पुणे : शिरूरला अजित पवार गटाचा उमेदवार कोण?
सुषमा नेहरकर शिंदे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती, शिरूरसह चार लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे जाहीर केले. यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरू झाली. यामध्ये अनेक नावांचा समावेश असला, तरी वेळेवर काही होईल याबाबत अनिश्चितता कायम आहे.
पक्षाचे विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे नाव या मतदारसंघासाठी आघाडीवर असून, यापूर्वी अजित पवार यांनी लोकसभेसाठी तयारी करण्याच्या सूचनादेखील त्यांना दिल्या आहेत. याशिवाय भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, दिलीप वळसे-पाटील यांची कन्या पूर्वा वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील तीनवेळा खासदार राहिलेले माजी खासदार व शिंदे गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटांकडून ही निवडणूक लढवू शकतील, असादेखील अंदाज व्यक्त केला जात आहे.
याशिवाय राज्यात अजित पवार गटांची सर्वाधिक ताकद व सर्वात सुरक्षित मतदारसंघ असलेल्या शिरूर लोकसभेसाठी पार्थ पवार हेदेखील ऐनवेळी येथून निवडणूक लढवू शकतात, अशा अनेक चर्चांना सध्या उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सध्या राज्यात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. मार्चअखेरीस लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू शकते, यामुळे कार्यकर्त्यांना कामाला लागा, असे सांगत अजित पवार यांनी चार मतदारसंघावर दावा केला आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिंदे गटाकडे जाणार असल्याचे बोलले जात असताना अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर सर्वच राजकीय गणित बिघडणार असल्याचे बोलले जाते.
सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ही दोनच नावे आघाडीवर असताना आता अचानक नवीन नावांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये डॉ. अमोल कोल्हे हे अजित पवार गटातून उमेदवारी खात्री नसल्यानेच अजित पवारांचे समर्थक असूनही दोन दिवसांत शरद पवार गटात सामील झाले. तरीदेखील डॉ. कोल्हे निवडणूक लढविणार का, शरद पवार गटाकडून लढविणार की खरच भाजपमध्ये जाणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. परंतु चार-साडेचार वर्षे गायब असलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतेय.
सध्या शिरूर लोकसभा निवडणूक शिंदे गट असो अथवा अन्य कोणताही पक्ष; पण निवडणूक लढविणारच, असा एकमेव फिक्स उमेदवार म्हणजे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होय. आढळराव पाटील यांचा खासदार नसतानाही मतदारसंघातील जनसंपर्क टिकून आहे. मतदारसंघात नियमित दौरे व विविध विकासकामांच्या माध्यमातून ते अॅक्टिव्ह असल्याचे पाहायला मिळते. परंतु आढळराव पाटील हे निवडणूक लढविणार जरी निश्चित असले, तरी नक्की कोणता पक्ष वा कोणता गट हे मात्र निश्चित नाही.
दिलीप वळसे-पाटील की पूर्वा वळसे-पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ व बहुतेकवेळा पूर्णवेळ मंत्री राहिलेल्या दिलीप वळसे-पाटील यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी मागील दोन टर्मपासून प्रयत्न सुरू आहेत. परंतु दिल्लीत जाण्याची इच्छा नसल्याने यापूर्वी वळसे-पाटील यांनी आपले खंदे समर्थक देवदत्त निकम यांना उमेदवारी दिली होती. परंतु आता निकम यांनीच वळसे-पाटील यांना आव्हान दिले असून, ते शरद पवार गटात सामील झाले आहेत. यामुळे शिरूरची जागा अजित पवार गटाने लढविल्यास दिलीप वळसे-पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही.
परंतु गेल्या काही वर्षांपासून आगामी निवडणुकीत दिलीप वळसे-पाटील यांची कन्या व वारसदार पूर्वा वळसे-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. पूर्वाचे शिक्षण व समज लक्षात घेता तिला राज्यापेक्षा दिल्लीत काम करायला अधिक आवडले, असे अनेकवेळा बोलूनदेखील दाखवले आहे. यामुळे अजित पवार गटाकडे शिरूरची जागा आल्यास पूर्वा वळसे-पाटीलसाठी ही चांगलीच संधी असू शकते.
डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढविणार आहेत का?
मागील लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघात मराठा-माळी वाद शिगेला पोहोचलेला असताना शरद पवार यांनी डॉ. कोल्हे यांची उमेदवारी देऊन मोठी राजकीय खेळी खेळली. संभाजी महाराजांच्या मालिकेमुळे ग्रामीण भागात घरोघरी पोहोचलेले डॉ. कोल्हे यांनी सलग तीनवेळा उमेदवार राहिलेल्या व मोदी लाट असताना शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा चांगल्या मताने पराभव केला. परंतु खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या शूटिंगच्या व्यस्त कार्यक्रमामुळे कोल्हे चार-साडेचार वर्षे मतदारसंघात फारसे फिरकलेच नाहीत.
यामुळेच डॉ. कोल्हे यांच्यावर प्रचंड नाराजी असून, शरद पवार गटाकडे गेल्याने निवडणूक तशी अवघड मानली जात आहे. त्यात डॉ. कोल्हे भाजपमध्ये जाणार अशी अनेक दिवसांपासून चर्चा आहे. परंतु डॉ. कोल्हे सार्वत्रिक निवडणूक लढविण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचे बोलले जात असताना पुन्हा एकदा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. यामुळेच डॉ. कोल्हे यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे.
हेही वाचा
Baba Balaknath Rajasthan Elections : राजस्थानात बाबा बालकनाथ मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार! जाणून घ्या त्यांच्याबद्दल
केळीच्या पानावर जेवणे लाभदायक
दुसर्या महायुद्धातील बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष
The post पुणे : शिरूरला अजित पवार गटाचा उमेदवार कोण? appeared first on पुढारी.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती, शिरूरसह चार लोकसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे जाहीर केले. यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरू झाली. यामध्ये अनेक नावांचा समावेश असला, तरी वेळेवर काही होईल याबाबत अनिश्चितता कायम आहे. पक्षाचे विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे नाव या मतदारसंघासाठी …
The post पुणे : शिरूरला अजित पवार गटाचा उमेदवार कोण? appeared first on पुढारी.