Pimpri Crime News : दागिन्यांचे प्रदर्शन पडेल महागात

Pimpri Crime News : दागिन्यांचे प्रदर्शन पडेल महागात

संतोष शिंदे

पिंपरी : सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांना दागिन्यांचा मोह आवरत नाही. याचाच फायदा घेत दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान चोरटे अ‍ॅक्टिव्ह होतात. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये चोरटयांनी महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून नेल्याच्या घटना प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मंगळवार (दि. 15) भाऊबीजेला सोने परिधान करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर नामचीन टोळ्यांची मुस्कटदाबी करण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र, ‘स्ट्रीट क्राईम’ रोखण्याचा सूर पोलिसांना अद्याप सापडला नाही. यामध्ये प्रामुख्याने ‘चेन स्नॅचिंग’ रोखणे हे सुरुवातीपासूनच पोलिसांसमोरील एक मोठे आव्हान ठरत आहे. मागील काही दिवसांपासून चेन स्नॅचिंगच्या प्रमाणात अचानक वाढ झाली आहे. मागील नऊ महिन्यांत 66 ठिकाणी चेन चोरीच्या घटना घडल्या आहेत.
तर, नुकतेच निगडीत येथे चोरटयांनी एकाच्या हातातील पर्स हिसकावून नेली. तसेच, शहरात काही ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले आहेत. यातील बहुतांश घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या व्यतिरिक्त दुचाकीवर आलेले चोरटे बसची वाट पाहत असलेल्या नागरिकांना देखील टार्गेट करून लागले आहेत. महिलांच्या हातातील पर्स, लॅपटॉप, घड्याळ यासारख्या किमती वस्तू देखील ओढून नेल्याच्या घटना वरचेवर घडू लागल्या आहेत. त्यामुळे महिलांनी स्वतःच खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
काही महिलांना अंगावरील सोन्याच्या दागिन्यांचे प्रदर्शन करण्याची आवड असते. अनेकदा पोलिस पादचारी महिलांना आपले दागिने झाकून घेण्यास सांगतात. अशा वेळी महिला नाक, तोंड मुरडून काही काळासाठी दागिने झाकून घेतात. मात्र, पुढे गेल्यानंतर लगेचच पुन्हा दागिने दिसतील अशा पद्धतीने घालतात. त्यामुळे महिलांच्या पाळतीवर असलेल्या चोरट्याने आयती संधी मिळते.
जबरी चोरीत कोट्यवधी लंपास
शहर परिसरात पहिल्या नऊ महिन्यांत 261 ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे घडले आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल, रोकड असलेली पर्स यासह मौल्यवान वस्तू चोरटयांनी हिसकावून नेल्या आहेत. यामध्ये सुमारे एक कोटींचा ऐवज हिसकावून नेल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे.
उकल होण्यासाठी प्रयत्न सुरू
आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांपैकी अवघे काही गुन्हे उघड झाले आहेत. यामध्ये स्नॅचिंगचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. गुन्हे शाखेतील काही पथके किरकोळ कामगिरीवर समाधान मानत असल्याने उकल होण्याचे प्रमाण कमी असल्याचे समोर येत आहे. नुकतेच वरिष्ठ अधिकार्‍यांनी गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचार्‍यांना यासाठी धारेवर धरले होते.
लाखोंचे दागिने पळवले
मागील नऊ महिन्याठत शहर परिसरात 66 ठिकाणी दागिने हिसकवल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे नोंद आहे. पोलिस जुन्या खरेदी भावाप्रमाणे फिर्यादीत दर नमूद करतात. त्यामुळे चोरीला गेलेल्या सोन्याची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे कित्येक पटीने जास्त असते.

चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी व्हिजिबल पेट्रोलिंग वाढवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर वॉच ठेवला जात आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार काही नवीन उपाययोजना देखील राबवण्यात येत आहे. त्यामुळे चेन स्नॅचिंग रोखण्यात मदत होईल. याव्यतिरिक्त सर्व युनिट्सची कामगिरीचा आढावा घेण्याचे काम देखील सुरु आहे.
– स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त,

हेही वाचा
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अवतरली मोसंबीची बाग; तब्‍बल ७ हजार मोसंबींची मनमाेहक सजावट
मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व जरांगे-पाटील यांच्याकडे देण्याचा ठराव
सिंधुदुर्ग : मंत्री केसरकरांनी सावंतवाडीकरांना प्रत्यक्ष भेटून दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
The post Pimpri Crime News : दागिन्यांचे प्रदर्शन पडेल महागात appeared first on पुढारी.

पिंपरी : सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांना दागिन्यांचा मोह आवरत नाही. याचाच फायदा घेत दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान चोरटे अ‍ॅक्टिव्ह होतात. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये चोरटयांनी महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून नेल्याच्या घटना प्रकर्षाने समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मंगळवार (दि. 15) भाऊबीजेला सोने परिधान करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये स्वतंत्र पोलिस आयुक्तालय …

The post Pimpri Crime News : दागिन्यांचे प्रदर्शन पडेल महागात appeared first on पुढारी.

Go to Source