सिंधुदुर्गात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तोकडी यंत्रणा
नितीन कदम
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन जवळपास 25 वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, एवढ्या वर्षांतही समुद्रकिनार्यांवरील सागरी सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. या कालावधीत जिल्ह्यातील विविध समुद्रकिनार्यांवर गेल्या 25 वर्षांत 100 हून अधिक पर्यटक बुडून मृत झाल्याची नोंद आहे. पर्यटकांचा अतिउत्साह यासाठी कारणीभूत असला, तरीही जीवरक्षक, सुरक्षारक्षक व आपत्कालीन यंत्रणेचा अभाव ही या मागची प्रमुख कारणे आहेत. काही दिवसांपूर्वी देवगड समुद्रात बुडून पुण्याच्या 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सर्वसाधारणपणे नोव्हेंबरपासून जिल्ह्यात पर्यटन हंगामाला सुरुवात होते. यावर्षी या हंगामाची सुरुवातच पर्यटकांच्या दुर्घटनांनी झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात तारकर्ली समुद्रात तीन पर्यटक बुडाले होते. त्यातील दोघांना वाचविण्यात यश आले, तर एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पुणे येथून देवगड येथे आलेल्या सहलीतील 6 विद्यार्थी समुद्रस्नान करताना बुडाले; पैकी एकाला वाचविण्यात यश आले, तर 5 जणांचा बुडून मृत्यू झाला. यात 4 विद्यार्थिनींचा समावेश होता.
जिल्ह्यात देवगड, तारकर्लीप्रमाणेच वायरी, देवबाग, शिरोडा, सागरेश्वर आदी किनार्यांवर सातत्याने अशा दुर्घटना घडत असतात. येथील स्वच्छ व रुपेरी समुद्रकिनारे, निळेशार पाणी पाहून पर्यटकांना समुद्रस्नानाचा मोह आवरत नाही. अनेक पर्यटकांना समुद्रात पोहण्याची माहिती नसते. उत्साहाच्या भरात पर्यटक खोल समुद्रात जातात व अचानक पाण्यात ओढले जाऊन जीव गमावतात.
समुद्राबद्दलचे अज्ञान हे दुर्घटनांचे मुख्य कारण : दिलीप घारे
या दुर्घटनांबाबत बोलताना मालवण येथील मच्छीमार नेते दिलीप घारे म्हणाले, पर्यटक हे समुद्राबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतात. समुद्रात पोहण्याचा त्यांना अनुभव नसतो. समुद्र जरी वरून शांत वाटत असला तरी अंतर्गत पाण्याचे करंट सक्रिय असतात. हे करंट प्रामुख्याने तीव्र, मध्यम व स्लो अशा तीन प्रकारचे असतात. मच्छीमार मासेमारीसाठी समुद्रात जाळे टाकतात तेव्हाच हा करंट त्यांना समजून येतो. यामुळे पर्यटकांना असा करंट समजणे शक्य नाही. काहीवेळा हे करंट किनार्याकडून समुद्राकडे, तर काहीवेळा समुद्राकडून किनार्याकडे वाहत असतात. यातील किनार्याकडून समुद्राकडे वाहणारे करंट जास्त धोकादायक असतात. शिवाय समुद्रात अंघोळीसाठी 2 ते 3 फूट खोल अंतर सुरक्षित असते. देवगड येथील दुर्घटनेतील मुली 5 ते 6 फूट खोल पाण्यात आत गेल्या होत्या. ही बाब महत्त्वाची आहे. याबरोबरच पाण्याची खोली, भरती-ओहोटी, लाटांची उंची व गती या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. पर्यटकांना वरील गोष्टींची काहीच माहिती नसल्याने ते समुद्रात बुडतात, असे दिलीप घारे यांनी सांगितले.
टुरिझम पोलिसांची गरज
ज्या किनारपट्टीवर पर्यटकांचा लोंढा असतो, त्या ठिकाणी टुरिझम पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी जिल्हा पर्यटन महासंघ सातत्याने करत आहे. मात्र, शासनाकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. काही वर्षांपूर्वी शासनाने संबंधित ग्रामपंचायतींच्या माध्यमातून किनार्यांवर जीवरक्षकांची नियुक्ती करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तारकर्ली, देवबाग, वायरी-भूतनाथ आदी ग्रामपंचायतींनी जीवरक्षकांची नियुक्ती केली होती. मात्र, अल्प मानधन व अन्य सुविधा नसल्याने जीवरक्षकांनी काम करण्यास नकार दिला. या सर्व उणिवा लक्षात घेऊन शासनाने पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज आहे.
The post सिंधुदुर्गात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तोकडी यंत्रणा appeared first on Bharat Live News Media.