Pune Book Festival : पुण्यात कन्नड पुस्तकं हेच खरं सरप्राईज होतं !
नरेंद्र साठे
पुणे : ‘वीस वर्षे झाली, पुण्यात स्थायिक झालोय. आमचं शिक्षण गावी मंगलोरलाच झालं. आम्हा दोघा नवरा- बायकोला वाचनाची आवड असल्यानं, पुस्तक महोत्सवाला येण्याचं ठरलं होतं. मराठी फारशी वाचता येत नाही, पण इंग्रजी, हिंदी पुस्तकं घेण्याच्या उद्देशानं महोत्सवाला आलो. मात्र, फिरत असताना अचानक कन्नड भाषेतील फलक दिसला. बघतो तर सगळी कन्नड भाषेतील पुस्तकं! हे आमच्यासाठी सरप्राईज होतं,’ पुण्यात राहणारे कन्नड भाषिक रविशंकर मय्या आणि अनुपमा मय्या सांगत होते.
पुण्यात पहिल्यांदाच साहित्य संमेलनाव्यतिरिक्त इतर ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तक महोत्सव होत असल्याचे जाणकार सांगत आहेत. या महोत्सवामध्ये मराठी भाषेची सर्वाधिक दालने असली तरी इंग्रजीसह अन्य भारतीय भाषांची दालने पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव सुरू आहे. रविशंकर मय्या म्हणाले,‘लहानपणी गोष्टींची पुस्तकं वाचली होती. गोष्टी ऐकल्या होत्या. त्या आता पुस्तकस्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत. त्या घेण्यासाठी आम्हाला मंगलोर किंवा कर्नाटकमध्ये जाण्याची गरज भासली नाही. पुण्यात आम्हाला पहिल्यांदाच कन्नड भाषेतील पुस्तकं एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळाली. इतर पुस्तकं घेतलीच, पण मातृभाषेतील पुस्तकं पाहून मोह आवरला नाही. मित्रांनाही मला पुस्तके भेट देता येणार आहेत.’
महोत्सवात ‘साहित्य भांडार, बंगलोर’ असा इंग्रजीत नाव लिहिलेल्या स्टॉलच्या पुढं एका कापडी बॅनरवर हेच नाव कन्नड भाषेत लिहिलेलं असल्यानं लक्ष वेधून घेतं. या दालनाचे अभिजित राशी म्हणाले, ‘अनेकांनी स्वतः येऊन आमची विचारपूस केली आहे, काहींनी कन्नड साहित्याची आवड असल्यानं पुस्तकं घेतली आहेत. मराठी वाचकांना कन्नड आणि मराठीमध्येही भैरप्पा यांची दोन्हीही पुस्तकं एकाच वेळी उपलब्ध झाली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मराठी भाषेतील काही पुस्तकं कन्नडमध्ये भाषांतरित झाली आहेत, त्याशिवाय संत तुकाराम महाराजांच्या संदर्भातील काही पुस्तकंदेखील कन्नडमध्ये उपलब्ध आहेत.’
‘आमच्यासाठी हा नवीन अनुभव होता. एस. एल. भैरप्पांची पुस्तकं आम्ही प्रकाशित करत असल्यानं त्यांचे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं. भैरप्पांच्या पुस्तकांची अनेकांकडून विचारणा होत असून, ते आम्हाला उपलब्ध करून देत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे,’ कन्नड पुस्तकाच्या दालनातील ईश्वर व्ही. एन. सांगत होते.
The post Pune Book Festival : पुण्यात कन्नड पुस्तकं हेच खरं सरप्राईज होतं ! appeared first on Bharat Live News Media.