पुणे : दौंडच्या बड्या नेत्याला देशी कट्ट्याने धमकावले
दौंड/यवत; पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरातील पुनर्वसन जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातील वादातून सातारा येथील काही तरुण शुक्रवारी (दि. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास दौंड शहरातील एका प्रभावशाली राजकारण्याच्या घरात घुसल्याचा प्रकार घडला आहे. हा नेता घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या कार्यालयात ते देशी कट्ट्यासह घुसले. या जमीन प्रकरणातील मुख्य दलाल पासलकर याचा हे लोक शोध घेत होते असे समजते.
दौंड-पाटस रस्त्यावरील पुनर्वसनाच्या जमिनीचे हे प्रकरण असल्याचे समजते, ‘आपण तडजोडीने प्रकरण मिटवू’ असे सांगत नेत्याच्या केबिनमध्ये हे पाच ते सहाजण घुसले आणि तेथेच बसले. या वेळी त्यांनी ‘दलाल पासलकर याला बोलावून घ्या आणि आमचे जमिनीचे प्रकरण आता मिटवून टाका,’ असे सांगत नेत्याच्या समोरील टेबलवर देशी कट्टा ठेवला आणि ‘आता बोला’ असे या नेत्याला धमकावले. नेत्याने त्यांना बोलण्यात गुंतवले व ‘मी माझ्या पाहुण्यांना जरा बाहेर सोडून येतो,’असे सांगून ते केबिन बाहेर आले आणि त्यांनी आपले सहकारी व मित्रांना हा प्रकार सांगितला. हे वृत्त दौंड शहरात वाऱ्यासारखे पसरले व अनेक जण त्यावेळी नेत्याच्या कार्यालयात जमा झाले. गर्दी झालेली पाहून मांडवली करण्यास आलेल्यांनी पळ काढला. हे युवक सातारा शहरातील एका बड्या राजकीय व्यक्तींचे कार्यकर्ते असल्याचे चर्चा दौंड शहरात शनिवारी दिवसभर रंगली होती.
एकंदरीतच या सर्व प्रकरणावरून दौंड शहरात मोठी खळबळ माजली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री दहा वाजता घडून देखील याबाबतची फिर्याद दौंड पोलिस स्टेशनला शनिवारी रात्री उशिरापर्यंत दाखल झाली नव्हती. बडा नेता तातडीने फिर्याद का देत नाही यावरही चर्चा सुरू आहे. दरम्यान दौंड पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून त्यांनी सीसीटीव्ही फुटेजसह अन्य बाबींची तपासणी केली आहे.
पुनर्वसन जमिनी फसवणुकीतील ‘त्रिमुर्ती’
दौंड तालुक्यातील पानशेत पुनर्वसन जमीन खरेदी-विक्रीत अनेकांची फसवणूक झालेली आहे. यावरून शहरात मोठी धुसफुस आहे. सोशल मीडियावर अशा प्रकरणांची चर्चा आहे. या प्रकरणात ‘तीन नावे’ वारंवार सोशल मीडियावर झळकत आहेत, त्यातील एक जण मयत आहे, तर दुसरा हा पासलकर दलाल आहे. या पासलकर दलालाची चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे बाहेर येतील. प्रचंड मोठ्या राजकीय दबावाने ही प्रकरणे अन्यायपणे अनेक वर्षे दाबली जात आहेत. लोकांच्या चर्चेतील या प्रकरणांची खरे तर पोलिस, महसूल, पुनर्वसन विभागाने दखल घेण्याची गरज आहे, अशीही चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.
The post पुणे : दौंडच्या बड्या नेत्याला देशी कट्ट्याने धमकावले appeared first on पुढारी.
दौंड/यवत; पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरातील पुनर्वसन जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातील वादातून सातारा येथील काही तरुण शुक्रवारी (दि. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास दौंड शहरातील एका प्रभावशाली राजकारण्याच्या घरात घुसल्याचा प्रकार घडला आहे. हा नेता घरात नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्या कार्यालयात ते देशी कट्ट्यासह घुसले. या जमीन प्रकरणातील मुख्य दलाल पासलकर याचा हे लोक शोध घेत होते …
The post पुणे : दौंडच्या बड्या नेत्याला देशी कट्ट्याने धमकावले appeared first on पुढारी.