ऊसदरात वाढ हवी, मात्र लढाई नको; शेतकऱ्यांमधील दुही कारखानदारांच्या पथ्यावर    

ऊसदरात वाढ हवी, मात्र लढाई नको; शेतकऱ्यांमधील दुही कारखानदारांच्या पथ्यावर    

चंद्रकांत मुदूगडे

सरूड : मागच्या हंगामातील चारशे रुपये आणि यंदाच्या हंगामासाठी साडेतीन हजार रुपये द्यायचं मान्य करा, या मागणीच्या मुद्द्यांवर भर देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरील आंदोलनाद्वारे ऊसदराचे रान उठविल्यामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाची कोंडी झाली आहे. तर माजी खा. राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलनास्त्राचा वापर केल्याचा आरोप करून साखर कारखाना समर्थक किंबहुना शेट्टी विरोधकांनी या आंदोलनाची धार बोथट करण्याचा प्रयत्न चालविलेला दिसत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना अधिकचा ऊसदर नक्कीच हवा आहे, मात्र, त्यासाठी कारखानदारांशी भिडण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये अद्यापही रुजलेली नाही, हेच वास्तव या आंदोलनाच्या मुळावर उठणारे ठरत आहे. नसता एकाही साखर कारखान्याची चिमणी धूर ओकताना दिसली नसती, हीच सल शेतकरी संघटनेचे शिलेदार खाजगीत बोलून दाखवतात. Swabhimani Shetkari Sanghatana protest
माजी खासदार राजू शेट्टी आणि त्यांचे संघटनेतील दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील सहकारी, कार्यकर्ते गेल्या दीडदोन महिन्यांपासून साखर पट्ट्याच्या बालेकिल्ल्यात फिरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ऊसदराबाबत जाणीवजागृती करताना दिसत आहेत. वर्षागणिक वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ऊसदर किती तकलादू आणि फिका आहे, साखर कारखानदार शेतकऱ्यांना कसे फसवतात, ऊसाप्रमाणेच ते उत्पादित साखरेची देखील हातचलाखीने कशी हेराफेरी करतात, या बाबी दाव्याने केलेल्या आकडेवारीच्या ठोकताळ्यासह शेट्टींसह सर्व सहकारी घसा फोडून शेतकऱ्यांच्या गळी उतरविण्याचा आटापिटा करीत आहेत. बहुतांश सर्वच शेतकऱ्यांना हा ठोकताळा मान्य होतो. तरीही ‘शेजारच्या घरात शिवाजी महाराज जन्माला यावेत…’ अशा उधार मानसिकतेतून आंदोलनाचा उपहास करणारे शेतकरी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेताना दिसतात. याचीच संघटनेच्या कार्यकर्त्यांना खंत वाटते. याला कार्यरत विविध शेतकरी संघटनांमधील अंतर्गत मनभेद, मतभेत आणि राजकीय अभिलाषा तितकीच जबाबदार आहे. Swabhimani Shetkari Sanghatana protest
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला नैसर्गिक बळ मिळाले आहे. शेतकऱ्यांनी एकजुटीने पुढील एक महिनाभर ऊसाला कोयता लावला नाही तर फार मोठे नुकसान होणार नाही. उलट कारखानदारांची अडेलतट्टू मानसिकता शेतकऱ्यांना अपेक्षित वळणावर आणण्यात काहीअंशी यश मिळेल, असा दावा शेतकरी संघटनेकडून केला जात आहे. काही विशिष्ट भागातील लहानमोठे शेतकरी वगळता उर्वरित शेतकरी घराच्या खिडकीतून आंदोनाकडे पाहतात, ही बाब कारखान्यांच्या पत्थ्यावर पडत आहे. कारण शेतकऱ्यांमधील दुही हेरूनच दरवर्षीचा साखर हंगाम यशस्वी होत आल्याचे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही. भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या शाहूवाडी सारख्या तालुक्यातील शेतकरी जर परवडत नाही म्हणून भात शेती सोडून देत अन्य पिकांकडे मोर्चा वळवत असतील तर एका टप्प्यावर ऊस शेतीची अवस्थाही याहून वेगळी असणार नाही. काळ सोकावतोय म्हंटल्यावर शेतकरी जागा होणारच नाही, हे गृहीतक खोटे ठरावे. अशी ही वाढती उदासीनता सरकार आणि साखर कारखान्यांनीही वेळीच ओळखायला हवी.
Swabhimani Shetkari Sanghatana protest : शेट्टींना आंदोलनाची आस.. बाकीच्यांचे काय ?
राजू शेट्टी यांच्या बेधडक आंदोलनाचे फलित म्हणूनच अत्यल्प ऊसदराने दशकाच्या अंतरात तीन हजार रुपयांचा टप्पा गाठला हे सत्य कोणीही नाकारत नाही. ऊसदराबरोबरच कृषी निविष्ठांच्या वाढणाऱ्या दारांसाठी देखील शेट्टींनीच आजवर आवाज उठवलाय हे जगजाहीर आहे. याऊलट शेट्टींनी शेतकऱ्यांच्या हातात दगड दिले.., त्यांची डोकी भडकवतात.., नको त्या वेळी आणि स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी आंदोलन करतात.., अशी ना ना तऱ्हेने सरसकट राज्यकर्ते, राजकीय पुढारी शेट्टींविरोधात कोल्हेकुई करतात. तर मग शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.., शेतकऱ्यांच्या पोरांच्या हाताला कामधंदा देणार म्हणणारे हेच राज्यकर्ते, राजकीय पुढारी कोणत्या बाजूने शेतकऱ्यांचे राज्य अवतरण्याच्या विचारात आहेत ? असा रोखठोक सवाल स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना उपस्थित केला आहे.
हेही वाचा 

…तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही : राजू शेट्टी
उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यक्रम उधळून लावू : राजू शेट्टी
Swabhimani Shetkari Sanghatana protest : ऐन दिवाळीत कृष्णा- वारणा काठावर ऊस आंदोलनाचा भडका

The post ऊसदरात वाढ हवी, मात्र लढाई नको; शेतकऱ्यांमधील दुही कारखानदारांच्या पथ्यावर     appeared first on पुढारी.

सरूड : मागच्या हंगामातील चारशे रुपये आणि यंदाच्या हंगामासाठी साडेतीन हजार रुपये द्यायचं मान्य करा, या मागणीच्या मुद्द्यांवर भर देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावरील आंदोलनाद्वारे ऊसदराचे रान उठविल्यामुळे विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील साखर उद्योगाची कोंडी झाली आहे. तर माजी खा. राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलनास्त्राचा वापर केल्याचा आरोप करून साखर कारखाना समर्थक किंबहुना …

The post ऊसदरात वाढ हवी, मात्र लढाई नको; शेतकऱ्यांमधील दुही कारखानदारांच्या पथ्यावर     appeared first on पुढारी.

Go to Source