पोलिस दबावाखाली काम करताय : सुधाकर बडगुजर
नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क – शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. त्यांच्यासह दोघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांसह मनपाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात बोलताना, पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत असून माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास एसीबीसमोर जाहीर आत्महत्या करेल असा इशाराच आता बडगुजर यांनी दिला आहे.
बडगुजर यांनी आज पुन्हा पत्रकारपरिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत असून शिवसैनिकांवर अन्याय करण्याच्या हेतुने खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. अशाप्रकारे खोटे गुन्हे दाखल करणे चुकीचे आहे. पोलिसांनी योग्य पडताळणी केली पाहीजे. गुन्हे दाखल देण्याआधी नोटीस द्यायला हवी, आमचे म्हणणे ऐकुन घ्यायला हवे, मात्र आधी गुन्हे दाखल करायचे मग नोटीस बजावयची असे उलट काम सुरु असल्याचा घणाघात बडगुजरांनी केला. सगळ्याच पोलिसांवर नसला तरी काही पोलिसांवर नक्कीच दबाव आणला जातो आहे. पोलिस यंत्रणेला विनंती आहे, की त्यांनी खोटे गुन्हे दाखल करु नये. म्युनिसिपल कामगार सेनेचे कार्यालय सील करण्यात आले त्यावेळेलाही आमची बदनामी करण्यात आली. नंतर पोलिसांनी केस मागे घेतली. 53 वर्षाच्या राजकारणात माझ्यावर साधी एनसीही दाखल नाही, पण आता दबावाखाली येवून ओढून ताणून एखाद्या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला. सत्तेचा उन्माद जास्त काळ चालत नाही, पोलिसांनीही दबावाखाली येऊ नये असे बडगुजर म्हणाले.
दरम्यान दहशतवादी सलीम कुत्ता सोबतच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या प्रकरणात सुधाकर बडगुजर यांची सलग तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.१७) सायंकाळी गुन्हे शाखेने चौकशी केली. सुमारे दीड तास चौकशी झाल्यानंतर बडगुजर हे गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. आज (दि.18) त्यांनी पुन्हा पत्रकारपरिषद घेत आपल्यावरील आरोपांच्या खंडन केले.
The post पोलिस दबावाखाली काम करताय : सुधाकर बडगुजर appeared first on Bharat Live News Media.