घसरलेल्या कांदा दरामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकटाचे सावट
बेल्हे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शेतकर्यांनी ऐन दुष्काळामध्ये अतोनात कष्ट करून प्रसंगी पाणी विकत घेऊन घेतलेल्या कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहेत. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. घसरलेल्या कांदा दरामुळे शेतकरी अक्षरश: हतबल झालेला दिसून येत आहे. या सर्व अडचणींमुळे पुढील हंगामात कांदा पिकवावा किंवा काय करावे या द्विधा मनःस्थितीत शेतकरी सापडला आहे.
जुन्नर तालुक्याच्या पूर्व पट्ट्यातील राजुरी, गुंजाळवाडी, बेल्हे, गुळूंचवाडी, रानमळा व आणे पठार भागातही मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. काही दिवसांपूर्वी पडलेल्या धुक्यामुळे कांदापातीला पीळ पडला व ते सावरण्यासाठी हजारो रुपयांची औषध फवारणी करावी लागल्याने उत्पादन खर्च वाढला. चार पैसे मिळण्याची आशा होती, तीही आता फोल ठरतेय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे दुष्काळाची दाहकता वाढत असताना कांद्याला रास्त भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या बाजारपेठेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे.
परिणामी, कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून कांदा शेतातून काढून बाजारपेठेत विक्रीस नेणे शेतकर्याला परवडेनासे झाले आहे. यामुळे आळेफाटा येथील कांदा लिलाव संतप्त झालेल्या कांदा उत्पादकांनी बंद पाडले. कांद्याचा उत्पादन खर्च पाहता, कांद्याला सरासरी बाजारभाव हा किलोला पस्तीस ते चाळीसच्या पुढेच पाहिजे, तरच उत्पादन घ्यायला परवडेल, अशी भावना शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.
कांदा उत्पादन करण्यासाठीचा खर्च वाढलेला आहे. खते, औषधे यांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. तसेच मशागत खर्चही वाढला आहे. त्यातच मजुरांची मनमानी आणि मजुरीचे वाढलेले दर त्यामुळे कांद्याचा उत्पादन खर्च वाढतो.
गजानन फराटे, कांदा उत्पादक शेतकरी
कांदा निर्यात थांबविल्यामुळे कांद्याचे दर कोसळले आहेत. निर्यातबंदी उठवत कांदा उत्पादकाला रास्त भाव देण्यात यावा, नाहीतर कांद्यालादेखील खर्चाच्या प्रमाणात हमीभाव द्यावा, अशी कांदा उत्पादकांची मागणी आहे.
राजेंद्र गाडगे, शेतकरी, बेल्हे
हेही वाचा
पुन्हा महासुनामी येण्याची शक्यता
पेरूमध्ये आढळले चक्क ‘देवाचे डोळे’!
आंतरराष्ट्रीय : आखाती भूमीत पुतीन यांची खेळी
The post घसरलेल्या कांदा दरामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकटाचे सावट appeared first on Bharat Live News Media.