आरवली/ सिंधुदुर्ग; एस. एस. धुरी : पक्षीप्रेमी व पर्यटक ज्यांची आतुरतेने वाट पाहत असतात त्या उत्तराखंडातील ‘एशियन ओपन बिल स्टॉर्क’ या परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन सध्या आरवली, आसोली व आजगाव येथील निसर्गरम्य मळ्यांमध्ये झाले आहे. गेली १२-१३ वर्षे सातत्याने येणार्या या पक्ष्यांचे आगमन यावर्षी नोव्हेंबरच्या दुसर्या आडवड्यात झाले आहे.
उघड्या चोचीचे करकोचे… पक्षीप्रेमींना उत्सुकता
जिल्ह्यात यावर्षी पावसाने उशिरापर्यंत बस्तान बसविल्यामुळे या पक्ष्यांच्या आगमनास थोडा उशीर झाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दलदलीच्या मळ्यांची संख्याही कमी झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत या पक्ष्यांची संख्याही घटली आहे. हे परदेशी पाहुणे आणखी किती काळ येथील मळ्यांमध्ये पाहुणचार घेणार? याची पक्षीप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे.
आरवली, आसोली व आजगाव येथे पाणथळ आणि दलदल असलेले मळे मोठ्या प्रमाणात आहेत. या मळ्यांना चोहोबाजूंनी हिरव्यागार अशा नारळ व पोफळीच्या बागा आहेत. अशा निसर्गरम्य शेतमळ्यात हजारो मैलांवरून स्थलांतर करून आलेले ‘एशियन ओपन बिल स्टॉर्क’ हे पक्षी सध्या विसावलेले दिसतात. हे पक्षी ‘सिकोनिडी’ या कुळातील असून ‘अॅनास्टोमस ऑसिस्टन्स’ या गणातील आहेत. मराठीमध्ये यांना ‘मुग्ध बलाक’ किंवा ‘उघड्या चोचीचे करकोचे’ असेही म्हणतात. या पक्ष्यांच्या मनमोहक दर्शनासाठी आरवली, आसोली व आजगाव येथील मळा पर्यटक आणि पक्षीप्रेमींना खुणावत आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात होते आगमन
उत्तराखंडात सध्या कडाक्याची थंडी पडत असल्याने तेथील हे ‘एशियन ओपन बिल स्टॉर्क’ पक्षी नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात स्थलांतर करतात. उत्तराखंडातील कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी हजारो मैलांचे स्थलांतर करून हे पक्षी येथील दलदलीच्या आणि पाणथळ मळ्यात स्थिरावले आहेत. दरवर्षी आरवली, आसोली व आजगाव या परिसरात या पक्ष्यांचे ऑक्टोबर महिन्यात आगमन होते. परंतु यावर्षी पावसाचा हंगाम लांबल्याने या पक्ष्यांचे स्थलांतर लांबले. सुमारे एक महिना उशिराने त्यांचे आगमन झाले आहे. सकाळच्या वेळेतील त्यांची गगन भरारी मनमोहक असते. त्यानंतर मळ्यातील दलदलीच्या ठिकाणी ते खाद्य शोधण्यासाठी विसावतात. पाणथळ भागातील गोगलगायी, शंख, शिंपले, खेकडे, कीटक, किडी व बेडूक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.
ओपन बिल स्टॉर्क नाव कसे पडले?
पुढील दोन ते तीन महिने येथील मळ्यात हे पक्षी राहतात. त्यानंतर ते परतीच्या प्रवासाला निघतात. या पक्ष्यांचा जबडा मध्यभागी उघडा व शेवटच्या टोकाला जुळत असल्याने त्यांना ‘ओपन बिलस्टॉर्क’ असे म्हटले जाते. मान बाहेर काढून आकाशात मुक्तपणे स्वच्छंद विहार करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. आशिया खंडातील श्रीलंका, म्यानमार, बांगला देश आणि भारतात ते आढळतात. त्यामुळे त्यांच्या स्थलांतराला निवासी स्थलांतर म्हटले जाते. या पक्ष्यांचे पंख काळसर असून पाय लालसर असतात. उत्तराखंडात या पक्ष्यांचा अंडी घालण्याचा कालावधी जुलै ते सप्टेंबर असा असतो. तर दक्षिण खंडात तो नोव्हेंबर ते मार्च असा असतो.
हेही वाचा :
Konkan Travel : रत्नागिरीतील ‘मालगुंड’ला कधी गेलाय का? ही सुंदर ठिकाणे पाहा…
मालवणातील बिळवसच्या समृद्धीची रशियाला भुरळ!
सिंधुदुर्ग : मुणगे भगवती हायस्कूलच्या देवांग मेस्त्रीची कलाकृती राज्यात प्रथम
The post सिंधुदुर्ग : ‘एशियन ओपन बिल स्टॉर्क’ पक्ष्यांचे आरवलीत आगमन appeared first on पुढारी.
आरवली/ सिंधुदुर्ग; एस. एस. धुरी : पक्षीप्रेमी व पर्यटक ज्यांची आतुरतेने वाट पाहत असतात त्या उत्तराखंडातील ‘एशियन ओपन बिल स्टॉर्क’ या परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन सध्या आरवली, आसोली व आजगाव येथील निसर्गरम्य मळ्यांमध्ये झाले आहे. गेली १२-१३ वर्षे सातत्याने येणार्या या पक्ष्यांचे आगमन यावर्षी नोव्हेंबरच्या दुसर्या आडवड्यात झाले आहे. उघड्या चोचीचे करकोचे… पक्षीप्रेमींना उत्सुकता जिल्ह्यात …
The post सिंधुदुर्ग : ‘एशियन ओपन बिल स्टॉर्क’ पक्ष्यांचे आरवलीत आगमन appeared first on पुढारी.