द. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर भारताचे 7 फिरकीपटू प्रभावशाली ठरणार?
पुढारी ऑनलाईन डेस्क : Indian Spinners SA Tour : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचे संघ सज्ज झाले आहेत. यातील अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन हे 7 फिरकीपटू द. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर कशी कामगिरी करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ajay Jadeja : तर, अजय जडेजा पाकिस्तानचा प्रशिक्षक होणार…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेत अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी लक्षवेधी गोलंदाजी केली. दोघांनी दाखवून दिले की त्यांना संधी मिळाली तर ते चुकणार नाहीत. अशा परिस्थितीत टीम इंडियाकडे आता फिरकी गोलंदाजांचा उत्कृष्ट ताफा आहे. आफ्रिका दौऱ्यातच टीम इंडियाच्या टी-20 संघाचे कर्णधार पद रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव यांच्यातील कोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे वनडे संघात अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांचा समावेश आहे. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा कसोटी मालिकेत फिरकीपटू म्हणून असतील. (Indian Spinners SA Tour)
1 : अक्षर पटेलने संधीचे सोने केले
अक्षर पटेल दुखापतीमुळे वर्ल्ड कप 2023 मध्ये खेळू शकला नाही, यानंतर तो थेट ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत खेळायला आला. त्याने या मालिकेत एकूण 6 विकेट घेतल्या. या काळात, त्याच्या फिरकी मा-यातील बदल स्पष्टपणे दिसून आला. विशेष म्हणजे त्याची गोलंदाजी पूर्वीपेक्षा अधिक धारदार झाल्याचे पहायला मिळाले. कांगारूंविरुद्धच्या टी-20 मालिकेत तो अधिक किफायतशीर ठरला. रवी बिश्नोई सोबत त्याने या पाच सामन्यांच्या मालिकेत 15 विकेट घेतल्या, ज्या दरम्यान दोघांचा इकॉनॉमी रेट 7.2 राहिला. हा रेट टी-20 गोलंदाजांच्या दृष्टीने उत्कृष्ट म्हणता येईल. अक्षरने भारतीय संघासाठी विशेषतः पॉवर प्लेमध्ये चमकदार गोलंदाजी केली. स्पिनिंग ट्रॅकवर त्याचा आर्म बॉल खूप धोकादायक ठरतो. (Indian Spinners SA Tour)
अक्षर पटेलची आकडेवारी
12 कसोटी, 50 विकेट, 513 धावा
54 वनडे, 59 विकेट, 1902 धावा
50 टी-20 आंतरराष्ट्रीय, 45 विकेट, 361 धावा
2. रवी बिश्नोईने दिली नवी उमेद
रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत 9 विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा किताब देण्यात आला. यासह, त्याने आर अश्विनचा (VS श्रीलंका, 2016) द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.
बिश्नोई हा लेगस्पिन करताना चेंडू वेगाने फेकतो आणि तो स्लाइड करतो. त्याची गुगली खेळताना फलंदाजांची भांबेरी उडते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत बिश्नोईने महत्त्वाच्या प्रसंगी टीम इंडियाला विकेट मिळवून दिली. मालिकेतील त्याचा इकॉनॉमी रेट 8.20 राहिला, जो ऑस्ट्रेलियन फलंदाजांविरुद्धचे त्याचे वर्चस्व दर्शवते. गेल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याची कामगिरी उत्कृष्ट झाली आहे.
बिश्नोईने भारतासाठी आतापर्यंत 1 वनडे आणि 21 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने एकदिवसीयमध्ये 1 विकेट आणि टी-20 मध्ये 34 बळी घेतले आहेत. 2024 चा टी-20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवला जाणार आहे. तेथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. बिश्नोईने आपला फॉर्म असाच कायम ठेवला तर त्याला विश्वचषक संघात स्थान मिळू शकते.
3. वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळेल का?
ऑफब्रेक गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरची आफ्रिकन दौऱ्यावर टी-20 आणि वनडेसाठी निवड झाली आहे. सुंदरचा फायदा म्हणजे तो चांगली फलंदाजीही करतो. त्याने टीम इंडियासाठी 4 कसोटी, 18 एकदिवसीय आणि 40 टी-20 सामने खेळले आहेत. जिथे त्यांच्या खात्यात अनुक्रमे 6, 16, 31 विकेट जमा आहेत. कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी 66.25 आणि 27.88 आहे. वॉशिंग्टनच्या गोलंदाजीच्या वेगात बरीच विविधता आहे.
