भाजपमध्ये भरती भरपूर… मैदानात कोण कोण उतरणार?
चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
राष्ट्रवादीला; विशेषतः मेहुणे के. पी. पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. भाजपमध्ये भरती भरपूर होत आहे; मात्र यापैकी मैदानात कोण कोण उतरणार? हे पाहावे लागेल. प्रमुख कारखान्यांच्या निवडणुका झाल्यामुळे आता लोकसभेची तयारी सुरू झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा या शिवसेनेकडे आहेत. सध्या हे दोन्ही खासदार शिवसेना शिंदे गटात आहेत. महाविकास आघाडीने अगोदरच कोल्हापूर लोकसभेची जागा आपण लढविणार, असे सांगून तयारी सुरू केली आहे; तर ‘हातकणंगले’त महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अद्याप चर्चाच नसल्याने तूर्त तरी राजू शेट्टी यांच्या नावाभोवती आघाडीचे राजकारण फिरत आहे.
संजय मंडलिक कोल्हापूरचे, तर धैर्यशील माने हातकणंगलेचे खासदार आहेत. या दोन्ही खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना भाजपच्या नेत्यांशी नेमकी काय चर्चा केली आहे, त्यावर सगळे राजकारण अवलंबून आहे. कारण, भाजपला कोल्हापूर लोकसभा लढवायची आहे. भाजपने कोल्हापूरची जागा लढवलेली नाही. आता भाजपला कोल्हापुरात आपली ताकद दाखवायची आहे. आज भाजपकडे धनंजय महाडिक, समरजित घाटगे, राहुल देसाई, अशा नेतृत्व करणार्या व्यक्ती आहेत. त्यापैकी महाडिक यांना भाजपने राज्यसभेसाठी संधी दिली. ते निवडूनही आलेत. त्यांना उमेदवारी दिली, तरी महाडिक आपली ताकद लावून निवडून आले आहेत. धनंजय महाडिक, शौमिका महाडिक लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांची दखल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही घेतली होती. महायुतीच्या जागावाटपात जागा कोणाकडे जाईल, हे पाहू; मात्र निवडणुकीची तयारी करा, असे पक्षाच्या नेतृत्वाने सांगितल्यामुळे भाजपची संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू आहे. मात्र, भाजपची सगळी मदार सध्या तरी केवळ आणि केवळ महाडिक गटावरच अवलंबून आहे. लोकसभेला टक्कर देऊ शकेल, असा एकही उमेदवार सध्या तरी भाजपकडे नाही.
आता ए. वाय. पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा आहे. यापूर्वी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, यापैकी कोणत्याही चर्चेला अद्याप पूर्णविराम दिलेला नाही. ए. वाय. पाटील ज्यांच्या त्रासाला कंटाळलो, असा दावा करीत आहेत ते हसन मुश्रीफ हे या महायुतीचे एक घटक आहेत. राष्ट्रवादीचा अजित पवार गट महायुतीचा घटकपक्ष असल्याने ए. वाय. पाटील भाजपमध्ये गेले काय किंवा शिंदे गटात गेले काय, मुश्रीफांबरोबर त्यांना व्यासपीठावर बसावे लागणार आहे. भाजपच्या या शिस्तीची माहिती ए. वाय. पाटील यांना घ्यावी लागेल. अर्थात, त्यांचे जवळचे नातलग आणि इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्यामुळे त्यांना भाजपची बर्यापैकी माहिती झाली असेल.
भाजपला आपला विस्तार करायचा आहे; कारण यापूर्वी मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गसंदर्भात बोलताना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविली तर बिघडले कुठे, असे वक्तव्य सावंतवाडीत केले होते; तर कोल्हापुरात बावनकुळे यांनी इचलकरंजीचे भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली असता, तुम्ही आता आमच्यासोबत असताना ताराराणी आघाडी कशाला पाहिजे, असा सवाल विचारला होता. या सगळ्या घटनाक्रम आणि चर्चेतून भाजपला कोल्हापूरची लोकसभेची एक जागा पाहिजे आहे, हे अधोरेखित होते. त्यामुळे कदाचित पुढच्या वाटचालीत मंडलिक किंवा माने या दोघांपैकी एकाच्या हाती कमळ आल्यास आश्चर्य वाटणार नाही. आज सगळी चर्चाच आहे. प्रत्यक्ष महायुती आणि महाविकास आघाडीचे जागावाटप सुरू होईल, त्यावेळी चित्र स्पष्ट होईल, तोवर चर्चेला ऊत येणारच आहे.
वर्चस्वासाठी टोकाची लढाई
आजरा कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने बोलताना हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील व आम्ही परस्परविरोधात लढत आहोत. आता लोकसभेला त्यांची व आमची लढाई होणार आहे. ते काँग्रेसचे आहेत, आम्ही भाजपबरोबर असल्याचे जाहीरपणे सांगितले. त्यामुळे लोकसभेच्या तोफेला आपल्या वक्तव्याने बत्ती दिली आहे. गेली काही वर्षे महाडिक यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या संस्थांवर आता हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांचे वर्चस्व आहे. छत्रपती राजाराम साखर कारखाना त्याला अपवाद आहे. आता जिल्ह्याचे राजकारण करायचे, तर लोकसभा हाती हवी, असा महाडिक गटाचा विचार असावा. त्याचप्रमाणे संजय मंडलिक यांच्याकडून झालेल्या पराभवाची परतफेड करायची संधी आली, तर धनंजय महाडिक भाजपची उमेदवारी सोडणार नाहीत.
The post भाजपमध्ये भरती भरपूर… मैदानात कोण कोण उतरणार? appeared first on Bharat Live News Media.