मढी वादाशी आ.मोनिका राजळेंचा संबंध नाही : देवस्थान विश्वस्त
पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा : श्री क्षेत्र मढी येथील देवस्थान ट्रस्ट मंडळातील वादामध्ये आमदार मोनिका राजळे यांचा कोणत्याच प्रकारचा संबंध नाही. त्यांना बदनाम करण्याचे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप मढी देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी केला आहे.
पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृहावर देवस्थान समितीच्या विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार राजळे यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन केले. संजय मरकड यांनीच पूर्णनियोजित कटकारस्थान करून वादाला सुरुवात केल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
यावेळी विश्वस्त राधाकिसन मरकड, रवींद्र आरोळे, नवनाथ मरकड, शामराव मरकड, भगवान मरकड, भाऊसाहेब मरकड, जनार्दन मरकड, चंद्रभान पाखरे उपस्थित होते. यावेळी या विश्वस्तांनी संजय मरकड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. विश्वस्त व ग्रामस्थ म्हणाले, आमदार राजळे यांच्या घरी या हल्ल्यासाठी मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी कट रचला गेला, असे बिनबुडाचे खोटे आरोप स्वतः अध्यक्ष म्हणून घेणारे संजय मरकड करीत आहेत. कोणत्याही विश्वस्तांची मीटिंग आजपर्यंत आमदार राजळे यांच्या घरी झालेली नाही. 14 डिसेंबर रोजी आमची मासिक मीटिंग होती. त्यात विश्वस्तांच्या बहुमताने जे निर्णय होतात, ते मान्य केले जातात.
अशा पद्धतीची तरतूद ट्रस्टच्या घटनेत केलेली आहे. ही मीटिंग उधळून लावण्यासाठी संजय मरकड यांनी गडावर दहा-वीस गुंड गोळा करून ठेवले होते. ही मीटिंग संजय मरकड यांनी या गुंडांच्या मदतीने हाणून पाडली. आम्हाला मारहाण करून पवित्र देवस्थान ट्रस्टला गालबोट लावून याला राजकीय वळण दिले. अशा प्रवृत्तीपासून देवस्थान व गावच्या विकासावर मोठा परिणाम झाला आहे. रखडलेली विकासकामे, देवस्थानचे दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी अकरापैकी दहा विश्वस्त प्रयत्नशील आहेत.
संजय मरकड हा स्वतःला देवस्थान ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून घेतात. त्यांनी बहुमतातील निर्णय होऊ नये, म्हणून ही मीटिंग उधळून लावाण्याचा कट आधीच आखला होता. यापूर्वी विश्वस्तांच्या सर्वानुमते देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदावरून संजय मरकड यांना बहुमताने काढण्यात आले होते. अशा वाईट प्रवृत्तीला आमचा विरोध असून, ग्रामस्थ व भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आगामी काळात पुन्हा विश्वस्त मंडळाची मीटिंग घेऊन देवस्थानचा कारभार पूर्वपदावर आणू, असा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला.
राजकीय सूड उगविण्यासाठी आरोप
संजय मरकड यांना भाजपने दिलेल्या पदावर स्थगिती आली. त्याचा राजकीय सूड उगविण्यासाठी असे घाणेरडे आरोप ते करीत आहेत. आमदार राजळे यांचे सुरू असलेले चांगले काम यांना खपत नाही. त्यांना अडचणीत आणण्याचे काम संजय मरकड करीत आहेत.
गुन्हा सिद्ध झाल्याने पदावरून हटविले
काही महिन्यांपूर्वी संजय मरकड यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊन त्यांनी दंड भरला होता. न्यायालयीन प्रक्रियेत एखाद्या विश्वस्ताबाबत गुन्हा सिद्ध झाल्यास, मढी देवस्थान ट्रस्टच्या घटनेतील तरतुदीनुसार त्या व्यक्तीला पदावर राहता येत नाही, त्याला काढून टाकण्यात येते. या मुद्द्यावरून संजय मरकड यांना अध्यक्षपदावरून मागच्या मिटींगमध्ये हटविल्याचे विश्वस्तांनी सांगितले.
हेही वाचा
बैलगाड्याचा थरार डोळ्यांचे पारणे फेडणारा : शरद पवार
कडाक्याची थंडी ठरणार रब्बीसाठी पोषक
दागिन्यांचे मास्टरपीस असलेले ब्रेसलेट!
The post मढी वादाशी आ.मोनिका राजळेंचा संबंध नाही : देवस्थान विश्वस्त appeared first on Bharat Live News Media.