4 : कुलदीपचा फिरकी चमत्कार पुन्हा दिसणार!
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 2023 च्या विश्वचषकात दमदार कामगिरी केली. त्याने विश्वचषकातील सर्व 11 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 28.26 च्या सरासरीने आणि 4.45 च्या इकॉनॉमीने 15 विकेट घेतल्या. कुलदीपच्या गोलंदाजीची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याच्याकडे वैविध्यपूर्ण चेंडू टाकण्याची क्षमता आहे. या मनगटी फिरकीपटूचे गुगली, फ्लिपर अशाप्रकारचे चेंडू खेळणे कठीण आहे. कुलदीपने 8 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 34, 167 आणि 52 विकेट घेतल्या आहेत. आफ्रिकेच्या फलंदाजांना त्याच्यापासून सावध रहावे लागेल.
5. युझवेंद्रचा सामना रवी बिश्नोईशी
युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई हे दोघेही लेगस्पिनर असले तरी भविष्यात या दोन खेळाडूंमध्ये चुरस रंगणार आहे. चहलला वनडे वर्ल्डकप संघातून डच्चू मिळाला होता. पण आफ्रिकन दौऱ्यात त्याला पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी चालून आली आहे. चहलने 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 आणि 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 96 विकेट घेतल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये 100 विकेट घेणारा तो भारताचा पहिला गोलंदाज ठरू शकतो.
6. जडेजा आफ्रिकेत चमत्कार करेल का?
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रवींद्र जडेजाने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केले. त्याने 11 सामन्यात 24.87 च्या सरासरीने आणि 4.25 च्या इकॉनॉमी रेटने 16 विकेट घेतल्या. तो सध्या आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे. कधी कधी जडेजाच्या फिरकीमध्ये खूप तीक्ष्ण वळण पाहायला मिळते. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने स्टीव्ह स्मिथला ज्या प्रकारे बाद केले ते अनेक चाहत्यांच्या अजूनही लक्षात असेल. अशा स्थितीत तो आफ्रिकन फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकवू शकतो. जडेजाने 67 कसोटी, 197 एकदिवसीय आणि 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने अनुक्रमे 275, 220, 51 बळी घेतले आहेत. तर कसोटीत त्याच्या नावावर 2804 धावा असून वनडेत त्याने 2756 धावा केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये जड्डूला केवळ 457 धावा करता आल्या आहेत. जडेजाची खास गोष्ट म्हणजे तो क्रिझच्या वेगवेगळ्या भागांतून गोलंदाजी करताना आपली रिलीझ पोझिशन बदलतो. साधारणपणे, उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी यष्टीच्या जवळ टाकलेले आणि लोअर आर्म चेंडू खूप धोकादायक ठरतात.
7. अश्विनला कसोटीत 500 विकेट घेण्याची संधी
रविचंद्रन अश्विनने विश्वचषकात एकच सामना खेळला. पण कसोटी क्रमवारीत तो पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 94 कसोटी सामन्यांमध्ये 489 बळी घेतले आहेत. 500 बळींचा आकडा गाठण्यासाठी त्याला 11 फलंदाजांची शिकार करायची आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटीत तो हे टार्गेट सहज पार करेल अशी शक्यता आहे. अश्विन ऑफ स्पिन, साइड स्पिन, आर्म बॉल, कॅरम बॉल आणि टॉप स्पिनमध्ये तज्ञ आहे.
असे आहेत भारताचे तीन संघ:
3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.
3 वनडे सामन्यांसाठी भारताचा संघ : ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चाहर.
2 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
The post द. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर भारताचे 7 फिरकीपटू प्रभावशाली ठरणार? appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : Indian Spinners SA Tour : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचे संघ सज्ज झाले आहेत. यातील अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन हे 7 फिरकीपटू द. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर कशी …
The post द. आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर भारताचे 7 फिरकीपटू प्रभावशाली ठरणार? appeared first on पुढारी.