सिंहगड घाट रस्त्यावर अपघात ; जीप उलटून बारा पर्यटक जखमी
खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावर रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. गडाच्या घाट रस्त्यावर सायंकाळी पाचच्या सुमारास चिंचेच्या बनाजवळ प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटून झालेल्या अपघातात बारा पर्यटक जखमी झाले. तर सकाळी वाहनतळाजवळ एक जीप कठड्याला धडकली. सुदैवाने दोन्ही घटनांत जीवितहानी टळली आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील, वनरक्षक बळीराम वाईकर, संदीप कोळी व सुरक्षारक्षकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पर्यटकांच्या मदतीने जखमी पर्यटकांना तातडीने सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जयश्री गावडे (वय 32), अस्मा पठाण (वय 25), दक्षा गोमपाटील (वय 37), शशिकला यादव (वय 32, सर्व रा. मुंबई) या चार जणांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर ते निघून गेले, असे डॉ. आशीष पाटील यांनी सांगितले. इतर पर्यटक किरकोळ जखमी झाले आहेत.
पर्यटक गडावरून खाली येत असताना त्यांची जीप उलटली. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे हवेली पोलिस ठाण्याचे अंमलदार एस. ए. गिरे यांनी सांगितले. दरम्यान, सकाळी दुसरी एक प्रवासी जीप वाहनतळाजवळील कठड्याला धडकली. सुदैवाने जीप संरक्षक कठड्याला धडकून जागीच थांबली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या जीपमध्ये विद्यार्थी होते. त्यातील एक मुलगी जखमी झाली.
काही खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने परिवहन नियमावलीनुसार कालबाह्य झाली आहेत. असे असताना राजरोसपणे धोकादायक घाट रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. गडावरील प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांची तपासणी करून कारवाई करावी, याबाबत परिवहन व पोलिसांकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली नाही, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. या घटनांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष पुन्हा अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा :
खंडेराय-म्हाळसादेवीला तेलवण व हळद
दिवंगत नेते विनायक मेटे यांची सदनिका बळकाविण्याचा प्रयत्न
The post सिंहगड घाट रस्त्यावर अपघात ; जीप उलटून बारा पर्यटक जखमी appeared first on Bharat Live News Media.