कोल्हापूर व सिंधुदुर्गला जोडणाऱ्या सोनवडे घाटमार्गाच्या भूसंपादनासाठी ५ कोटी मंजूर
कणकवली; अजित सावंत : कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे अंतर कमी करणार्या नियोजित सोनवडे घाटमार्गाच्या बदललेल्या अलायमेंटनूसार १३ किमी मार्गापैकी ३ किमीचा मार्ग कोल्हापूर हद्दीत आणि १० किमीचा मार्ग सिंधुदुर्ग हद्दीत आहे. सिंधुदुर्ग हद्दीतील १० किमी मार्गापैकी ६ किमीचा भाग हा वनखात्याचा असून ४ किमीचा भाग हा खाजगी जमिनीत आहे. या खाजगी जमिनीतील भूसंपादनासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तातडीने ५ कोटीचा निधी मंजूर केला आहे.
या भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनीही युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. खाजगी आणि वनखात्याच्या भूसंपादनानंतर या घाटमार्गाच्या कामाची निविदा काढली जाणार आहे. या घाटमार्गाचे जवळपास ५०० कोटीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
गेल्या ४० वर्षांच्या लढयानंतर सोनवडे घाटमार्ग दृष्टीपथात आला आहे. या घाटमार्गासाठी केंद्रीय वन पर्यावरण आणि राज्य शासनाकडून आवश्यक त्या मंजूर्या दोन वर्षापूर्वी मिळाल्या होत्या. मात्र नंतर हा घाटमार्ग अवजड वाहनांसाठी अधिक चढावांचा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची अलायमेंट काही प्रमाणात बदलण्यात आली. त्यानंतर सर्व्हे करण्यात आला. नव्या अलायमेंटला मंजूरीही देण्यात आली. तर दुसरीकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक, भूसंपादन आदी कामानांही वेग दिला. कणकवली सा.बां. चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया सुरू करण्यात आली. आता या घाटमार्गातील खाजगी जमिनीतील भूसंपादनासाठी सुमारे ५ कोटीचा निधी शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे हि प्रक्रिया आता जिल्हा प्रशासनाकडून गतीने सुरू केली जाणार आहे. खाजगी जमिनीच्या भूसंपादनानंतर वन खात्याच्या ताब्यातील भूसंपादन प्रक्रिया केली जाणार आहे. जमिन ताब्यात घेतल्यानंतर या घाटमार्गाची निविदा काढली जाणार आहे. कामाचे अंदाजपत्रकही सा.बां.’च्या मुख्य अभियंता कार्यालयाकडे तयार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या घाटमार्गाचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी पाठपुरावा करत आहेत. यामुळे पुढील काही दिवसात भूसंपादन व इतर कामांना वेग येणार आहे.
हेही वाचा :
सिंधुदुर्ग : विजघर येथे टस्कराकडून केळी,सुपारी अन् माडाचे नुकसान
सिंधुदुर्ग : देवगड बंदरात बेधुंद खलाशाकडून २ खलाशांना जीवे मारण्याचा प्रयत्न, नौका पेटवली
सिंधुदुर्ग : गुराख्याचं स्नेह भोजन… ‘गवळदेव’ परंपरा
The post कोल्हापूर व सिंधुदुर्गला जोडणाऱ्या सोनवडे घाटमार्गाच्या भूसंपादनासाठी ५ कोटी मंजूर appeared first on Bharat Live News Media.