विष प्रयोग की गंभीर आजार? : दाऊदचा सस्पेन्स कायम
मुंबई/कराची, Bharat Live News Media वृत्तसेवा/वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला जागतिक दहशतवादी आणि भारताचा कुख्यात मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या तब्येतीचे गूढ कायम आहे. त्याच्यावर कराचीतल्या एका रुग्णालयात लष्करी बंदोबस्तात उपचार सुरू आहेत, इतकीच बातमी तूर्तास खरी मानली जाते. मात्र, त्याच्यावर विष प्रयोग झाला की, त्याच्या आधीपासूनच्या आजारांनी त्याला दगाफटका करणे सुरू केले, हे खात्रीलायक कुणीही सांगू शकत नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांसह अन्य तपास आणि गुप्तचर यंत्रणा दाऊदचे जवळचे नातेवाईक आणि सदस्यांकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दाऊदच्या मुंबईतील कुटुंबीयांनी त्याच्या आजारपणाला दुजोरा दिला. मात्र, विषबाधेच्या बातमीबद्दल मात्र कानावर हात ठेवले. (Dawood Ibrahim)
जगभरात दहशतवादाचे, खंडण्यांचे, अमली पदार्थांच्या तस्करीचे महाकाय नेटवर्क चालवणारा डॉन आज 68 व्या वर्षी विविध आजारांशी झुंजत असल्याचे याआधीच स्पष्ट झाले आहे. डायबेटिस, रक्तदाब, किडनीचे विकार हे त्याचे चर्चेत आलेले आजार होत. दोन दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. अजूनही त्याला डिस्चार्ज मिळालेला नाही. (Dawood Ibrahim)
मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड असलेला 68 वर्षीय दाऊद इब्राहिम हा कुटुंबासह पाकिस्तानात वास्तव्यास आहे. मात्र, तशी कबुली आजवर पाकिस्तानने दिलेली नाही. दाऊद पाकिस्तानात आहे, हेच जगाला कळू द्यायचे नसल्याने या आजारपणातही त्याला कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले असून, तो उपचार घेत असलेल्या मजल्यावर केवळ उच्चपदस्थ अधिकारी आणि कुटुंबातील जवळच्या व्यक्तींशिवाय अन्य कोणालाही जाण्याची परवानगी नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
विषबाधेची चर्चा
गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात अनेक दहशतवादी गोळ्या घालून मारले गेले. काहींना विषबाधाही झाली. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत 16 दहशतवादी मारले गेले. भारताच्या विरोधात घातपाती कारवाया करणारे असे टपकले जात असताना दाऊदच्या रुग्णालयात भरती होण्याची ही चर्चा विषबाधेभोवती फिरू लागली. मात्र, दाऊदला कुणी खरेच विष दिले की, तो आजारी म्हणून रुग्णालयात भरती झाला? याबद्दल खात्रीने सांगण्याची कुणाचीही धडगत नाही. दाऊदचा व्याही व जागतिक कीर्तीचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादनेही काहीही सांगण्यास नकार दिला. दाऊदवर उपचार सुरू आहेत, इतकेच सांगताना अन्य सर्व चर्चांना दुजोरा देण्यास किंवा या चर्चांचा इन्कार करण्यास त्याने नकार दिला.
नेटबंदीची भर
एकीकडे, दाऊदवरील विष प्रयोगाचा संशय चर्चेत असतानाच संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट बंद करण्यात आले. दाऊदच्या तब्येतीची गंधवार्ता जगाला लागू नये म्हणूनच दाऊदला आश्रय देणार्या पाक सरकारने आणि खासकरून ‘आयएसआय’ या पाताळयंत्री गुप्तचर यंत्रणेने नेट बंद केल्याचे सांगितले जाऊ लागले. या नेटबंदीमुळे पाकिस्तानात गुगल, ट्विटर, फेसबुक, यूट्यूब बंद आहे. दाऊदच्या आजारपणाच्या बातमीनंतर पाकिस्तानातील सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगितले जाऊ लागले. मात्र, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांची ऑनलाईन सभा सोमवारी होणार होती. ती हाणून पाडण्यासाठीच पाक सरकारने ही नेटबंदी केल्याचे आता स्पष्ट होत आहे. नेटबंदीचा दाऊदच्या तब्येतीचा संबंध नसला, तरी दाऊदची कोणतीही खरी माहिती बाहेर पडणार नाही, याची काळजी पाकिस्तानकडून घेतली जात आहे.
The post विष प्रयोग की गंभीर आजार? : दाऊदचा सस्पेन्स कायम appeared first on Bharat Live News Media.
Home ठळक बातम्या विष प्रयोग की गंभीर आजार? : दाऊदचा सस्पेन्स कायम
विष प्रयोग की गंभीर आजार? : दाऊदचा सस्पेन्स कायम
मुंबई/कराची, पुढारी वृत्तसेवा/वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्राने घोषित केलेला जागतिक दहशतवादी आणि भारताचा कुख्यात मोस्ट वाँटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या तब्येतीचे गूढ कायम आहे. त्याच्यावर कराचीतल्या एका रुग्णालयात लष्करी बंदोबस्तात उपचार सुरू आहेत, इतकीच बातमी तूर्तास खरी मानली जाते. मात्र, त्याच्यावर विष प्रयोग झाला की, त्याच्या आधीपासूनच्या आजारांनी त्याला दगाफटका करणे सुरू केले, हे खात्रीलायक …
The post विष प्रयोग की गंभीर आजार? : दाऊदचा सस्पेन्स कायम appeared first on पुढारी.