वारणेत 13 डिसेंबरला भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम
वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगर येथे दि. 13 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम आयोजित केला असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.
प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी नुकताच महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला सिकंदर शेख विरुद्ध मोनू दहिया (वीरेंद आखाडा, दिल्ली) यांच्यात लढत होणार आहे.
वारणानगर येथील वारणा विद्यालयाच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या मैदानावर दुपारी एक वाजता आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती श्री कुस्तीचा महासंग्राम होणार आहे यामध्ये प्रमुख अकरा ‘शक्ती श्री’ किताबांसह 35 पुरस्कृत कुस्त्या व वजनी गट 30 किलो ते 84 किलोपर्यंतच्या दोनशेवर चटकदार कुस्त्या होणार आहेत.
देश-विदेशासह भारतातील नामांकित मल्लांची निवड या कुस्ती महासंग्रामासाठी करण्यात आली आहे. या मैदानातील महत्त्वपूर्ण लढतीसाठी इराणचा आंतरराष्ट्रीय विजेता अहमद मिर्झा व दुसरा आंतरराष्ट्रीय विजेता रिझा इराणी येणार आहेत.
या पत्रकार परिषदेस समन्वयक प्रा. जीवनकुमार शिंदे, वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदीप पाटील, निवेदक ईश्वरा पाटील, विकास चौगुले, नामदेव चोपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
25 हजारांचे विशेष बक्षीस
या मैदानासाठी देशातील नामवंत मल्ल प्रमुख 11 किताबांच्या लढतींत येत असून, यामधील 9 मल्ल महाराष्ट्रामध्ये प्रथमच वारणेच्या मैदानात लढतीसाठी येणार आहेत, त्यामुळे या प्रेक्षणीय लढती ठरणार आहेत. 11 किताबांच्या लढतीत जी कुस्ती प्रेक्षणीय होईल त्यास वेगळे 25 हजारांचे बक्षीस देण्याची घोषणा आमदार कोरे यांनी केली आहे.
पुढील वर्षी पाकिस्तानचे मल्ल खेळणार?
वारणेतील आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात पाकिस्तानचे मल्ल आणण्याचे निश्चित झाले होते. कुस्त्याही ठरल्या होत्या; मात्र खूप प्रयत्न करूनही व्हिसा मिळण्यास अडचणी आल्यामुळे पाकिस्तानचे मल्ल येऊ शकले नाहीत; परंतु पुढील वर्षीच्या मैदानासाठी पाकिस्तानचे मल्ल आणणार असल्याचे आ. विनय कोरे यांनी सांगितले.
प्रमुख किताबाच्या कुस्त्या अशा…
‘जनसुराज्य शक्ती श्री’ : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (गंगावेस, कोल्हापूर) विरुद्ध मोनू दहिया (दिल्ली).
‘वारणा साखर शक्ती श्री’ : हर्षद सदगीर (पुणे) विरुद्ध अहमद मिर्झा (इराण).
‘वारणा दूध संघ शक्ती श्री’ : पृथ्वीराज पाटील (देवठाणे, कोल्हापूर) विरुद्ध लालिमांड (लुधियाना, पंजाब).
‘वारणा बँक शक्ती श्री’ : माऊली कोकाटे (पुणे) विरुद्ध भीम (धूमछडी, पंजाब).
‘वारणा दूध साखर वाहतूक शक्ती श्री’ : प्रकाश बनकर (गंगावेस) विरुद्ध अभिनयक सिंग (दिल्ली).
‘वारणा ऊस वाहतूक शक्ती श्री’ : दादा शेळके (पुणे) विरुद्ध पालिंदर (मथुरा, हिमाचल).
‘वारणा बिल ट्यूब शक्ती श्री’ : कार्तिक काटे (कर्नाटक केसरी) विरुद्ध जितेंद्र त्रिपुडी (हरियाणा).
‘वारणा शिक्षण शक्ती श्री’ : सुबोध पाटील (सांगली) विरुद्ध संदीप कुमार (दिल्ली).
‘वारणा बझार व वारणा महिला शक्ती श्री’ : सतपाल सोनटक्के (टेंभुर्णी) विरुद्ध रिजा (इराण).
‘ईडीएफ मान शक्ती श्री’ : कालिचरण सोलणकर (गंगावेस) विरुद्ध देव नरेला (दिल्ली).
‘वारणा नवशक्ती श्री’ : नामदेव केसरे (वारणा) विरुद्ध रवी कुमार (हरियाणा).
The post वारणेत 13 डिसेंबरला भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम appeared first on पुढारी.
वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 29 व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगर येथे दि. 13 डिसेंबर रोजी भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम आयोजित केला असल्याची माहिती आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. प्रथम क्रमांकाच्या ‘जनसुराज्य शक्ती श्री’ किताबासाठी नुकताच महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला सिकंदर शेख विरुद्ध मोनू …
The post वारणेत 13 डिसेंबरला भारत विरुद्ध इराण आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम appeared first on पुढारी.