Politics : मावळात दोस्तीत कुस्ती : खा. बारणेंना शह देण्याचा प्रयत्न
पिंपरी : मागील लोकसभा निवडणुकीत जिव्हारी लागलेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या साथीने पार्थ पवार यांना रिंगणात उतरुन खासदार श्रीरंग बारणे यांना शह देण्याच्या हालचाली मावळ तालुक्यात सुरू असल्याची चर्चा आहे.
युतीचे तिकीट कुणाला?
उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करताना अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेतल्या आहेत. युतीतील त्यांचे वजन आणि त्यांचा स्वभाव लक्षात घेता पार्थ पवार यांच्यासाठी लोकसभेची जागा आपल्याकडे घेण्यास त्यांना अडचण येणार नाही. अशावेळी श्रीरंग बारणे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाचे काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पालकमंत्रीपदही आपल्याकडे घेऊन जिल्ह्यातील राजकीय सूत्रेही पुनश्च आपल्या हातात घेण्यास सुरुवात केली आहे. सहन होईना आणि सांगताही येईना, अशी गत जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांची झाली आहे. त्यामुळे या राजकीय परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन गमावलेली शक्ती पुनश्च कमाविण्यासाठी पवारांनी फासे टाकण्यास सुरुवात केली आहे.
पराभवाचा वचपा काढणार?
लोकसभेच्या गतवेळच्या निवडणुकीत मावळमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. 2,15,913 इतक्या मोठ्या फरकाने झालेला पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला होता. याबद्दल त्यांनी वेळोवेळी नाराजीही व्यक्त केली आणि योग्य वेळी उत्तर देणार असल्याचे सुतोवाचही केले होते.
‘ती’ योग्य वेळी आली..?
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी खासदार बारणे यांच्यावर अनपेक्षितरित्या शाब्दीक हल्ला चढवून राजकीय खळबळ उडवून दिली. त्यांचे कट्टर मानले जाणारे विरोधक माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याशी त्यांचे मनोमिलन झाल्याची खासगीत चर्चा सुरू असतानाच त्यांच्या समर्थनार्थ ही टीकाटीपणी झाल्याचे आडाखे बांधले जात होते. मात्र, पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर दावा करण्यासाठीच त्यांनी आरोप केल्याचे बोलले जात आहे.
संदीप वाघेरे यांनी शड्डू ठोकले?
बारणेंविरोधात भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनीही शड्डू ठोकले आहेत. कार्यकर्त्यांकडून मिळालेला आत्मविश्वास, शहरात नात्या-गोत्याचे समीकरण, मावळात मित्रपक्षातील मित्रांचे आणि घाटाखाली संपूर्ण ताकद एकटवून ताकदीने निवडणूक लढविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्यांनी सुरू केलेले काम पाहून इतर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मावळात ताकद भाजपची की शिवसेनेची ?
मावळात सलग तीन टर्म शिवसेनेने बाजी मारली आहे. मात्र, तिनही वेळी भाजपच्या मदतीने सेना लढली आहे. मावळ विधानसभेत 1995 पासून सलग 25 वर्षे रुपलेखाताई ढोरे, दिगंबर भेडगे आणि बाळा भेगडे यांच्या रुपाने भाजपची एकहाती सत्ता होती. ही परंपरा गतवेळी मोडीत काढणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके हे देखील भाजपमध्ये होते. विधानसभेसाठी तीन लाखांवर मतदान येथून होते. लोकसभेसाठी टर्निग पॉईंट असणारा विधानसभा मतदारसंघ शेळकेंच्या ताब्यात आहे. त्यांचे आणि खा. बारणे यांचे सूत कधीच जुळलेले नाही. बारणेंच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्यांनी यावर शिक्कामोर्तबही केले आहे. दुसरीकडे बाळा भेगडे यांच्याशी मनोमिलन झाले असल्यास खा. बारणे यांची वाट बिकट आहे.
मावळ लोकसभा निवडणुकीतील मतदान
सन 2009
गजानन बाबर (शिवसेना) – 3,64,857
आझम पानसरे (राष्ट्रवादी काँग्रेस) 2,84,238
सन 2014
श्रीरंग बारणे (शिवसेना) – 5,12,226
लक्ष्मण जगताप (अपक्ष) – 3,54,829
राहुल नार्वेकर (राष्ट्रवादी काँग्रेस) -1,82,293
मारुती भापकर (आप) – 30,566
सन 2019
श्रीरंग बारणे (शिवसेना) 7,20,663
पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) 5,04,750
राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी) 75,904
हेही वाचा
Israel-Hamas War | युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलचा गाझावर हल्ला, १७५ ठार
दोन लघुग्रह येणार पृथ्वीच्या भेटीला!
आपल्या आकाशगंगेतील कृष्णविवराचा वेग विक्रमी
The post Politics : मावळात दोस्तीत कुस्ती : खा. बारणेंना शह देण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.
पिंपरी : मागील लोकसभा निवडणुकीत जिव्हारी लागलेल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या साथीने पार्थ पवार यांना रिंगणात उतरुन खासदार श्रीरंग बारणे यांना शह देण्याच्या हालचाली मावळ तालुक्यात सुरू असल्याची चर्चा आहे. युतीचे तिकीट कुणाला? उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करताना अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेतल्या आहेत. युतीतील त्यांचे …
The post Politics : मावळात दोस्तीत कुस्ती : खा. बारणेंना शह देण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.