ वाढ केली. त्यांनी 25 हजार कोटींची विक्री, तर 38 हजार कोटींची खरेदी केली. याच कालखंडात देशांतर्गत गुंतवणूक संस्थांनी 14 हजार कोटींची विक्री आणि 11 हजार कोटींची खरेदी म्हणजे 3 हजार कोटींची विक्री केली. एकूण विदेशी गुंतवणुकीत झालेली वाढ सेन्सेक्सने 71 हजारची पातळी ओलांडण्यास महत्त्वाची ठरली. यात डॉलर इंडेक्स म्हणजे डॉलरची महागाई कितपत घटते यावरही भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूक प्रमाण ठरते. डॉलर इंडेक्समधील घट, तेल किमतीत झालेली घट ही कारणेही शेअर बाजार उंचावण्यास मदत करणारे ठरले. आर्थिक निर्णय प्रक्रियेमागे राजकीय संदर्भ नेहमीच महत्त्वाचे असतात. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडचे निकाल सध्याच्या भाजप आघाडीस बळकट करणारे ठरले. सातत्य हे मोठे आश्वासक ठरते. त्यामुळे निकाल स्पष्ट होताच सेन्सेक्स वधारला आणि राजकीय चौकटीत शेअर बाजाराचा परतावा पाहणे मनोरंजक ठरते. (Stock Market)
The post शेअर बाजाराची उच्चांकी उसळी appeared first on Bharat Live News Media.