संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना देणार दिलासा : अब्दुल सत्तार
नागपूर Bharat Live News Media वृत्तसेवा : संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य मंत्रिमंडळात प्रस्ताव आणून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज (दि.१८) विधानसभेत दिली. यासंदर्भात भाजप सदस्य मोहन मते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. सत्तार म्हणाले की, संत्रा निर्यातदारांना बांगलादेशने आयात शुल्क वाढवल्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना त्यांचे संत्रा पीक हे परदेशी न पाठवता स्थानिक बाजारपेठेत पाठवावे लागले. त्याचा परिणाम बाजारभाव गडगडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यासाठी राज्य शासनाने १६९ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली असून संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना निश्चितपणे दिलासा दिला जाईल. (Abdul Sattar)
विदर्भात मोठ्या प्रमाणात निर्यातक्षम संत्र्यांचे उत्पादन होते. राज्यात फळे, फुले व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत एकूण ४५ आधुनिक निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी विदर्भात ७ निर्यात सुविधा केंद्र असून, विशेषतः संत्र्यासाठी कारंजा घाडगे,जि. वर्धा व वरुड, जि. अमरावती येथे संत्रा निर्यात सुविधा केंद्रे कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण व भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्यानंतर केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने विदर्भासह इतर राज्यातील संत्रा उत्पादकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम, क्षेत्रभेट व कार्यशाळा इत्यादी आयोजित केल्या. या संस्थेमार्फत सन २०२१ ते २०२३ या कालावधीत जवळपास ४००० शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच रोगमुक्त लिंबूवर्गीय लागवड साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी एकूण ४ सामंजस्य करार करण्यात आले असून त्याअंतर्गत ५० लाखांपेक्षा जास्त साहित्याचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आल्याची माहितीही सत्तार यांनी दिली.
हेही वाचा
Blackbuck : ममदापूरला भरली काळविटांची जत्रा, ताशी ८० किमी धावण्याचा थरार बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Winter Session 2023 : घुसखोरी प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ सत्र सुरूच; कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब
Raosaheb Danve | इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी पीएम मोदींना भेटणार; केंद्रीय मंत्री दानवेंची माहिती
नाशिक जिल्ह्यात वाढतोय नवमतदारांचा टक्का, मतदार यादी नावनोंदणीसाठी २८ हजार अर्ज
The post संत्रा निर्यातदार शेतकऱ्यांना देणार दिलासा : अब्दुल सत्तार appeared first on Bharat Live News Media.