काँग्रेस, भाजपचे उमेदवार अद्याप अनिश्चित
ज्ञानेश्वर बिजले
पुणे : काँग्रेस महिनाअखेरीला नागपूरला राज्यातील लोकसभेच्या निवडणूक प्रचाराचा बिगूल फुंकणार असून, भाजपनेही आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी शनिवारी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. त्यामुळे पुण्यात या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी झाली असली, तरी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, त्याचा अंदाज कार्यकर्त्यांना अद्याप आलेला नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संघटना सध्या अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला निमंत्रण देण्यात गुंग आहेत. भाजपचे कार्यकर्तेही सध्या या तयारीत गुंतलेले आहे. या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या कालावधीत भाजपने राज्यातील लोकसभा मतदारसंघातील तयारीचा अंदाज घेण्यासाठी सर्व जिल्ह्यांतील पक्षाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांची बैठक शनिवारी नागपूरला घेतली.
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, बापू मानकर, वर्षा तापकीर यांच्यासह अन्य काहीजण बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी तेथे निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. पुण्यातून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, माजी खासदार संजय काकडे हे पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
तिघांची नावे चर्चेत
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर यांची नावे सध्या काँग्रेसकडून चर्चेत आहेत. याव्यतिरीक्त ऐनवेळी बाहेरील उमेदवारही पुणे शहरातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो. सध्यातरी काँग्रेसकडून उमेदवाराची निश्चिती झालेली नाही. त्यातच मित्रपक्षातील जागावाटप अद्याप जाहीर झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अथवा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पुण्यासाठी फारसा आग्रही नाही. त्यामुळे जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे येईल, असा अंदाज आहे. राज्यात दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या प्रचाराला वेग पकडला जात असताना, पुणे शहरातील दोन्ही प्रमुख पक्षांच्या हालचाली फारशा गतिमान झालेल्या नाहीत. उमेदवाराचे निश्चित संकेत पुढील महिनाभरातही मिळण्याची शक्यता धूसर आहे. मात्र, सर्व इच्छुकांनी त्यांच्या प्रचारासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याने, पुण्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
काँग्रेस तयारीत पिछाडीवर
काँग्रेस या मुख्य विरोधी पक्षाच्या गोटात मात्र भाजपच्या तुलनेत तयारी कमी प्रमाणात झाल्याचे दिसून येते. त्यांनी बूथरचना, तसेच प्रभागनिहाय बैठका घेतल्या आहेत. अनेक प्रमुख कार्यकर्ते अन्य राज्यांमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी तळ ठोकून बसले होते. मात्र, तेलंगणात विजय मिळाला, तरी अन्य तीन राज्यांत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. कार्यकर्त्यांत आलेली ही मरगळ दूर करण्यासाठी स्थानिक नेत्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
कँाग्रेस प्रचाराचे रणशिंग फुंकणार
देशपातळीवर विरोधी पक्षाची इंडिया आघाडी कशी आकार घेणार, ते येत्या आठवड्यात दिल्लीच्या बैठकीत स्पष्ट होईल. काँग्रेस आणि भाजपमध्ये विदर्भातील काही मतदारसंघात थेट लढत होणार असून, त्यादृष्टीने नागपूरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा 28 डिसेंबरला होणार आहे. तेथूनच राज्यातील लोकसभा निवडणूक प्रचाराचा बिगूल फुंकला जाणार आहे.
The post काँग्रेस, भाजपचे उमेदवार अद्याप अनिश्चित appeared first on Bharat Live News Media.