पुणे : आंतरराष्ट्रीय उड्डाणे जमिनीवरच !
प्रसाद जगताप
पुणे : पुण्यासारख्या शहरातून विविध देशांसाठी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या दुबई आणि सिंगापूर याच दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे येथून होतात. त्यासह इतर देशांमध्ये वाढ करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रशासकीय पातळीवर चर्चा, बैठका झाल्या. स्वतः केंद्रीय हवाई राज्यमंत्र्यांनी देखील यासंदर्भातील घोषणाबाजी केली. परंतु, प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे वाढीला येथून मुहूर्त मिळेनासा झाला आहे.
पुणे विमानतळावरून दररोज 180 ते 190 च्या घरात विमानोड्डाणे होतात. त्याद्वारे 25 ते 30 हजार प्रवासी दररोज येथून ये-जा करतात. त्यांच्या माध्यमातून शासनाला भरघोस महसूल मिळतो. मात्र, अद्याप येथील नागरिकांना म्हणाव्या, तशा सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, अशी खंत अनेक प्रवासी व्यक्त करीत आहेत. त्यातच पुणेकरांना पुण्यातून थेट परदेशात प्रवास करता येत नाही, हीदेखील असुविधाच आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी थेट मुंबई किंवा दिल्ली गाठावी लागत आहे. तेथूनच त्यांना परदेशात जाण्यासाठी विमानाने प्रवास करता येतो. आगामी काळात असे न करता आम्हाला पुण्यातूनच थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मिळावी, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे.
प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी बँकॉक सेवा पडली बंद…
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे मागे पुणे दौर्यावर होते. त्या वेळी त्यांनी पुणे विमानतळ प्रशासनाने उभारलेल्या भव्य अशा पार्किंगचे उद्घाटन केले. त्या वेळी पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पुण्यातून दोन विमानोड्डाणे वाढली. एक सिंगापूरसाठी तर दुसरे बँकॉकसाठी, अशी दोन उड्डाणे वाढली. यातील सिंगापूरसाठी असलेल्या विमानाला पुणे विमानतळावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, प्रवासीच नसल्यामुळे बँकॉकची विमानसेवा बंद पडली.
धावपट्टीचा ठरतोय अडसर…
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विमानतळावर महापालिका प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी, हवाईदल यांनी मागील काळात एकत्रित बैठक घेतली होती. त्या वेळी धावपट्टी वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले जाणार होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही येथे करण्यात आलेली नाही. अपुरी धावपट्टी असल्यामुळे येथून विमानांच्या उड्डाणांना अडथळा येत आहे. त्यामुळे नवीन आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या उद्घाटनाअगोदरच येथील धावपट्ट्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी होत आहे.
पुण्यातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपसारख्या देशांसाठी उड्डाणे करण्याकरिता प्रथमत: धावपट्टीचा मोठा अडसर निर्माण होत आहे. तसेच, आपले विमानतळ हे शेअर विमानतळ आहे, आपल्याला ते हवाईदलाबरोबर शेअर करावे लागते. जर आपल्या येथून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढवायची असेल तर आपल्याकडे शंभर टक्के नागरी विमानतळ असायला हवे. त्यासोबतच आपल्याकडे लांब पल्ल्याची मोठी विमाने व्यवस्थितरीत्या उभी राहतील, याकरिता पार्किंग बे आवश्यक आहे. त्यासोबतच बाहेरील बाजूस वाहनांसाठी भव्य असे स्वतंत्र पार्किंग हवे.
– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ
हेही वाचा
सागरी सुरक्षेला प्राधान्य द्यावेच लागेल
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 765 पदांवर होणार भरती
रागीट बापाकडे अल्पवयीन मुलीचा ताबा नाही : हायकोर्ट
The post पुणे : आंतरराष्ट्रीय उड्डाणे जमिनीवरच ! appeared first on पुढारी.
पुणे : पुण्यासारख्या शहरातून विविध देशांसाठी थेट आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या दुबई आणि सिंगापूर याच दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे येथून होतात. त्यासह इतर देशांमध्ये वाढ करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पुण्यात प्रशासकीय पातळीवर चर्चा, बैठका झाल्या. स्वतः केंद्रीय हवाई राज्यमंत्र्यांनी देखील यासंदर्भातील घोषणाबाजी केली. परंतु, प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे वाढीला येथून मुहूर्त …
The post पुणे : आंतरराष्ट्रीय उड्डाणे जमिनीवरच ! appeared first on पुढारी.