Pimapri : प्राणिसंग्रहालयाचा कारभार राज्य शासनाच्या हाती
मिलिंद कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संभाजीनगर, चिंंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आता राज्य शासनामार्फत चालविले जाणार आहे. स्मार्ट सिटी कंपनीप्रमाणे हा कारभार स्वतंत्रपणे चालणार आहे. त्या माध्यमातून शहरवासीयांना अधिक चांगल्या दर्जाची सेवा व सुविधा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
प्राणिसंग्रहालय सुशोभीकरण व नूतनीकरणाचे काम 2017 पासून सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत उद्यान पर्यटकांसाठी बंद आहे. गेली सात वर्षे कासवगतीने काम सुरू आहे. कामास विलंब होऊनही संबंधित ठेकेदार, सल्लागार तसेच, संबंधित अधिकार्यांवर कारवाई न करता त्यांना ठेकेदाराला मुदतवाढीेचे बक्षीस देण्याचा प्रकार महापालिकेने केला आहे. आता तिसर्या टप्प्यातील तब्बल 14 कोटींचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याची मुदत सहा महिने आहे. तोपर्यंत हे प्राणिसंग्रहालय महापालिका नागरिकांसाठी खुले करेल, अशी शक्यता धुसर आहे.
प्राणिसंग्राहलयास तब्बल 7 वर्षे टाळे असल्याने स्थापत्य विभागाच्या कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त करीत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशात महापालिकेचे वाभाडे काढण्यात आले. प्राणिसंग्रहालय वनविकास महामंडळाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तेेथील कारभार त्या महामंडाळामार्फत चालेल. त्यामुळे पर्यटकांना अधिक चांगली सेवा व सुविधा मिळेल. तसेच, माफक दरात तिकीट असेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
खर्च महापालिकेचा; कारभार स्वतंत्र कंपनीद्वारे
महापालिकेने कोट्यवधीचा खर्च करून विकसित केलेले पिंपरी-चिंचवड अनेक प्रकल्प स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून चालविला जात आहे. त्यामुळे त्या प्रकल्पांवर महापालिकेचा तसेच, लोकप्रतिनिधींचा वचक राहत नाही. त्यामुळे संबंधित कंपनीचे संचालक मालक असल्याप्रमाणे मनमर्जी कामकाज करत असल्याचे अनेक उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर इमारत तसेच, तेथील सायन्स पार्क व तारांगण, चिखली येथील जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, पवना, इंद्रायणी व मूळा नदी सुधार योजना, मोरवाडी येथील दिव्यांग फाउंडेशन आदींचे कारभार कंपनीच्या संचालक मंडळातर्फे चालविला जातो. त्याप्रमाणे आता प्राणिसंग्रहालयाचे कामकाज चालेल.
प्राण्यांवर वेळीच उपचार, देखभालीसाठी 11 जणांची टीम
प्राणिसंग्रहालयात एक डॉक्टर, एक अभिरक्षक, तीन अॅनिमल कीपर्स, सहा कर्मचारी असे एकूण 11 जण प्राणी, पक्षी व सर्पाची देखभाल करतात. डॉक्टरांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार प्राण्यांना आहार दिला जातो. प्रत्येक प्राण्यांवर वेळेवर योग्य ते उपचार केले जातात. साथीच्या आजारावर नियंत्रण येत नसल्याने या आजारात प्राण्यांचा मृत्यू होतो, असे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.
‘स्थापत्य’कडून माहिती देण्यास टाळाटाळ
प्राणिसंग्रहालयात एक व दोन असा दोन टप्प्यात काम करण्यात आले आहे. आता तिसर्या टप्प्यातील काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील माहिती देण्यास महापालिकेच्या उद्यान व क्रीडा स्थापत्य विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्या विभागाचे सहशहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडून त्याबाबतची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तसेच, सविस्तर माहिती देण्याबाबत वेगवेगळी कारणे पुढे केली जात आहेत.
अधिवेशनातही गाजला विषय
प्राणिसंग्रहालय सुशोभीकरणाचे काम सात वर्षे झाले तरी संपले नाही. त्यावर आतापर्यंत तब्बल 21 कोटींचा खर्च झाला. मात्र, येथे तरीही दुरवस्था जाणवत आहे.. सर्वत्र झाडीझुपडपी उगली असून,राडारोडा पडला आहे; तसेच, अनेक प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात ‘Bharat Live News Media’ने सातत्याने ठळक वृत्त प्रसिद्ध केले आहेत. त्यांची दखल घेऊन शहरातील आमदारांनी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मोठी चर्चा होऊन महापालिका कारभारावर खरमरीत टीका करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे नाचक्की झाली. या प्रकरणाची चौकशीही लावण्यात आली आहे.
उद्यान कधी सुरू होणार हे माहीत नाही
तिसर्या व अखेरच्या टप्प्यातील कामाची निविदा काढण्यात आली आहे. त्या कामाची मुदत सहा महिने आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण झाल्यास जुलै महिन्यात प्राणिसंग्रहालय नागरिकांसाठी खुले होऊ शकते; मात्र काम पूर्ण होण्यास विलंब झाल्यास नवा मुहूर्त जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे प्राणिसंग्रहालय नक्की कधी सुरू होईल, असे महापालिकेच्या अधिकारी सांगू शकले नाहीत.
दहा वर्षांत 36 प्राण्यांचा मृत्यू
प्राणिसंग्रहालय बंद असले तरी, तेथे पक्षी, प्राणी, सर्प आहेत. तेथील 7 मोर, 6 मगर, 4 कासव, 1 पक्षी, 5 साप, 5 घुबड, 1 ग्लॉसी इबिक पक्षी, 4 बेजरी गर पक्षी, 1 पॅरॉकिट पक्षी, 2 पोपट असे एकूण 36 प्राणी, पक्षी व सर्पांचा गेल्या 6 वर्षांत मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू नैसर्गिक व आजारपणामुळे झाल्याचा अहवाल औंध येथील शासकीय पशू रूग्णालयाने दिला आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात एकूण 184 पक्षी, प्राणी व सर्प आहेत.
The post Pimapri : प्राणिसंग्रहालयाचा कारभार राज्य शासनाच्या हाती appeared first on Bharat Live News Media.