नाशिक : पाणीकपात तूर्त लांबणीवर! महिनाभरानंतर निर्णय घेणार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या फेरनियोजनामुळे नाशिकच्या धरणांतून जायकवाडीच्या दिशेने करण्यात आलेल्या विसर्गातून ४०० दशलक्ष घनफूट पाण्याची झालेली बचत, प्रतिदिन १९.७५ दशलक्ष घनफूट पाणीवापरानुसार नाशिककरांना २९० दिवसांसाठी लागणारी ५७२७ दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आणि पाणीवाटप नियोजनानंतर गंगापूर धरणात शिल्लक राहणारा ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा लक्षात घेता नाशिककरांवरील पाणीकपातीचे तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. महिनाभरानंतर धरणसाठ्याचा आढावा घेतला जाणार असून त्यानंतर पाणीकपातीबाबत फैसला करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
मराठवाड्याकरीता नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून ८.६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचे निर्देश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिल्यानंतर विसर्ग करण्यात आला. नाशिकमधून पाणी सोडण्याच्या निर्णयास राजकीय नेते मंडळी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध केला. परंतु सर्वोच्च न्यायालयानेही पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोतर्ब केल्यानंतर अखेर जलसंपदा विभागाने विर्सग सुरू केला. जायकवाडीसाठी पाणी सोडताना २.८ टीएमसी पाणी वहन तूट म्हणून गृहीत धरण्यात आले होते. त्यामुळे ८.६ पैकी जेमतेम ४.५ ते ५ टीएमसी इतकेच पाणी जायकवाडीला पोहोचू शकेल,असा अंदाज व्यक्त करण्यात येत होते. यादरम्यान जोरदार अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे नदी, नाले वाहु लागल्याने जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याची वहन तूट कमी झाल्याने तितकी विसर्ग कमी करावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. त्यानुसार गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने फेरनियोजन करत आदेश दिल्यानंतर नाशिकच्या धरणातून केल्या जाणाऱ्या एकूण विसर्गापैकी ४०० दशलक्ष घनफूट पाण्याची बचत झाली आहे.
दरम्यान, पाणीकपातीसंदर्भात जिल्हाधिकारी शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. करंजकर व जलसंपदा अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्तांनी नाशिककरांची बाजु मांडली. नाशिक शहरासाठी महापालिकेने गंगापूर धरणातून ४४००, मुकणेतून १६०० तर दारणा धरणातून १०० अशाप्रकारे ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदविली होती. वास्तविक पाहता शहरात सद्यस्थितीत प्रतिदिन १९.७५ दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा केला जातो. यात गंगापूर धरणातून १४.५०, मुकणेतून ४.९० दशलक्ष घनफूट प्रतिदिन पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा असाच कायम ठेवल्यास शहरासाठी गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातून एकूण ५७२७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवश्यकत आहे. जलसंपदा विभागाने महापालिकेला ५३१४ दशलक्ष घनफूट पाणीआरक्षण देऊ केले आहे. शहराची प्रत्यक्ष गरज आणि उपलब्ध होणाऱ्या आरक्षणात ४१३ दशलक्ष घनफूटाची तफावत आहे. जायकवाडीच्या विसर्गातून बचत झालेले ४०० दशलक्ष घनफूट पाणी महापालिकेला मिळाल्यास ही तफावत दूर होऊ शकते. नाशिककरांवरील पाणीकपातीचे संकट टळू शकते, अशी वस्तुस्थिती आयुक्त डॉ. करंजकर यांनी मांडल्यानंतर तूर्त पाणीकपातीचा प्रस्ताव बाजुला ठेवून महिनाभरानंतर धरणसाठ्याचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर धरणात खोदावी लागणार चर!
जलसंपदा विभागाने महापालिकेला देऊ केलेले ५३१४ दशलक्ष घनफूट पाणीआरक्षण कायम राहिल्यास गंगापूर धरणातील ६०० दशलक्ष घनफूट मृत साठ्यावर भविष्यात महापालिकेला हक्क सांगता येणार आहे. अर्थात हे पाणी धरणावरील महापालिकेच्या जॅकवेलपर्यंत येण्यासाठी एक महाकाय खडक अडचणीचा ठरत आहे. धरणातील जलसाठा कमी झाल्यानंतर हा खडक फोडून अस्तित्वातील चर खोल केल्यास सदर मृतसाठा महापालिकेच्या जॅकवेलपर्यंत येऊ शकतो. याद्वारे देखील नाशिककरांवरील जलसंकट टाळता येणे शक्य आहे. अर्थात यासाठी महापालिकेला काही कोटींच्या खर्चाचा भार उचलावा लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
अपव्यय करणाऱ्यांवर होणार कारवाई
पाणीसंकट टाळण्यासाठी पाण्याचा अपव्यय करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे. तोट्या नसलेल्या नळांना तोट्या बसविणे, गळती रोखणे, यासारख्या उपायोजना अंमलात आणण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला दिल्या असून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात कठोर दंडात्मक कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून पथके नियुक्त केली जाणार असून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
हेही वाचा :
नव्या पिग्मी स्क्विड प्रजातींना जपानी नावे
Trending Song Tera Naam Sunke : अपारशक्ती खुराणा यांचे नवीन “तेरा नाम सुनके” गाणं भेटीला
मायावी चंद्रमुखी
The post नाशिक : पाणीकपात तूर्त लांबणीवर! महिनाभरानंतर निर्णय घेणार appeared first on पुढारी.
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या फेरनियोजनामुळे नाशिकच्या धरणांतून जायकवाडीच्या दिशेने करण्यात आलेल्या विसर्गातून ४०० दशलक्ष घनफूट पाण्याची झालेली बचत, प्रतिदिन १९.७५ दशलक्ष घनफूट पाणीवापरानुसार नाशिककरांना २९० दिवसांसाठी लागणारी ५७२७ दशलक्ष घनफूट पाण्याची गरज आणि पाणीवाटप नियोजनानंतर गंगापूर धरणात शिल्लक राहणारा ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा लक्षात घेता नाशिककरांवरील पाणीकपातीचे तूर्त पुढे ढकलण्यात …
The post नाशिक : पाणीकपात तूर्त लांबणीवर! महिनाभरानंतर निर्णय घेणार appeared first on पुढारी.