कामशेत शहर बनले समस्यांचे आगार
कामशेत : पुढारी वृत्तसेवा : मावळ पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ असलेले शहर म्हणून कामशेतची ओळख आहे. या गावची लोकसंख्या सुमारे वीस ते पंचवीस हजार आहे; तसेच येथील बाजारपेठेत कामानिमित्त येणार्या लोकांचीही मोठी वर्दळ असते; मात्र येथील नागरिकांना अनेक सुविधा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे.
पाणी समस्या
कामशेत शहरात प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून ही समस्या कामशेतकरांना भेडसावत आहे. अनेक भागात पाणीपुरवठा दिवसाआड केला जातो. तोही वेळेवर होत नाही. इंद्रायणी नदी कामशेत शहराला लागूनच वाहते. तरीदेखील सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकत नाही. जुनी ग्रामपंचायत असून पाणीशुद्धीकरण प्रक्रिया असूनही ती व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे येथील रहिवाशांना पाणी समस्येने ग्रासले आहे.
स्वच्छतेचा अभाव
गावातील कचरा जरी उचलत असला तरी तो विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःची जागा नाही. त्यामुळे येथील कचरा वेळेवर उचलला जात नाही. गावात पुणे-मुंबई महामार्गावर कचर्याचे ढीग दिसून येतात; तसेच काही ठिकाणी गटारे तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावरून वाहत असते, तर काही कॉलिनीमधील गटारांची सफाई केली जात नसल्याने येथील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहतूक कोंडी
कामशेतमधील वाहतूक कोंडी ही नेहमीच बाब झाली आहे. शहरात कोठेही पार्किंगची सुविधा नाही. खरेदीनिमित्त बाजारपेठे आलेले दुचाकीस्वार आपली वाहने रस्त्यातच उभी करतात. अथवा दुकानासमोर गाड्या लावतात. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन वाहतूक कोंडीत भर पडते; तसेच येथील अनेक दुकानदारांनीही अतिक्रमण केल्याचे आढळून येते. या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुलर्र्क्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बाजारपेठेतील नित्याच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक व पायी चालणारे नागरिक त्रस्त झाले आहेत.
सुलभ शौचालयाचा अभाव
कामशेत मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण असल्याने येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे शहरात सुलभ शौचालयाची गरज आहे; मात्र या ठिकाणी शौचालयाअभावी मोठी अडचण होत आहे. शहरात एकच शौचालय असून गेली महिनाभर तेही बंद आहे. त्यामुळे येथे बाजारात येणार्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या येथे तीन ते चार सुलभ शौचालयांची गरज आहे.
आठवडी बाजारसाठी जागेचा अभाव
दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो; परंतु या बाजारासाठी योग्य जागा नसून येथे सुविधांचा अभाव आहे. व्यावसायिक रस्त्याच्या बाजूस बसून भाजीविक्री करतात. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. येथे सुविधायुक्त भाजी मंडईची गरज आहे.
दूषित इंद्रायणी नदी
जवळच इंद्रायणीनदी असूनही स्वच्छता केली जात नाही. अनेक ठिकाणांहून नदीपात्रात कंपनीतील सांडपाणी सोडण्यात येत असल्याने इंद्रायणी प्रदूषित होत आहे.
मैदानाची आवश्यकता
शहरात नागरिकांना फिरण्यासाठी उद्यान नाही; तसेच मुलांसाठी मैदानही नाही. शहराचा विकास होण्यासाठी व शहरातील समस्या दूर करण्यासाठी प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत नाही. अजून किती वर्षे कामशेत या गोष्टीपासून वंचित राहणार आहे, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
कामशेतच्या विकासासाठी शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करावा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढण्यात यावीत.
– भाई भरत मोरे, नागरिक.
ग्रामपंचायतीने पाणी व कचरा समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणी शुद्धीकरण प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत करावे.
-शंकर शिंदे, नागरिक.
हेही वाचा
मावळमध्ये राज्यातील पहिला ‘ग्लास स्काय वॉक’ प्रकल्प
जुन्या पेन्शनसाठी आजपासून शिक्षक संपावर
2 लाख घरांपर्यंत पोचणार राम मंदिर उदघाटनाच्या अक्षता
The post कामशेत शहर बनले समस्यांचे आगार appeared first on पुढारी.
कामशेत : पुढारी वृत्तसेवा : मावळ पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ असलेले शहर म्हणून कामशेतची ओळख आहे. या गावची लोकसंख्या सुमारे वीस ते पंचवीस हजार आहे; तसेच येथील बाजारपेठेत कामानिमित्त येणार्या लोकांचीही मोठी वर्दळ असते; मात्र येथील नागरिकांना अनेक सुविधा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. पाणी समस्या कामशेत शहरात प्रामुख्याने जाणवते ती म्हणजे पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून ही …
The post कामशेत शहर बनले समस्यांचे आगार appeared first on पुढारी.