वैष्णवांचा सागर गहिवरला; माउलींच्या जयघोषात 727 वा संजीवन समाधी सोहळा
आळंदी : पुढारी वृत्तसेवा
पाहूनी समाधीचा सोहळा ।
दाटला इंद्रायणीचा गळा?
बाळ सिद्ध पाहता चिमुकला ।
कुणी गहिवरे कुणी हळहळे ।
भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला? चोखा गोरा आणि सावता ।
निवृत्ती हा उभा एकटा ।
सोपानासह उभी मुक्ता अश्रूपुर लोटला?
सुमारे 727 वर्षांपूर्वी ज्या विरहाने इंद्रायणी हेलावली होती, तोच सोहळा हजारो वारकरी, भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. नामदेव महाराजांचे 16 वे वंशज ह.भ.प. मुकुंद महाराज नामदास यांच्या अमोघ वाणीतून समाधी सोहळ्याचे कीर्तन ऐकून वैष्णवांचा सागर गहिवरला. भाविकांचे पाणावलेले डोळे त्याच प्रसंगाची प्रत्यक्ष अनुभूती करून देत होते.
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ।
उद्धरावया आले दीन जनां ।1।
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी ।
नाम घेता वदनी दोष जाती ।2।
हो कां दुराचारी विषयी आसक्त ।
संत कृपे त्वरित उद्धरती ।3।
अखंडित नामा त्यांचा वास पाहे ।
निशिदिनी ध्याये सत्संगती ।4।
या अभंगातून माउलींच्या जीवनचरित्राची माहिती देत समाधी सोहळ्याचे वर्णन करताना मुकुंद महाराज नामदास हेदेखील अक्षरशः भावनाविवश होत अश्रू ढाळत होते. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घंटानाद करत समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नामदेव महाराज पादुका माउलींच्या समाधीजवळ नेण्यात आल्या आणि माउलीनामाचा एकच जयघोष करत भावपूर्ण वातावरणात
श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 727 वा संजीवन समाधी सोहळा सोमवारी (दि. 11) दुपारी साडेबारा वाजता पार पडला. राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या हजारो भाविकांनी ‘याचि देही याचि डोळा’ हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवत संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
तत्पूर्वी, माउलींना पवमान अभिषेक व दूधआरती घालून पहाटे तीन वाजेच्या सुमारास प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सकाळी दहा वाजता हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज ह.भ.प. मुकुंद महाराज नामदास यांचे समाधी सोहळा वर्णनपर कीर्तन झाले. मंदिराच्या महाद्वारात हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. दुपारी पावणेबाराच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि माउलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली.
संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत माउलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या. तदनंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून महाद्वारातून बाहेर पडल्या. ‘धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधि स्थिरा, कृष्णपक्षी तुज निर्धारा, भेट देत जाईन, कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरीयात्रा होईल सरिशी, दुसरी कृष्णपक्षी निर्धारिसी, तुज दिधली असे…..’असे म्हणत सर्व उपस्थित संतसज्जन, वारकरी, भाविकांनी संजीवन समाधीचे दर्शन घेतले.
या देदीप्यमान सोहळ्याप्रसंगी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के. पी. नांदेडकर, विश्वस्त योगी निरंजननाथजी, ह.भ.प. भावार्थ देखणे, अॅड. विकास ढगे पाटील, अॅड. राजेंद्र उमाप, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, पंढरपूर देवस्थानच्या विश्वस्त श्रीमती मेडगिरी, माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी कुंदलवाड, मुक्ताई देवस्थान अध्यक्ष भैया पाटील, त्र्यंबकेश्वर देवस्थान अध्यक्ष नीलेश गाढवे, मानकरी बाळासाहेब कुर्हाडे, योगेश आरु, स्वप्निल कुर्हाडे, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, सचिन गिलबिले, दिनेश घुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, मच्छिंद्र शेंडे व इतर सेवेकरी, मानकरी, भाविक-भक्त व आळंदीकर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
हेही वाचा
कोयनेतील पाण्याचा मुद्दा अधिवेशनात गाजणार
पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेणे अशक्य
सांगली : लाच घेतल्याप्रकरणी सरकारी वकिलास अटक
The post वैष्णवांचा सागर गहिवरला; माउलींच्या जयघोषात 727 वा संजीवन समाधी सोहळा appeared first on पुढारी.
आळंदी : पुढारी वृत्तसेवा पाहूनी समाधीचा सोहळा । दाटला इंद्रायणीचा गळा? बाळ सिद्ध पाहता चिमुकला । कुणी गहिवरे कुणी हळहळे । भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला? चोखा गोरा आणि सावता । निवृत्ती हा उभा एकटा । सोपानासह उभी मुक्ता अश्रूपुर लोटला? सुमारे 727 वर्षांपूर्वी ज्या विरहाने इंद्रायणी हेलावली होती, तोच सोहळा हजारो वारकरी, भाविकांनी …
The post वैष्णवांचा सागर गहिवरला; माउलींच्या जयघोषात 727 वा संजीवन समाधी सोहळा appeared first on पुढारी.