शेअर बाजारातील उत्साहवर्धक नवे उच्चांक!
सिद्धार्थ खेमका, रिटेल संशोधक, मोतीलाल ओसवाल वित्तीय सेवा लि.चे प्रमुख
भारतीय शेअर बाजार 2023 या कॅलेंडरीय वर्षाची अखेर आनंदोत्सवाने साजरी करत आहे. कारण, निफ्टीने 21 हजारांची पातळी ओलांडली आहे, तर सेन्सेक्सने 70 हजारांचा टप्पा पार केला आहे. जागतिक आणि देशांतर्गत पातळीवरून आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे गुंतवणूकदारांच्या सेंटिमेंटला नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये खूप मोठी चालना मिळाली असल्याने बाजाराने नवे उच्चांक गाठले आहेत. (Stock Market)
देशांतर्गत पातळीवर विचार करता सणासुदीच्या काळात दिसून आलेली भरभक्कम मागणी, उत्साहवर्धक आर्थिक आकडेवारी आणि उद्योग जगताची मजबूत कमाई या जोडीला विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू झालेला खरेदीचा ओघ यामुळे बाजाराला जोरदार बूस्टर मिळाला. डिसेंबरच्या सुरुवातीला चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रीय पातळीवरील स्थैर्याला बळकटी दिली आणि बाजारातील आत्मविश्वास वृद्धिंगत झाला. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये (जीडीपी आणि कॉर्पोरेट कमाई या दोन्ही बाबतीत) सर्वाधिक आर्थिक वाढ असणार्या भारताच्या आर्थिकीकरणासाठी आणि धोरणात्मक निर्णयांसाठी ही स्थैर्याची हमी आश्वासक ठरली. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये 7.6 टक्के वाढ झाली असून ती अपेक्षित अंदाजांपेक्षा अधिक ठरली आहे. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच जाहीर केलेल्या शेवटच्या पतधोरणामध्ये 2024 च्या वित्त वर्षासाठीचा सुधारित जीडीपी अंदाज जाहीर करताना तो 7 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. दुसर्या तिमाहीतील कॉपोर्रेट कमाईही 28 टक्क्यांनी वाढली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही वाढ 32 टक्क्यांवर पोहोचली होती. 2023 ते 2025 या आर्थिक वर्षांमध्ये निफ्टीचा ईपीएस-सीएजीआर सुमारे 20 टक्के राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे. या सर्वांमुळे अलीकडील काळात विविध वैश्विक पतमानांकन संस्था आणि गुंतवणूक संस्थांकडून भारताच्या रेटिंगबरोबरच जीडीपीतील वाढीचे पूर्वअंदाज सुधारित स्वरूपात मांडले जात आहेत. याचा परिणाम म्हणजे बीएसईवर नोंदणीकृत असणार्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेले आहे.
जागतिक पटलावरचा विचार करता डिसेंबर महिन्यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरवाढीबाबत घेतलेल्या नरमाईच्या धोरणाचे स्वागत केल्याचे दिसले आहे. भलेही अपेक्षेनुसार फेडने व्याजदरांमध्ये कोणताही बदल केलेला नसेल; पण आश्चर्यकारकरीत्या 2024 मध्ये तीन वेळा व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अमेरिकन बाँड यिल्ड पाच महिन्यांच्या नीचांकी पाळीवर म्हणजेच 3.91 टक्क्यांवर पोहोचली आहे, तर देशांतर्गत 10 वर्षांचे रोखे उत्पन्न 1 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले आहे. डॉलर इंडेक्सही 102 पर्यंत खाली घसरला आहे. यामुळे जागतिक स्तरावर आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे.
अमेरिकेतील चलनवाढीत झालेली घसरण, अन्य आर्थिक आकडेवारीतील सुधारणा आणि फेड रिझर्व्हने पुढील वर्षातील व्याजदर कपातीचे दिलेले संकेत यामुळे वैश्विक संकेत सकारात्मक आहेत. तेलाच्या किमतीत झालेली तीव्र घसरणही वरदान ठरणारी आहे. कारण, यामुळे कॉर्पारेट नफा वाढण्यास मदत होणार आहे. देशांतर्गत ग्राहक किंमत निर्देशांक 5.6 टक्क्यांवर आला असून तो अपेक्षेपेक्षा कमी आहे. औद्योगिक उत्पन्नात 16 महिन्यांतील उच्चांकी वाढ होऊन ते 11. 7 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे बाजारातील एकूण उत्साहाला आणखी चालना दिली आहे.
आयपीओच्या बाजारातही या उत्साहाचे प्रतिबिंब दिसून येत आहे. नोव्हेंबरमध्ये 8 कंपन्यांनी निधी उभारणी केल्यानंतर डिसेंबरमध्ये 10 कंपन्यांनी आयपीओमार्फत बाजारात प्रवेश केला आहे. प्राथमिक आणि दुय्यम अशा दोन्ही बाजारांमध्ये ब्रोकिंग उद्योगांनी नोव्हेंबरमध्ये 2.8 दशलक्ष नव्या गुंतवणूकदारांची भर घातली आहे आणि त्यांची एकूण गुंतवणूक 135 दशलक्ष रुपयांवर आहे. आणखी एक मैलाचा दगड म्हणजे, डिसेंबर महिन्यामध्ये भारताने हाँगकाँग स्टॉक एक्स्चेंजला मागे टाकून जगातील सातवे सर्वांत मोठे स्टॉक एक्स्चेंज बनण्याचा सन्मान मिळवला आहे. एकंदरीत पाहता, अनुकूल आर्थिक आकडेवारी, एफआयआयद्वारे होणारी भरभक्कम खरेदी, रोखे उत्पन्नातील घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट यामुळे भारतीय शेअर बाजाराला नवीन उच्चांक प्रस्थापित करण्यास मदत झाली आहे. निफ्टीने 2023 मध्ये आतापर्यंत 18 टक्के परतावा दिला आहे. या वृद्धीनंतरही निफ्टीचा सध्या 12 महिन्यांचा फॉरवर्ड पीई रेशो 18-19 एक्स इतका असून तो 10 वर्षांच्या सरासरी पीई रेशोच्या म्हणजेच 20 एक्सपेक्षा कमी आहे. (Stock Market)
येणार्या काळात लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही रॅली सुरू राहण्याची शक्यता असल्यामुळे बाजारातील सेंटिमेंट आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. 2024 मध्ये जागतिक स्तरावर प्रत्यक्ष व्याजदरातील कपात आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन भांडवली खर्चावरचा सरकारचा वाढलेला फोकस पाहता ग्रोथ स्टॉकवर लक्ष केंद्रित केले जाईल. बीएफएसआय, इंडस्ट्रीयल, रिअल इस्टेट, ऑटो आणि कंझ्युमर डिक्शनरी क्षेत्रातील समभाग येणार्या काळात चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.
(ट्रेडनेट वेल्थ ब्रोकिंग प्रा. लि. यांच्या सौजन्याने.)
The post शेअर बाजारातील उत्साहवर्धक नवे उच्चांक! appeared first on Bharat Live News Media.