सत्तारूढ नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊन दाखवावे : नाना पटोले
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत, पण भाजपचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सुपर मुख्यमंत्री उत्तरे देतात. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरपूर मदत दिली असे म्हणतात पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. एकीकडे कोरडा तर दुसरीकडे ओला दुष्काळ आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकरी संकटात असल्याने सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिलीच पाहिजे, सरकारला आम्ही सोडणार नाही, जिल्हा, तालुकानिहाय मदतीची आकडेवारी आम्ही मागू, ही सुरुवात असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि. ११) दिला. तीन राज्यातील निवडणूक निकालाचे गोडवे गाणाऱ्या सत्तारूढ नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊन दाखवावे, राज्यातील जनतेत प्रचंड असंतोष आहे. जनतेला फसवण्याचे काम फडतूस सरकार करीत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात पहिल्याच दिवशी दिक्षाभूमी ते विधानभवन असा हल्लाबोल मोर्चा प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आला. या मोर्चात हजारो लोकांनी सहभाग घेतला. यापूर्वीच्या युवक काँग्रेसचे आक्रमक मोर्चामुळे आज (दि. ११) पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता.
मोर्चाला संबोधित करताना पटोले म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारी, परस्परात तेढ वाढली आहे. या सरकारला शेतकऱ्यांचे देणेघेणे नाही, बेरोजगारांची थट्टा चालवली आहे. शिक्षण भरतीचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्या जात आहेत पण सरकार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तिसगड व मध्य प्रदेशला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमाभागात काँग्रेस पक्षाला मोठे जनसमर्थन मिळालेले आहे. या भागातून ७५ ते १०० टक्के काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, महाराष्ट्रातही काँग्रेसची लाट आहे हे लक्षात घ्या. भाजप म्हणते तीन राज्यात जिंकलो मग हिम्मत असेल तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लावून दाखवा. जनता भाजपाच्या विरोधात आहे हे भाजपालाही माहित आहे म्हणून ते निवडणुकीला घाबरतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तिसगडमध्ये धानाला ३१०० रुपये भाव व एक हजार बोनस देण्याची तसेच ४५० रुपयांना सिलिंडर देण्याची घोषणा करतात मग महाराष्ट्रात का देत नाही याचे उत्तर भाजपा सरकारला द्यावे लागेल. हल्ला बोल मोर्चा हा सरकारला एक इशारा आहे हे लक्षात ठेवा. शेतकरी, बेरोजगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महागाई प्रचंड असून जनतेला जगणे कठीण झाले आहे, शिक्षण झाले तरी तरुणांना नोकरी मिळत नाही, जनतेचे ज्वलंत प्रश्न आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. वीमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवून लुटत आहेत पण सरकार त्यावर काहीच करत नाही. महाराष्ट्रातील भाजपा सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणायचे आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, तेलंगणात काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या आणि जनतेने काँग्रेसला भरघोस मतदान करून सत्तेत आणले, कर्नाटकातही काँग्रेसने गॅरंटी दिल्या तेथेही काँग्रेसचे सरकार आले आता महाराष्ट्रातही काँग्रेसचे सरकार आणू. बेरोजगारीची संख्या वाढलेली आहे पण सरकारने पाच वर्षात नोकर भरती केली नाही. MPSC च्या परिक्षा होत नाहीत, गावात वीज नाही, पाणी नाही, शेती संकटात आहे. बरोजगार, शेतकरी, महिला, शेतमजूर, सफाई कामगारांचे प्रश्न आहेत. सरकारमधील मंत्री एकमेकाविरोधात बोलत आहेत. आजचा हा मोर्चा फक्त काँग्रेसचा नसून जनतेचा आक्रोश दाखवणारा आहे.
दरम्यान,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील शेतकरी दुष्काळ, गारपिट, अवकाळी पावसाने देशोधडीला लागला आहे. अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी लावून धरत आहोत पण सरकार ऐकत नाही. आता शेतकरीच सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही. ‘जनतेला केले भिकारी आणि शासन आपल्या दारी’ अशी अवस्था आहे. अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार नोकर भरती करण्याचे आश्वासन दिले पण अजून नोकर भरती नाही. भ्रष्टाचारासोबत मूळ प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये म्हणून या सरकारने समाजा-समाजात भांडणे लावली आहेत. सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आम्ही लढतो यावर भर दिला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर तोफ डागली. केंद्र सरकारने नोटबंदी, जीएसटी, लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्था बिघडवली परिणामी लघु, मध्यम, छोटे उद्योग बंद पडले आहेत. नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था रसातळाला नेली,संविधान रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन केंद्रातील भाजपा सरकारचा पराभव करा, असे आवाहन त्यांनी केले.
The post सत्तारूढ नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊन दाखवावे : नाना पटोले appeared first on पुढारी.
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगारांचे प्रश्न मोठे आहेत, पण भाजपचे आंधळे, बहिरे, मुके सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सुपर मुख्यमंत्री उत्तरे देतात. मख्यमंत्री प्रश्नांना उत्तरे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरपूर मदत दिली असे म्हणतात पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नाही. एकीकडे कोरडा तर दुसरीकडे ओला दुष्काळ आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …
The post सत्तारूढ नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेऊन दाखवावे : नाना पटोले appeared first on पुढारी.