हजर न होणार्या बीएलओंवर गुन्हे दाखल करा : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना
पुणे; Bharat Live News Media वृत्तसेवा : मतदान नाव नोंदणी अधिकारी (बीएलओ) आदेश देऊनही हजर झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील 542 बीएलओंवर गुन्हे दाखल करा, अशा सक्त सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
पुणे विभागाचे मतदार यादी निरीक्षक (इलेक्टोरल रोल ऑब्झर्व्हर) असलेले विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्ह्याचा निवडणूक कामकाजाचा मंगळवारी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मतदान केंद्रांची फेररचना करण्यात आली असून त्यात मतदान केद्रांची संख्या वाढली आहे. तर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा मतदारांची संख्या वाढेल. त्यानुसार मतदान केंद्र निश्चित केले जाणार आहेत. प्रत्येक मतदान केद्रासाठी एक बीएलओ नियुक्त केला जातो. त्यासाठी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकार्यांचा समावेश केला जातो.
जिल्ह्यात सध्य स्थितीला 8 हजार 213 केंद्रावर बीएलओ नियुक्त करण्यात आले असून, यातील 542 अधिकारी निवडणूक कामासाठी रूजू होण्यास टाळाटाळ करत आहेत. ही बाब राव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्यावर राव यांनी सबंधितांना 24 तासांच्या आत हजर होण्याच्या सूचना द्या. त्यानंतरही ते रूजू न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशा सक्त सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य आणि जिल्हा स्तरावर मतदार याद्या अद्ययावतीकरण, मतदार नोंदणी, मतदान केंद्र तेथील सुविधा मतदार यंत्र निश्चिती आदींचे नियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मतदार याद्या शुद्धीकरण, अद्ययावतीकरण करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात येते. यासाठी मुख्यत्वे महापालिकेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा समावेश आहे.
– मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे.
The post हजर न होणार्या बीएलओंवर गुन्हे दाखल करा : विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या सूचना appeared first on Bharat Live News Media.