अर्थवार्ता
गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 473.20 अंक आणि 1509.12 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 20267.9 अंक व 67481.19 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.39 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 2.29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. गतसप्ताहात गुरुवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांची तब्बल 9744 कोटी (1.17 अब्ज डॉलर्सची) खरेदी भारतीय भांडवल बाजारात केली. मागील पाच महिन्यांतील एक दिवसात केलेली ही सर्वात मोठी खरेदी मानली जात आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीत जीडीपी वृद्धी दर 7.6 टक्क्यांवर (म्हणजेच जगात सर्वाधिक) पोहोचला. त्यातही निर्मिती क्षेत्राचा निर्देशांक (मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स) 13.9 टक्के राहिल्याने परदेशी तसेच स्थानिक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्या कंपन्यांमध्ये अॅक्सिस बँक (9.5 टक्के), ब्रिटानिया (7 टक्के), भारत पेट्रोलियम (6.7 टक्के), आदानी एन्टरप्राईसेस (6.2 टक्के), हिरोमोटो (6 टक्के) या समभागांचा समावेश होतो. शुक्रवार अखेर बीएसईचे भांडवल बाजारमूल्यदेखील यामुळे आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे सुमारे 334 लाख कोटींवर पोहोचले.
नोव्हेंबर महिन्यात सरकारकडे जमा होणार्या महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 15.1 टक्के वाढ होऊन जीएसटी महसूल आकडा 1 लाख 68 हजार कोटींवर पोहोचला. मागील 11 महिन्यांतील ही सर्वाधिक वाढ आहे. जीएसटी लागू झाल्यापासूनचा हा सर्वाधिक तिसर्या क्रमांकाचा संकलनाचा आकडा आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 1.45 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते.
आदित्य बिर्ला समूहाची सिमेंट क्षेत्रातील कंपनी ‘अल्ट्राटेक सिमेंट’ प्रतिस्पर्धी कंपनी ‘केसोराम इंडस्ट्रिज’चा सिमेंट उत्पादन व्यवसाय खरेदी करणार. एकूण 7600 कोटींचा हा व्यवहार समाभाग हस्तांतरणाद्वारे (शेअर स्वॅप) केला जाणार. प्रत्येकी 52 ‘केसोराम इंडस्ट्रीज’च्या समभागांच्या बदल्यात अल्ट्राटेक सिमेंटचा 1 समभाग गुंतवणूकदारांना दिला जाणार. पुढील 9 ते 12 महिन्यांत हा व्यवहार पूर्णत्वास येणार. या व्यवहारापश्चात अल्ट्राटेक सिमेेंटची क्षमता 149.14 एमटीपीएपर्यंत (मिलियन टन पर अॅनम) वाढेल. ही क्षमता 200 एमटीपीएपर्यंत नेण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
म्युच्युअल फंड सलग दुसर्या वर्षी भारतीय शेअर बाजारात सुमारे 1.5 ट्रिलियन म्हणजेच सुमारे 18 अब्ज डॉलर्स इतका प्रचंड पैसा गुंतवण्याच्या मार्गावर. चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत देशांतर्गत इक्विटी फंडांनी सुमारे 1.4 ट्रिलियन डॉलर्सच्या समभागांची खरेदी केली आहे. गतवर्षी हा आकडा 1.8 ट्रिलियन डॉलर्स इतका होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सक्रिय इक्विटी योजनांमधील पैशांचा ओघ (इनफ्लो) अधिक राहिला आहे. तो या वर्षी पहिल्या दहा महिन्यांत निव्वळ 1.3 ट्रिलियन एवढा आहे. एसआयपीमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे म्युच्युअल फंडांमधील आवक 15 टक्क्यांनी वाढली आहे, तर विमोचन (रिडम्पशन) 42 टक्क्यांनी वाढून 1.65 ट्रिलियनवरून 2.3 ट्रिलियनवर पोहोचले आहे. 2023 मध्ये (1 डिसेंबरपर्यंत) निफ्टी 11.9 टक्क्यांनी वर गेला आहे, तर निफ्टी मिडकॅप 100 आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 ने अनुक्रमे 44.4 आणि 58 टक्क्यांनी झेप घेतली आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेल उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक प्लस’ची बैठक पार पडली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव चढे ठेवण्यासाठी दरदिवशी 1 दशलक्ष बॅरलची उत्पादन कपात करण्यावर बैठकीत एकमत झाले. सौदी अरेबिया व रशिया यांचा वरचष्मा असलेल्या या संघटनेमध्ये पुढील वर्षीपासून ब्राझील देखील सहभागी होणार. अमेरिकेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. इस्रायल-हमास युद्धाच्या घोषणेनंतर 95 डॉलर प्रतिबॅरल स्तरावर पोहोचलेला ब्रेंट क्रूड (खनिज तेलाचा) भाव गतसप्ताहात शुक्रवारअखेर 80 डॉलर प्रतिबॅरलच्या जवळपास होता.
