एमआयडीसी श्रेयवादाचे राजकारण तापले; आता वहाडणेंची उडी
कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावळीविहिर- सोनेवाडी एमआयडीसीला मंजुरी दिल्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह पत्रकार परिषद घेत युवकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आक्षेप घेत, माझ्यामुळेच एमआयडीसी मंजुर झाल्याचा दावा पत्रकार परिषदेत केल्याने कोपरगावचा हा श्रेयवाद चांगलाच चर्चेत आला आहे.
शिर्डीला एमआयडीसी मंजूर झाल्याचे वृत्त महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण पा. विखे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिले. यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानने 2018 पासून सतत पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून एमआयडीसी मंजुर झाल्याचा दावा केला. दरम्यान, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार आशुतोष काळे यांनी आपण निवडणुकीत एमआयडीसी करण्याचा शब्द दिला होता, निवडून आल्यानंतर 2020 पासून सतत यासाठी पाठपुरावा केला. महायुतीच्या सरकारमुळे एमआयडीसी मंजूर झाल्याचे सांगत, रोजगाराच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगत आपला दावा अधोरेखित केला.
शनिवारी वसंत स्मृती येथे पत्रकार परिषद घेत विजय वहाडणे यांनी आपण 2018 सालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात 3 दिवस एमआयडीसी व्हावी यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. यावेळी 6 हजार युवकांनी सह्या केल्या होत्या. त्याआधारे आपण सरकारकडे पाठपुरावा केला. नगराध्यक्ष झाल्यानंतर उद्योग मंत्रालयाचे पत्र आले होते, मात्र त्यावेळी काही नेत्यांच्या मानसिकतेमुळे 700 एकर जमीन उपलब्ध करू शकलो नसल्याची खंत वहाडणे यांनी व्यक्त केली.
वहाडणे म्हणाले, 40 वर्षे यांनी काही केले नाही, परंतु आज मात्र आपणच सर्व केल्याच्या बातम्या देऊन, फ्लेक्स लावून, जल्लोष करून, पेढे वाटून आनंद व्यक्त केला जात असल्याबद्दल खेद वाटतो. आता तर कोपगाव मतदार संघातील प्रश्नांची यादी सरकारकडे पाठवायची, एखादा प्रश्न सुटला तर आम्हीच केले, असे सांगायचे, अशी टीका वहाडणे यांनी प्रस्थापित नेत्यांवर केली. एमआयडीसी मंजूर झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे भाजप कार्यकर्ते शहर व तालुक्यातील युवकांच्यावतीने वहाडणे यांनी आभार मानले.
राजकारण निवडणुकीपर्यंतच करा. एमआयडीसीला आडवे येऊ नका. श्रेय कोणीही घ्या, मात्र विकास होऊ द्या. राजकीय खेळापायी विकास खुंटू नये, ही अपेक्षा असल्याचे वहाडणे यांनी स्पष्ट केले. एकूणच दिवाळीनंतर कोपरगाव व राहाता तालुक्यात एमआयडीसीच्या मुद्यावर राजकीय फटाके फुटू लागले आहेत. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष झाल्याबद्दल विनायक गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुभाष दवंगे यांनी केले तर आभार चेतन खुबानी यांनी मानले.
मला आमदारकी नको, एमआयडीसी द्या..!
चार महिन्यापूर्वी माझ्या ‘कर्तव्य’ पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पा. येथे आले असता मी त्यांच्याकडे मला संस्थान नको, मला विधान परिषदेची आमदारकी नको, एमआयडीसी द्या, अशी मागणी केली होती. तेव्हा माझ्यासह कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे युवकांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे वहाडणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ठणकावून सांगितले.
हेही वाचा
Salman Butt PCB : पीसीबीकडून अवघ्या एका दिवसातच सलमान बटची हकालपट्टी
Nagar Crime News : पसार आरोपीवर खुनी हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा
पाथर्डी आगाराच्या बहुतांश बस एक्सपायर
The post एमआयडीसी श्रेयवादाचे राजकारण तापले; आता वहाडणेंची उडी appeared first on पुढारी.
कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावळीविहिर- सोनेवाडी एमआयडीसीला मंजुरी दिल्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह पत्रकार परिषद घेत युवकांना दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आक्षेप घेत, माझ्यामुळेच एमआयडीसी मंजुर झाल्याचा दावा पत्रकार परिषदेत केल्याने कोपरगावचा हा श्रेयवाद …
The post एमआयडीसी श्रेयवादाचे राजकारण तापले; आता वहाडणेंची उडी appeared first on पुढारी.