खडकवासला : ’कोब्रा’ने स्वच्छतागृहात ठाण मांडल्याने दहशत
खडकवासला : Bharat Live News Media वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाट्यावरील ओढ्याच्या परिसरातील जेपीनगर वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात शुक्रवारी (दि. 15) कोब्रा नागाने ठाण मांडल्याने रहिवाशांत दहशत पसरली. त्यामुळे प्रशासनाचीही मोठी धावपळ उडाली. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर कोब्रा नाग स्वच्छतागृहातून लगतच्या ओढ्यात निघून गेला. स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था झाली आहे. दरवाजांसह फरशा फुटल्या आहेत. नियमित स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी दुर्गंधीमुळे स्वच्छतागृहे बंद होती. स्वच्छतागृहात कोब्रा व इतर विषारी सापांसह हिंस्र प्राणी ठाण मांडत आहेत. त्यामुळे महिला, मुलांसह नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले. स्वच्छतागृहाची साफसफाई करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्थानिक कार्यकर्ते नागेश शिंदे म्हणाले, ’मी स्वच्छतागृहात गेलो असता, महाकाय कोब्रा नाग पाहून जिवाच्या आकांताने धावत सुटलो. मोबाइलचा उजेड असल्याने नाग दिसला; अन्यथा जीवावर बेतले असते.’
ग्रामपंचायत काळापासून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आहेत. महापालिकेत समावेश झाल्यापासून देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. ओढ्यात बाराही महिने पाणी असल्याने साप व इतर प्राणी स्वच्छतागृहांसह वस्त्यांमध्ये येत आहेत. या स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
– रूपेश घुले, माजी उपसरपंच, नांदेड जेपीनगर येथील नागरिकांत भीती
हेही वाचा
एनडीए रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
’गुन्हेगारी पॅटर्न’द्वारे गुन्हेगारी संपवणार : पोलिस आयुक्त रितेश कुमार
मंजूर शिफारशीची अंमलबजावणी त्वरित करू : गुलाबराव पाटील
The post खडकवासला : ’कोब्रा’ने स्वच्छतागृहात ठाण मांडल्याने दहशत appeared first on Bharat Live News Media.