29 नोव्हेंबर रोजी बाँम्बे स्टॉक एक्स्चेंजचे भांडवल बाजारमूल्य प्रथमच 4 लाख कोटी डॉलर्सवर पोहोचले होते. त्यानंतर केवळ 16 वर्षांच्या कालावधीत भांडवल बाजारमूल्य चार पटींनी वाढले. गतसप्ताहात चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्या तिमाहीतील अर्थव्यवस्था वृद्धी दराचे आकडे प्रसिद्ध झाले. जगात सर्वाधिक वेगाने म्हणजेच 7.6 टक्के दराने वाढणारी अर्थव्यवस्था ठरल्याने स्थानिक तसेच परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा ओघ भारतीय भांडवल बाजारात आला आणि याच जोरावर निफ्टीने प्रथमच 20 हजारांचा आकडा पार केला.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत केेंद्र सरकारचा वित्तीय तुटीचा आकडा अर्थ संकल्पात मांडलेल्या एकूण तुटीच्या 45 टक्क्यांपर्यंत पोहोचला. केंद्र सरकारचा एकूण खर्च आणि विविध करांद्वारे मिळणारा महसूल यातील फरकास वित्तीय तूट म्हणतात.
टाटा टेक्नॉलॉजीजच्या समभागाचे भांडवल बाजारात जोरदार स्वागत. कंपनीचा समभाग 140 टक्क्यांच्या प्रीमियमसह म्हणजेच 1199.95 रुपयांवर बाजारात लिस्ट झाला. कंपनीने 500 रुपयांच्या किमतीवर आयपीओमध्ये समभाग इश्यू केले होते. परंतु, नोंदणी होताच समभाग 1348 पर्यंत पोहोचला आणि सप्ताहाअखेर 1220 किमतीवर बंद झाला. 2000 कोटींपेक्षा अधिकचा आकार असलेला आणि 2000 नंतरचा हा सर्वाधिक यशस्वी आयपीओ ठरला.
सर्वोच्च न्यायालयाकडून अदानी समूहाला दिलासा. हिंडेनबर्ग या संस्थेचा अहवाल सत्यप्रमाण (स्टेटमेंट ऑफ ट्रुथ) मानता येणार नसल्याचे न्यायालयाचे मत. न्यायालयाने निरीक्षण नोंदवताच मंगळवारच्या सत्रात अदानी समूहाचे एकूण भांडवल बाजारमूल्य तब्बल 1 लाख कोटी रुपये (12.5 अब्ज डॉलर्सनी) वाढले. समूहाचे एकूण भांडवल बाजारमूल्य सुमारे 135 अब्ज डॉलर्स आहे.
सज्जन जिदांल यांचा ‘जेएसडब्ल्यू’ उद्योग समूह लवकरच विद्युत वाहन (इलेक्ट्रिक व्हेईकल) क्षेत्रात उतरणार. यासाठी ‘सिअॅक मोटर्स’ या शांघाय स्थित कंपनीशी ‘जेएसडब्ल्यू’ समूहाने भागिदारी केली. ‘सिअॅक मोटर्स’ची कंपनी ‘एमजी मोटर्स’ सध्या भारतात कार्यरत आहे. जेएसडब्लूने यामधील 35 टक्के हिस्सा खरेदी करण्याचे ठरवले असून याद्वारे एमजी मोटर्सचा भारतातील विद्युत वाहन (ई-व्हेईकल) व्यवसाय विस्ताराचे काम जिंदाल समूह करणार आहे. मार्च 2024 पर्यंत हा व्यवहार पूर्णत्वास येणार आहे.
चीनमधील बलाढ्य बांधकाम क्षेत्र उद्योगातील महत्त्वाची कंपनी ‘एव्हरगँ्रड’ला दिवाळखोरी लिलावाच्या कचट्यातून वाचवण्यासाठी हालचाली. सध्या एव्हरग्रँडवर 300 अब्ज डॉलर्स इतके अवाढव्य कर्ज आहे. कंपनीच्या मालमत्तांचा लिलाव होऊ नये म्हणून कर्जाची पुनर्रचना (रिस्ट्रक्चरिंग) करण्यात येणार आहे. यामध्ये कर्जदात्या संस्थांना कर्जाच्या प्रमाणात एव्हरग्रँडमधील इक्विटी हिस्सा (सुमारे 17.8 टक्के) देण्याच्या चर्चा आहेत. एव्हरग्रँडचे इतर कंपन्यांमध्ये असलेले हिस्सेदेखील कर्जदात्या संस्थांच्या नावावर वळते केले जाणार आहेत. चीनमधील दुसर्या क्रमांकाची सर्वात मोठी बांधकाम क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अशी एव्हरग्रँडची ओळख होती. चीनमधील आर्थिक मंदीमुळे 2021 पासून ही कंपनी अडचणींचा सामना करत आहे.
जुलै ते सप्टेंबर तिमाहीदरम्यान सरकारी दूरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’चा तोटा मागील तिमाहीच्या तुलनेत 12 कोटींनी वाढून 1482 कोटींवर पोहोचला. कंपनीचा महसूलदेखील मागील तिमाहीच्या तुलनेत 5.1 टक्के घटून 4071 कोटींपर्यंत खाली आला.
24 नोव्हेेंबरअखेर भारताची विदेश चलन गंगाजळी 2.5 अब्ज डॉलर्सनी वधारून 597.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. मागील तीन महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी मानली जात आहे.
The post अर्थवार्ता appeared first on पुढारी.
गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्समध्ये अनुक्रमे एकूण 473.20 अंक आणि 1509.12 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 20267.9 अंक व 67481.19 अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 2.39 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 2.29 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. गतसप्ताहात गुरुवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांची तब्बल 9744 कोटी (1.17 अब्ज डॉलर्सची) खरेदी भारतीय भांडवल बाजारात केली. मागील पाच महिन्यांतील एक दिवसात …
The post अर्थवार्ता appeared first on पुढारी.