दहशतवादाचे नवे रूप
– सुशांत सरीन, सामरिकतज्ज्ञ
जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता आणि दहशत निर्माण करण्यासाठी पाकिस्तान आता आजी-माजी सैनिकांना दहशतवादी करत आहे. तसे पुरावे सापडत असून, भारतीय लष्कराकडून यासंदर्भात ठोस माहितीही दिली जात आहे. काश्मीरमधील अलीकडच्या काही चकमकी पाहिल्यास, त्यात आपले अनेक जवान शहीद आणि जखमी झाले आहेत. यावरून घुसखोरी करणारे तरुण हे दहशतवादी नसून, ते पाकिस्तानचे सैनिक आहेत, हे स्पष्ट होते.
केंद्र सरकारने कलम 370 आणि 35 अ रद्द करून जम्मू-काश्मीर विभाजनाचा निर्णय घेतल्यानंतर म्हणजेच 2019 पासूनच्या काश्मीरच्या स्थितीचे आकलन केल्यास दहशतवादी संघटनांत स्थानिक युवकांची भरती कमी झाली आहे. त्यापूर्वीच्या काळातही शंभर ते दीडशेपेक्षा अधिक स्थानिक युवक दहशतवादी संघटनांकडे वळत असल्याच्या बातम्या येत नव्हत्या. यामागचे कारण म्हणजे, दहशतवादी कारवायांत झालेली घट. तसेच काश्मीर खोर्यात दहशतवाद्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी ठिकाणे राहिलेली नाहीत. कडक सुरक्षाव्यवस्था आणि भारतीय लष्कराच्या वाढत्या मोहिमांमुळे दहशतवादी संघटनांची कोंडी झाली आहे. अशा कारणांमुळे दहशतवादी कारवायांच्या ठिकाणांतही बदल झाला आहे. काश्मीर खोर्यात बहुतांश घटना राजौरी भागात होत आहेत.
डोडामध्येही अशीच स्थिती आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी सैनिकांना पाठवले जात असून, अर्थात ही बाब नवीन नाही. 1990 च्या दशकातही असाच अनुभव आला आहे. भारतीय सुरक्षाव्यवस्थेकडून एखाद्या भागात कारवाई झाली, तर दहशतवाद्यांना तेथून बस्तान हलवावे लागते. परिणामी, त्या भागात शांतता प्रस्थापित होते. बराच काळ तो भाग निर्जन राहतो; पण ही चूक म्हणा किंवा आणखी काही म्हणा, याचा फायदा उचलत पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी पुन्हा सक्रिय होतात. काश्मीर खोर्यात दहशतवादी कारवायांसाठी माणसे मिळत नसली, तरी ते काश्मीरचा मुद्दा सोडण्यास तयार नाहीत. अशावेळी त्यांना सैनिक किंवा परदेशी भाडोत्री दहशतवाद्यांची गरज भासत आहे. भाडोत्री दहशतवाद्यांची स्थिती पाहिली, तर असा प्रकार 1990 च्या दशकातही समोर आला होता. अरब, अफगाणी, सुदानचे दहशतवादी काश्मीरमध्ये येत. त्यांची संख्या कमी असते; परंतु ते दहशतवादी कारवायांत सामील व्हायचे. त्यांना पाकिस्तानी सैनिक आणि गुप्तचर खाते ‘आयएसआय’कडून सूचना दिल्या जायच्या.
पाकिस्तानी सैनिकांचा दहशतवादी संघटनांत समावेश असण्याबद्दल भारतीय लष्कराने मांडलेले मत वास्तवतेच्या आधारावर आहे. अलीकडच्या चकमकी पाहिल्यास त्यात आपले अनेक जवान शहीद आणि जखमी झाले. यावरून घुसखोरी करणारे तरुण हे दहशतवादी नसून, ते पाकिस्तानचे सैनिक आहेत, हे स्पष्ट होते. मात्र, हे दहशतवादी माजी सैनिक आहेत की सध्या कार्यरत असणारे आहेत, हे सांगणे कठीण आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांची समस्या ही पूर्वीपासूनच होती. आता काश्मीरमध्ये आहे. त्यावर फारशी चर्चा होताना दिसत नाही. राजस्थानच्या सीमाभागात या प्रश्नाने गंभीर रूप धारण केले आणि त्याची लागण गुजरातमध्ये होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. अमली पदार्थांचा विचार केला, तर यात प्रचंड पैसा असतो. दहशतवाद्यांच्या पाठबळावर हा धंदा खूप चालतो. पंजाबमध्ये सध्या खलिस्तानची हवा निर्माण केली जात आहे. त्यासाठीचा पैसा हा अमली पदार्थांच्या तस्करीतूनच येत आहे. पंजाबमध्ये असलेल्या या व्यवसायात स्थानिक नेते, अधिकारी, पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे. त्यांना बेड्याही ठोकल्या गेल्या आहेत. दुर्दैवाने कोणी ठोस कारवाई करण्यास तयार नाही. आम आदमी पक्षाने पंजाब निवडणुकीअगोदर बर्याच घोषणा केल्या; परंतु सरकार स्थापन होताच परिणामकारक कारवाईचे आश्वासन हवेत विरले. असाच प्रकार काश्मीरमध्ये घडत आहे. दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पाकिस्तानचे नापाक इरादे हाणून पाडताना, दुसरीकडे अमली पदार्थांच्या तस्करीकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
The post दहशतवादाचे नवे रूप appeared first on पुढारी.
जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता आणि दहशत निर्माण करण्यासाठी पाकिस्तान आता आजी-माजी सैनिकांना दहशतवादी करत आहे. तसे पुरावे सापडत असून, भारतीय लष्कराकडून यासंदर्भात ठोस माहितीही दिली जात आहे. काश्मीरमधील अलीकडच्या काही चकमकी पाहिल्यास, त्यात आपले अनेक जवान शहीद आणि जखमी झाले आहेत. यावरून घुसखोरी करणारे तरुण हे दहशतवादी नसून, ते पाकिस्तानचे सैनिक आहेत, हे स्पष्ट होते. केंद्र सरकारने …
The post दहशतवादाचे नवे रूप appeared first on पुढारी.